

कोलकाता : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) गुरुवारी ईडन गार्डन्स स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्सची लखनऊ सुपर जायंट्सशी गाठ पडणार आहे. तीन सामन्यांत दोन पराभव व रद्द लढतीच्या एका गुणासह कोलकाता गुणतालिकेत तळाच्या संघांत आहे. मात्र यंदाच्या लिलावातील सर्वाधिक महागडा ठरलेल्या कॅमेरून ग्रीनला अखेर गोलंदाजीसाठी हिरवा कंदील मिळाल्याने कोलकाताला काहीसा दिलासा लाभला आहे. या लढतीवर पावसाचे सावट मात्र कायम आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.
२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. काही लढतींमध्ये धावांचा वर्षाव पाहायला मिळाला, तर काही सामन्यांत गोलंदाजांनी फलंदाजांना रोखले. तसेच बहुतांश लढतींमध्ये नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. यंदादेखील प्रत्येक संघाला १४ सामने खेळायचे आहेत. त्यांपैकी ७ लढती या घरच्या मैदानात, तर उर्वरित ७ लढती प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात होतील.
दरम्यान, मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कोलकाताला या हंगामातील पहिल्या विजयाची अद्याप प्रतीक्षा आहे. मुंबई आणि हैदराबादकडून पराभव पत्करल्यानंतर पंजाबविरुद्ध कोलकाताचा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे त्यांनी किमान एक गुण कमावला. त्यातच लिलावात २५.२० कोटी रुपयांना खरेदी करण्यात आलेला ऑस्ट्रेलियाचा प्रतिभावान अष्टपैलू ग्रीन आतापर्यंत गोलंदाजी करत नव्हता. पाठीच्या दुखापतीतून सावरण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियानेच त्याला तसे सुचवले होते. फलंदाजीतही ग्रीन छाप पाडू शकला नाही व अनुक्रमे १८, २, ४ अशा धावसंख्येवर बाद झाला. मात्र बुधवारी ग्रीन नेटमध्ये गोलंदाजीचा सराव करताना आढळला. त्यामुळे तो गुरुवारी लखनऊविरुद्ध दुहेरी योगदान देण्यास आतुर असेल.
कोलकाताची फलंदाजी ग्रीनसह सलग दोन अर्धशतके झळकावणाऱ्या अंक्रिश रघुवंशी, फिन ॲलन व रहाणे यांच्यावर अवलंबून आहे. रमणदीप सिंग व रिंकू सिंग यांना अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. गोलंदाजीत सुनील नरिन या लढतीसाठी तंदुरुस्त असून तो संघात परतेल. मात्र वरुण चक्रवर्तीविषयी शंका आहे. वरुण दुखापतीमुळे गेल्या लढतीस मुकला होता. कोलकाताचे आधीच हर्षित राणा व आकाश दीप हे वेगवान गोलंदाज स्पर्धेबाहेर गेले आहेत, तर मथीशा पाथिरानाला अद्याप श्रीलंकन क्रिकेट मंडळाने तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण न झाल्याने भारतात दाखल होण्याची परवानगी दिलेली नाही. अशा स्थितीत वैभव अरोरा, ब्लेसिंग मुझरबानी यांच्यावरच कोलकाताची गोलंदाजी अवलंबून आहे.
दुसरीकडे ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या लखनऊने गेल्या लढतीत हैदराबादवर अखेरच्या षटकात मात केली. त्यांचे २ सामन्यांत २ गुण आहेत. पंतला सूर गवसला असून एडीन मार्करम, मिचेल मार्श लयीत आहे. मात्र आयुष बदोनी व अब्दुल समदकडून अपेक्षा आहेत. गोलंदाजीत मोहम्मद शमी आग ओकत असून त्यांचा वेगवान मारा भक्कम आहे. प्रिन्स यादव, आवेश खान व आनरिख नॉर्कियादेखील लखनऊकडे आहेत. फिरकीपटू दिग्वेश राठी चमक दाखवत आहे. त्यामुळे लखनऊ सलग दुसरा विजय नोंदवण्यासाठी आतुर असेल. मात्र पुन्हा एकदा पावसाकडे सर्वांचे लक्ष असेल. वरुणराजाने कृपा केली, तर चाहत्यांना पूर्ण लढत पाहायला मिळेल.
