महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने आयोजित केलेल्या महाराष्ट्र प्रिमियर लीग (MPL)स्पर्धेचे उद्धाटन दिमाखात पार पडले. यावेळी झालेल्या सलामीच्या सामन्यात पुणेरी बाप्पाने कोल्हापूर टस्कर्सचा पराभव केला आहे. ऋतुराज गायकवाड नेतृत्व करत असलेल्या पुणे संघाने केदार जाधव नेतृत्व करत असलेल्या कोल्हापूर संघावर आठ विकेटने विजय मिळवला आहे. कोल्हापूर संघाच्या १४५ धावांच्या पाठलाग करत ऋतुराज गायकवाड आणि पवन शाह यांनी वादळी सुरवात केली. १० षटकात दोघांनी ११० धावांची सलामी दिली. यावेळी ऋतुराजने २७ धावांत ६४ धावांची खेळी केली. ही खेळी करताना त्याने ५ चौकार आणि ५ षटकारांचा पाऊस पाडला. तर पवन शाह याने ६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४८ चेंडूत ५७ धावांची खेळी केली.
नाणेफेक जिंकत पुणे संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी कोल्हापूर संघाने अंकित बावणेच्या ५७ चेंडूत ७२ धावांचा डोंगर रचला. कोल्हापूर संघाने २० षटकात ७ बाद १४४ धावांची मजल मारली. यावेळी एमपीएलमधला सर्वात महाग खेळाडू नौशाद शेख २४ चेंडूत फक्त २० धावा करुन माघारी परतला. कोल्हापूर संघाच्या केदार जाधव आणि अंकित बावणे या जोडीने संघाला दमदार सलामी दिली. या दोघांनी मिळून ८ षटकात ६५ धावांची भागिदारी केली. केदार जाधव बाद झाल्यानंतर अंकितने सुत्रे हाती घेत ५७ चेंडूत ७२ धावांची खेळी केली.