केकेआरला धक्क्यांवर धक्के! आकाश दीप पाठीच्या दुखापतीमुळे IPL मधून बाहेर; अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीलाही मुकण्याची शक्यता

कोलकाता नाइट रायडर्सला आयपीएल सुरू होण्याआधीच धक्क्यांवर धक्के बसत आहेत. वेगवान गोलंदाज आकाश दीप याला पाठीच्या दुखापतीचा त्रास सुरू झाला असून तो किमान आठ आठवडे खेळू शकणार नाही. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमधून त्याचा पत्ता कट झाला आहे. त्याचबरोबर जून महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यातही त्याच्या समावेशाविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.
केकेआरला धक्क्यांवर धक्के! आकाश दीप पाठीच्या दुखापतीमुळे IPL मधून बाहेर; अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीलाही मुकण्याची शक्यता
केकेआरला धक्क्यांवर धक्के! आकाश दीप पाठीच्या दुखापतीमुळे IPL मधून बाहेर; अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीलाही मुकण्याची शक्यता
Published on

कोलकाता : कोलकाता नाइट रायडर्सला आयपीएल सुरू होण्याआधीच धक्क्यांवर धक्के बसत आहेत. वेगवान गोलंदाज आकाश दीप याला पाठीच्या दुखापतीचा त्रास सुरू झाला असून तो किमान आठ आठवडे खेळू शकणार नाही. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमधून त्याचा पत्ता कट झाला आहे. त्याचबरोबर जून महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यातही त्याच्या समावेशाविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.

"आकाश दीप याच्या पाठीच्या खालच्या भागात वेदना होत आहेत. त्याची दुखापत निश्चित झाली असून त्याला या दुखापतीतून बरे होण्यासाठी ८ ते १२ आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे तो या वर्षीच्या आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही. त्याचबरोबर अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यातही त्याचा समावेस केला जाण्याची शक्यता धूसर आहे," असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

बंगालचा २९ वर्षीय वेगवान गोलंदाज आकाश दीप हा रणजी करंडक स्पर्धेत जम्मू आणि काश्मीरविरुद्धच्या उपांत्य फेरीत अखेरचा सामना खेळला होता. या सामन्यातही तो पूर्ण तंदुरुस्त नव्हता. पहिल्या डावात त्याने १३ तर दुसऱ्या डावात त्याने फक्त सात षटके गोलंदाजी केली. त्यानंतर बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये तो पुनर्वसन कार्यक्रमात सहभागी झाला होता. बुधवारपासून कोलकाताच्या सराव शिबिराला सुरुवात झाली, पण त्यातही तो सामील झाला नाही.

आयपीएलचे तीन वेळा विजेतेपद जिंकणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्ससाठी हा तिसरा धक्का मानला जात आहे. याआधी भारताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि १८ कोटींना विकत घेतलेला श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज माहीश पाथिराना यांनाही दुखापतींनी ग्रासले असून ते केकेआरमध्ये कशी सामील होतील, याबाबत सध्या अनभिज्ञता आहे.

आकाश दीप आणि हर्षित राणा यांच्या अनुपलब्धतेमुळे आता केकेआरला वैभव अरोरा, कार्तिक त्यागी आणि उमरान मलिक या वेगवान गोलंदाजांवर अवलंबून राहावे लागणार आहे. केकेआरला गेल्या मोसमात आठव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. त्यातच आता खेळाडूंच्या दुखापतींनी त्यांना सुरुवातीलाच संकटात आणले आहे. हर्षित राणाच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली असून त्यातून तो सावरत आहे. केकेआरने यावर्षीच्या सुरुवातीला डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रहमानला मुक्त करून त्याच्या जागी झिम्बाब्वेच्या ब्लेसिंग मुझाराबानी याला संघात समाविष्ट करून घेतले आहे.

