पर्थ : सरावादरम्यान खेळाडू जायबंदी होत असल्याने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बॉर्डर - गावस्कर मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झाली होती. मात्र रविवारी भारतासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दुखापतग्रस्त झालेला संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने रविवारी नेटमध्ये कसून सराव केल्याची चर्चा आहे. त्यामुळे २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी त्याच्या फिटनेसची चिंता आता जवळपास दूर झाली असल्याचे समजते. रोहितच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करेल.
सरावादरम्यान अंगठ्याला दुखापत झाल्याने शुभमन गिल पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर जाण्याची शक्यता आहे. कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात त्याच्याही खेळण्याबाबत साशंकता आहे. त्यामुळे फलंदाजीतील आघाडीच्या फळीची चिंता भारताला आहे. मात्र आता केएल राहुलने नेटमध्ये सराव केल्याने भारतीय व्यवस्थापनाला दिलासा मिळाला आहे.
डब्लूएसीए मैदानात आपल्याच संघातील खेळाडूंमध्ये सुरू असलेल्या सराव सामन्यादरम्यान शुक्रवारी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर केएल राहुलच्या कोपराला दुखापत झाली होती. वैद्यकीय उपचारासाठी
त्याला मैदान सोडावे लागले होते. त्यामुळे भारताची चिंता वाढली होती. दरम्यान रविवारी या ३२ वर्षीय अनुभवी फलंदाजाने ३ तासांच्या नेट सत्रात सहभाग घेतला. यावेळी त्याने बराच वेळ फलंदाजी केली. तसेच संपूर्ण वर्मअपही केला.
राहुल आता तंदुरुस्त वाटत आहे. आणखी काही दिवस फिजिओंमार्फत त्याच्यावर लक्ष ठेवले जाणार असल्याचे बीसीसीआयमधील सूत्राने सांगितले.
गिलच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले असल्याने तो पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्थवर होणाऱ्या पहिल्या सामन्यात राहुल सलामीला येऊ शकतो.
संघाचा उपकर्णधार जसप्रित बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी नेट्समध्ये कसून सराव केला. भारतीय खेळाडूंनी डब्ल्यूएसीए मैदानावरचा सराव संपवला आहे. सोमवारच्या विश्रांतीनंतर पाहुणे सामन्यासाठी मंगळवारी ऑप्टस स्टेडियममध्ये दाखल होतील.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर - गावस्कर मालिकेसाठी ५ कसोटी सामने होणार आहेत. या मालिकेला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून संघातील खेळाडूंच्या दुखापतीमुळे भारताची चिंता वाढली होती. मात्र आता राहुल जवळपास तंदुरुस्त झाल्याने भारतासाठी दिलासादायक बाब आहे. त्याच्या तंदुरुस्तीवर बीसीसीआयचे व्यवस्थापन लक्ष ठेवून राहणार आहे.
देवदत्त पडिक्कल ऑस्ट्रेलियातच थांबणार
टॉप ऑर्डर फलंदाज देवदत्त पडिक्कलला भारतीय संघ व्यवस्थापनाने बॅक अप फलंदाज म्हणून ऑस्ट्रेलियातच थांबण्यास सांगितले आहे. देवदत्त हा भारतीय अ संघाचा भाग होता. या संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार दिवसांचे दोन सामने नुकतेच खेळले. हा डावखुरा फलंदाज सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत कर्नाटकच्या संघात होता. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात अ संघाकडून खेळताना ३६, ८८, २६, १ अशा खेळी खेळल्या.
शमी ऑस्ट्रेलियाला जाणार?
भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे आंतरराष्ट्रीय पुनरागमन बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये होण्याची शक्यता आहे. परंतु ते मालिकेतील चौथ्या, पाचव्या सामन्यांत होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शमीने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आणखी काही सामने खेळावेत अशी इच्छा बीसीसीआयचे वैद्यकीय अधिकारी आणि राष्ट्रीय निवडकर्ते यांची आहे. दरम्यान वर्षभरानंतर शमीने स्पर्धात्मक सामन्यांत पुनरागमन केले. शमीने इंदूर येथे मध्य प्रदेश विरुद्धच्या सामन्यात बंगालसाठी प्रभावी कामगिरी केली.