अखेर श्रेयसचे स्वप्न साकार झाले! कोलकाता नाइट रायडर्सची आयपीएल जेतेपदाला गवसणी

आयपीएलच्या सुरुवातीलाच बीसीसीआयच्या मध्यवर्ती करारातून श्रेयस अय्यरची हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर...
अखेर श्रेयसचे स्वप्न साकार झाले! कोलकाता नाइट रायडर्सची आयपीएल जेतेपदाला गवसणी
छायाचित्र सौजन्य- एक्स @ImHydro45

कोलकाता : आयपीएलच्या सुरुवातीलाच बीसीसीआयच्या मध्यवर्ती करारातून श्रेयस अय्यरची हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर सुरू झाला दुखापतींचा ससेमिरा. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच अनेक वेळा संघर्षमय परिस्थितीला सामोरे जात नवा ‘कॅप्टन कूल’ श्रेयस अय्यरने अखेर कोलकाता नाइट रायडर्सला तिसऱ्यांदा विजेतेपदाचा करंडक जिंकून दिला. त्यासोबतच विजेतेपदासाठी तब्बल १० वर्षे वाट पाहणाऱ्या कोलकातासह श्रेयस अय्यरचेही कर्णधार म्हणून जेतेपद पटकावण्याचे स्वप्न साकार झाले.

यापूर्वी दोन वेळा आयपीएल करंडक उंचावणाऱ्या कोलकाताने २०१४ साली गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली शेवटचे आयपीएल जेतेपद पटकावले होते. मात्र यावेळी श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाखाली खेळणाऱ्या कोलकाताने यंदाच्या मोसमात बाद फेरीसह १६ सामन्यांपैकी फक्त तीन सामने गमावत आणि तब्बल १३ सामने जिंकत आयपीएलवर वर्चस्व गाजवले.

“गौतम गंभीरविषयी मी खूप काही ऐकून होतो. त्याने केकेआरच्या ड्रेसिंगरूममध्ये एक वेगळेच वातावरण निर्माण केले आहे. मात्र श्रेयस अय्यरला त्याचे श्रेय मिळाले नाही, याचे वाईट वाटते. श्रेयस अय्यरलाही याचे श्रेय नक्कीच मिळायला पाहिजे,”असे वेस्ट इंडिजचे महान गोलंदाज इयान बिशप यांनी सांगितले. कोलकाता नाइट रायडर्सने रविवारी रंगलेल्या महामुकाबल्यात सनरायजर्स हैदराबादचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवत सहजपणे आयपीएल जेतेपदावर नाव कोरले.

“जेतेपद पटकावल्यानंतर आता नक्की काय भावना आहेत, हे सांगणेही कठीण जात आहे. कोलकाताची जेतेपदाची प्रतीक्षा दशकभरापूर्वीपासूनची होती. संपूर्ण मोसमात आम्ही चांगली कामगिरी केली, त्यामुळे आता विजयाचे सेलिब्रेशन नक्कीच करायला पाहिजे,” असे श्रेयस अय्यरने सांगितले.

मुंबईकर प्रवीण अमरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेयसची संपूर्ण कारकीर्द घडत गेली. कोलकाताच्या सहप्रशिक्षकपदाच्या भूमिकेत असलेल्या अमरे यांनी श्रेयसकडून चांगली कामगिरी करवून घेतली. आता कोलकाताने तिसरे आयपीएल जेतेपद जिंकल्यानंतर अमरे यांचा आनंदही द्विगुणित झाला आहे. ते म्हणाले की, “मुंबईकडून खेळताना त्याची प्रबळ इच्छाशक्ती मी पाहिली होती. त्यामु‌ळे मी प्रशिक्षक या नात्याने त्याला नेहमीत आव्हान देत असायचो. त्यालाही आव्हाने स्वीकारायला आवडायचे. तुझ्या हातात जे काही आहे, ते तू कर. बाकीच्यांना त्यांचे काम करू दे, असे मी त्याला नेहमीच सांगायचो. त्याचेच फलित म्हणून गेल्या वर्ल्डकपमध्ये त्याने ५३० धावा फटकावल्या होत्या. त्याचबरोबर हे जेतेपदही त्याचेच द्योतक आहे.”

“एक खेळाडू म्हणून त्याने संपूर्ण संघाची कमान ज्याप्रकारे सांभाळली, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. कर्णधार म्हणून परिपक्व होत जाणे, हे त्यापेक्षाही महत्त्वाचे आहे. यश हे अपघाताने मिळत नसते तर त्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागते. प्रत्येकाकडून चांगली कामगिरी करवून घेत त्याने संघाच्या यशात मौल्यवान योगदान दिले, हे स्तुत्यनीय आहे,” असेही अमरे म्हणाले.

श्रेयस अय्यरचा संघर्षाचा काळ

आयपीएलच्या अंतिम फेरीत कर्णधार म्हणून दोन वेगवेगळ्या फ्रँचायझीकडून खेळण्याचा मान त्याने पटकावला. मात्र गेल्या वर्षी पाठीच्या दुखापतीमुळे त्याला आयपीएलच्या संपूर्ण मोसमाला मुकावे लागले होते. गेल्या वर्षी लंडनमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्याने आशिया चषकात पुनरागमन केले. वनडे वर्ल्डकपमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मानंतर सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या भारतीयांच्या यादीत त्याचा तिसरा क्रमांक होता.

हे वर्ष श्रेयससाठी लाभदायी ठरले नाही. इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील पहिल्या दोन्ही सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. दोन सामन्यांत फक्त १४० धावा केल्यामुळे त्याला उर्वरित तीन कसोटी सामन्यांमधून भारतीय संघातून डच्चू देण्यात आला.

बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने तो पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतरही पाठीची दुखापत बळावल्याचे कारण त्याने दिले. त्याने मुंबईकडून रणजी करंडक स्पर्धेत खेळणे अपेक्षित असताना तो केकेआरच्या सराव शिबिरात हजर राहिला. असे करून त्याने विनाकारण वाद ओढवून घेतले.

बीसीसीआयने दट्ट्या देताच तो मुंबईकडून रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यात खेळला. विदर्भविरुद्धच्या अंतिम सामन्यात दुसऱ्या डावात ९५ धावा फटकावत त्याने मुंबईला ४२व्यांदा रणजी करंडक जिंकून दिला.

बीसीसीआयशी पंगा घेतल्यामुळे त्याला ब श्रेणीच्या करारातून डच्चू देण्यात आला. त्याचबरोबर आयपीएलपेक्षा देशांतर्गत क्रिकेटला अधिक प्राधान्य दिले पाहिजे, अशी सक्त ताकीदही त्याला बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली होती.

कॅप्टन कूल म्हणून ओळख

कॅप्टन कूल म्हणून ओळख मिळालेल्या श्रेयस अय्यरने वैयक्तिक विक्रमांपेक्षा संघाच्या कामगिरीत योगदान कसे देता येईल, याला प्राधान्य दिले. त्याने या मोसमात दोन अर्धशतकांसह ३५१ धावा जमवत कोलकाताचा सर्वाधिक धावा फटकावणारा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला. क्वालिफायर-१मध्ये सनरायजर्स हैदराबादचे १६० धावांचे आव्हान पार करताना त्याने नाबाद ५८ धावांची खेळी करत विजयात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती.

logo
marathi.freepressjournal.in