अभिषेक नायरच्या प्रशिक्षकपदाखाली तसेच अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणारा केकेआर संघ आता यापूर्वी आयपीएलमध्ये खेळलेल्या आणि अनुभवी अशा खेळाडूंचा संघात बदली खेळाडू म्हणून समाविष्ट करण्यासाठी उत्सुक आहे. त्यासाठी केकेआरने आकाश मढवाल, नवदीप सैनी, सिमरजीत सिंग, केएम आसिफ आणि संदीप वॉरियर यांची चाचणी घेण्याचे ठरवले आहे. केकेआरचा मुख्य प्रशिक्षक

अभिषेक नायर म्हणाला की, "बदली खेळाडूंविषयी अंतिम निर्णय घेण्याच्या टप्प्यात आम्ही आहोत. केकेआरचा आयपीएलमधील पहिला सामना २९ एप्रिल रोजी मुंबईत होणार आहे. त्याआधी सर्व समस्यांवर समाधान काढून आम्ही २५ एप्रिललाच मुंबईला रवाना होणार आहोत."

"हर्षित राणाला झालेली दुखापत हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो आमच्या संघाचा प्रमुख भाग असून खेळाडू म्हणून परिपक्व होत आला आहे. त्याची आम्हाला नक्कीच उणीव जाणवेल. तसेच आम्ही गेल्या काही दिवसांपासून अन्य काही गोलंदाजांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यापैकी काही खेळाडूंना आम्ही करारबद्ध करणार आहोत," असेही नायरने सांगितले.

महेंद्रसिंह धोनीही अनफिट

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी तो अद्यापही आयपीएलमध्ये खेळत आहे. वयाच्या चाळीशीनंतरही आयपीएलमध्ये अविरतपणे खेळणारा धोनी यंदाच्या मोसमातही चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसणार आहे. मात्र आयपीएलच्या सुरुवातीलाच तो अनफिट असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. २०२३पासून गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या धोनीने शस्त्रक्रियाही करवून घेतली होती. आता शनिवारी सराव आटोपल्यानंतर आपली बॅग घेऊन मैदानातून परतत असताना धोनी काहीसा लंगडत चालत असल्याचे दिसत आहे. त्यावरून तो पूर्णपणे फिट नसल्याचा अंदाज बांधला जात आहे.

१ कोटींना केकेआरमध्ये दाखल

बंगालचा वेगवान गोलंदाज आकाश दीप याला केकेआरने आयपीएल २०२६च्या लिलावात १ कोटी रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले होते. तो यापूर्वी लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून खेळला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळणाऱ्या आकाश दीपने आतापर्यंत आयपीएलमध्ये १४ सामने खेळले असून, ११.८२ च्या सरासरीने त्याने १० विकेट्स मिळवले आहेत. गेल्या हंगामात तो लखनौ संघाचा भाग होता, त्याने सहा सामन्यांत सहा बळी टिपले होते.

१० पैकी ८ फ्रँचायझींना दुखापतींचा फटका

आयपीएलला फक्त एक आठवडा शिल्लक राहिलेला असतानाच, अनेक संघ दुखापतींशी झगडत आहेत. खेळाडूंच्या दुखापतींचा फटका १० पैकी ८ फ्रँचायझींना बसला आहे. त्यातच सनरायजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स या संघांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. हर्षित राणा आणि मथिशा पाथिराना (केकेआर), पॅट कमिन्स, जॅक एडवर्ड्स, इशान मलिंगा (सनरायजर्स हैदराबाद), जोश हेझलवूड (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू), मिचेल स्टार्क (दिल्ली कॅपिटल्स), नॅथन एलिस, मॅथ्यू शॉर्ट (चेन्नई सुपर किंग्स), सॅम करण, अॅडम मिलने (राजस्थान रॉयल्स), अथर्व अंकोलेकर (मुंबई इंडियन्स), वानिंदू हसरंगा, मयांक यादव, मोहसिन खान (लखनौ सुपर जायंट्स) आणि लॉकी फर्ग्युसन (पंजाब किंग्स) हे खेळाडू सध्या दुखापतग्रस्त आहेत.

logo
marathi.freepressjournal.in