शमीमुळे लखनऊची गोलंदाजी बळकट
लखनऊला अद्याप एकदाही आयपीएलचे जेतेपद मिळवता आलेले नाही. मात्र यंदा हा संघ उत्तम लयीत दिसत आहे. हैदराबादला हरवून लखनऊला सूर गवसला आहे. फलंदाजीत त्यांच्याकडे मिचेल मार्श, एडीन मार्करम व निकोलस पूरन असे विदेशी त्रिकुट आहे. तसेच पंतही लयीत आहे. गोलंदाजीत मोहम्मद शमी प्रभावी मारा करत आहे. शमीसह आवेश खान, प्रिन्स यादव, मोहसिन खान असे पर्याय लखनऊकडे आहेत. फिरकीपटू एम. सिद्धार्थ व दिग्वेश राठी हेदेखील कामगिरी बजावत आहेत. त्यामुळे लखनऊला यंदा कमी लेखणे अन्य संघांना महागात पडू शकते. गतवर्षी लखनऊचा संघ साखळीतच गारद झाला होता. २०२२ व २०२३मध्ये त्यांनी बाद फेरी गाठली होती. यंदा सांघिक कामगिरीच्या बळावर हा संघ छाप पाडण्यास आतुर असेल. मात्र विदेशी खेळाडूंवर अधिक अवलंबून राहणे त्यांच्यासाठी धोक्याचे ठरू शकते. तसेच पंतला तिसऱ्या क्रमांकावर सातत्याने छाप पाडणे गरजेचे आहे.
खेळपट्टी गुलदस्त्यात
कोलकाता येथे बुधवारी सायंकाळी पाऊस पडल्याने दोन्ही संघांचे सराव सत्र रद्द करण्यात आले. त्यामुळे खेळपट्टी झाकून ठेवण्यात आली असून साधारणपणे येथे धावांचा पाठलाग करणे सोपे जाईल. गुरुवारी दुपारीदेखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उभय संघांत आतापर्यंत ६ सामने झाले आहेत. त्यांपैकी लखनऊने ४, तर कोलकाताने २ लढती जिंकल्या आहेत. त्यामुळे आकडेवारी लखनऊच्या बाजूने असून ते ईडन गार्डन्सवर पुन्हा एकदा कोलकाताला धूळ चारणार का, याकडे लक्ष असेल.
प्रतिस्पर्धी संघ
कोलकाता नाइट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग (उपकर्णधार), फिन ॲलन, तेजस्वी दहिया, मनीष पांडे, अंक्रिश रघुवंशी, रमणदीप सिंग, रोवमन पॉवेल, सार्थक रंजन, टिम सेईफर्ट, राहुल त्रिपाठी, दक्ष कामरा, सुनील नरिन, अनुकुल रॉय, कॅमेरून ग्रीन, रचिन रवींद्र, वैभव अरोरा, ब्लेसिंग मुझरबानी, प्रशांत सोलंकी, वरुण चक्रवर्ती, सौरभ दुबे, कार्तिक त्यागी, मथीशा पाथिराना, नवदीप सैनी.
लखनऊ सुपर जायंट्स : ऋषभ पंत (कर्णधार), अक्षत रघुवंशी, मॅथ्यू ब्रीट्झके, हिम्मत सिंग, एडीन मार्करम, अब्दुल समद, आयुष बदोनी, मुकुल चौधरी, जोश इंग्लिस, निकोलस पूरन, वानिंदू हसरंगा, अर्शीन कुलकर्णी, मिचेल मार्श, शाहबाज अहमद, आकाश सिंग, आवेश खान, मोहम्मद शमी, मोहसिन खान, आनरिच नॉर्किए, प्रिन्स यादव, मोहसिन खान, दिग्वेश राठी, मणिमरन सिद्धार्थ, अर्जुन तेंडुलकर, नमन तिवारी, मयांक यादव.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजता g थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप