IND vs NZ 1st Test : राहुलचे संयमी शतक; गिलचे शतक दोन धावांनी हुकले, भारताच्या ४ बाद ४८६ धावा, तिसऱ्या दिवसअखेर ११८ धावांची आघाडी

भरवशाचा फलंदाज के. एल. राहुलने संयमी खेळ करत कारकीर्दीतील १३वे कसोटी शतक झळकावले.
IND vs NZ 1st Test : राहुलचे संयमी शतक; गिलचे शतक दोन धावांनी हुकले, भारताच्या ४ बाद ४८६ धावा, तिसऱ्या दिवसअखेर ११८ धावांची आघाडी
IND vs NZ 1st Test : राहुलचे संयमी शतक; गिलचे शतक दोन धावांनी हुकले, भारताच्या ४ बाद ४८६ धावा, तिसऱ्या दिवसअखेर ११८ धावांची आघाडी
Published on: 

वेलिंग्टन : भरवशाचा फलंदाज के. एल. राहुलने संयमी खेळ करत कारकीर्दीतील १३वे कसोटी शतक झळकावले. त्यानंतर कर्णधार शुभमन गिलने आक्रमक फलंदाजी करत शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचूनही त्याला अवघ्या दोन धावांनी शतकाला हुलकावणी दिली. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवस अखेर ४ बाद ४८६ धावा करत भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध मजबूत स्थितीत पोहोचला आहे.

भारताकडे आता ११८ धावांची आघाडी असून, चौथ्या दिवशी उपाहारापर्यंत ही आघाडी आणखी वाढवण्याचा संघाचा प्रयत्न ज. युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलनेही सलग तिसऱ्या शतकाची संधी गमावली. त्याने १७५ चेंडूंमध्ये ८० धावा केल्या. पडिक्कल आणि राहुल यांनी दुसऱ्या विकेटसाठी १६५ धावांची भागीदारी केली. यापूर्वी दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस यशस्वी जैस्वालने ८९ चेंडूंमध्ये ८५ धावांची शानदार खेळी केली होती.

राहुलची खेळी पारंपरिक कसोटी फलंदाजीचा नमुना होती. संयम, ठाम बचाव आणि योग्य चेंडूंची निवड यावर त्याने भर दिला. त्याउलट गिलने आक्रमक पवित्रा घेत कट आणि पुलचे फटके जोरदारपणे खेळले. दिवसाच्या अखेरच्या षटकात जेकब डफीने त्याला त्रिफळाचीत केले. गिलने १४६ चेंडूंमध्ये ९८ धावा केल्या.

डफीच्या गोलंदाजीवर पुलचा षटकार मारून गिलने अर्धशतक पूर्ण केले आणि भारताला पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली. ग्लेन फिलिप्स पुन्हा गोलंदाजीला आल्यावर गिलने त्याच्या चेंडूवर लाँगऑफच्या दिशेने सहज षटकार मारला. त्यानंतर पायांचा सुंदर वापर करत ऑन-ड्राइव्हने चौकारही मिळवला. गिलच्या खेळीतून भारताला चौथ्या डावात फलंदाजी करण्याची वेळ टाळण्याचा निर्धार दिसून आला. मोठी आघाडी घेऊन न्यूझीलंडला किमान साडेचार सत्रे गोलंदाजी करण्याची संधी देण्याची भारताची रणनीती आहे. राहुल अखेरच्या टप्प्यात थोडा संथ झाला होता. त्यामुळे गिलला आक्रमक खेळ करून भारताची आघाडी वाढवण्याची संधी मिळाली. त्याला ऋषभ पंतची चांगली साथ मिळाली. पंतने डफीच्या गोलंदाजीवर डीप फाइन लेगच्या दिशेने सलग दोन षटकार मारले. त्यानंतर डफीवर पुढे येत डीप मिडविकेटच्या दिशेने टेनिसमधील फोरहँडसारखा फटका मारून त्याने कसोटी क्रिकेटमधील २२वे अर्धशतक पूर्ण केले. पंत आणि गिल यांनी चौथ्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडचा डफी सूर पूर्णपणे विसरला होता. त्याला गोलंदाजीमध्ये योग्य टप्पा शोधण्यात सातत्याने अडचणी आल्या. त्याने चेंडू वाइड टाकल्यावर गिलने कटचे फटके मारून त्याची धुलाई केली. चेंडू आखूड टाकल्यावर गिलने जोरदार पुल केले. नॅथन स्मिथने पायावर चेंडू टाकल्यावर गिलने सहज ऑन-ड्राइव्ह खेळला.

राहुलने पुन्हा एकदा आपल्या शैलीनुसार शांत आणि संयमी फलंदाजी केली. नऊ चौकार आणि ग्लेन फिलिप्सच्या गोलंदाजीवर लाँग-ऑनच्या दिशेने मारलेल्या षटकारासह त्याने एकेरी-दुहेरी धावा घेत डाव पुढे नेला. सहा फूट दोन इंच उंच पडिक्कलनेही चांगली साथ दिली. त्याने अनेक कटचे फटके खेळत कसोटीतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले.

उपाहारानंतरच्या सत्रात चेंडूला हलका स्पर्श करून एक धाव घेत राहुलने आपले १३वे कसोटी शतक पूर्ण केले. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया (सेना देश) या चारही देशांमध्ये कसोटी शतक झळकावणारा तो सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझहरुद्दीन आणि राहुल द्रविड यांच्यानंतरचा भारताचा चौथा फलंदाज ठरला.

पडिक्कलने दुसऱ्या सकाळी संयम आणि चांगला खेळाचा अंदाज दाखवला. खराब चेंडूंची वाट पाहन त्याने धावा केल्या. अर्धशतकानंतर त्याचा वेग थोडा मंदावला, मात्र तोपर्यंत बंगळुरूच्या राहुल आणि पडिक्कल या जोडीने भारताच्या मोठ्या पहिल्या डावाचा पाया रचला होता. काइल जेमिसनने अँगलने आत येणारा सुंदर चेंडू टाकत पडिक्कलला बाद केले. गिल मैदानात आल्यानंतर त्याने लगेच आक्रमक खेळ सुरू केला. राहुलच्या योगदानासह या भागीदारीत ९१ धावा झाल्या. राहुल चेंडू खेळताना बोल्ड झाल्यानंतर पंत आणि गिल यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर आक्रमण करत धावांचा वेग वाढवला.

'डब्ल्यूटीसी 'मध्ये गिलच्या ३ हजार धावा

भारताचा कर्णधार शुभमन गिलने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) इतिहासात ३ हजार धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाज होण्याचा मान मिळवला. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी गिलने ९८ धावांची दमदार खेळी करत हा विक्रम नोंदवला. त्याच डावात यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतनेही ३ हजार धावांचा टप्पा पार केला. १२३व्या षटकात चौकार मारून त्याने हा विक्रम पूर्ण केला. त्याचवेळी पंतने कसोटी कारकीर्दीतील २२वे अर्धशतकही झळकावले.

'सेना' देशांत राहुलचा विक्रम

लोकेश राहुलने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी शतक झळकावत ऐतिहासिक कामगिरी केली. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया (सेना) या चारही देशांत कसोटी शतके झळकावणारा तो भारताचा पहिला सलामीवीर ठरला. बेसिन रिझर्व्ह येथे शनिवारी २०७ चेंडूंमध्ये शतक पूर्ण करत त्याने हा विक्रम नोंदवला. 'सेना' देशांत कसोटी शतके झळकावणारा राहुल हा भारताचा पाचवा आणि आशियातील आठवा फलंदाज ठरला. त्याच्यापूर्वी मोहम्मद अझहरुद्दीन, सचिन तेंडुलकर, सईद अन्वर, राहुल द्रविड, युनूस खान, कुमार संगकारा आणि विराट कोहली यांनी ही कामगिरी केली आहे. राहुलने आता सात वेगवेगळ्या देशांत कसोटी शतके झळकावली आहेत. भारतीय फलंदाजांमध्ये अझहरुद्दीन, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग आणि विराट कोहली यांनीही सात देशांत कसोटी शतके झळकावली आहेत. राहुल द्रविड (१० देश) आणि सचिन तेंडुलकर (९ देश) हे - या यादीत आघाडीवर आहेत.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)