
के एल राहुलची कर्णधारपदी नियुक्त करत त्याला झिम्बाब्वे दौऱ्यावर पाठविण्यात आले; पण फलंदाज म्हणून त्याला या दौऱ्यात चमकदार कामगिरी करण्यात अपयश आले. त्यामुळे त्याचे संघातील स्थान धोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पहिल्या सामन्यात राहुल सलामीला आला नव्हता. दुसऱ्या सामन्यात सलामीला आला, तेव्हा त्याला पाच चेंडूत एक धाव करता आली. आशिया चषक २०२२ पूर्वी त्याला फॉर्मसाठी वेळ मिळण्याची शेवटची संधी होती; परंतु शेवटच्या सामन्यातही त्याने ४६ चेंडूंत ३० धावा केल्या.
या पार्श्वभूमीवर आशिया चषक २०२२ च्या प्लेइंग इलेव्हनमधून त्याचा पत्ता कापला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कारण अनेक खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. आशिया चषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना २८ ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्ध आहे आणि भारतीय व्यवस्थापन फॉर्ममध्ये नसलेल्या खेळाडूंचा प्लेइंग इलेव्हनमधील समावेश टाळण्याची शक्यता आहे. यामुळे प्लेइंग इलेव्हनची सर्व समीकरणे बिघडणार आहेत. राहुलला सलामीसाठी पाठविल्यास विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळेल आणि सूर्यकुमार यादवला चौथ्या क्रमांकावर खेळावे लागेल.
ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर राहील. हार्दिक पंड्या सहाव्या क्रमांकावर असेल. या स्थितीत दिनेश कार्तिकची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड करायची की, दीपक हुडाला संधी द्यायची, असा प्रश्न उपस्थित होणार आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी प्लेइंग इलेव्हनमधून राहुललाच डच्चू मिळण्याचे संकेत दिसत आहेत.