आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेत कोल्हापूरच्या निकिता कमलाकरने पटकावले रौप्यपदक

निकिताने एकूण १६३ किलो वजन पेलून दुसरा क्रमांक मिळवला.
आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेत कोल्हापूरच्या निकिता कमलाकरने पटकावले रौप्यपदक
Published on

आशियाई युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेत कोल्हापूरच्या निकिता कमलाकरने रौप्यपदक जिंकले. निकिताच्या आधी पुण्याच्या हर्षदा गरुडने सोमवारी सुवर्णपदक जिंकले होते.

अपंग चहाविक्रेत्याची मुलगी असलेल्या निकिताने ५५ किलो गटात स्नॅचमध्ये ६८ किलो वजन पेलल्यामुळे तिला या प्रकारात सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते; पण तिने क्लीन अॅण्ड जर्कमध्ये सर्वाधिक ९५ किलो वजन उचलून गटातील रौप्यपदक जिंकले. निकिताने एकूण १६३ किलो वजन पेलून दुसरा क्रमांक मिळवला.

तीन वर्षांपू्र्वी खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या निकिताने गत वर्षीच्या पतियाळा येथील राष्ट्रीय युवा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.

वेटलिफ्टिंगमधील तिचे कौशल्य चंदू माळी यांनी हेरून तिला मार्गदर्शन केले. सुरुवातीस आई-वडिलांनी कर्ज काढून खुराक उपलब्ध करून दिला. सातत्यपूर्ण यशामुळे तिची राष्ट्रीय शिबिरात निवड झाली. ही निवड योग्य असल्याचे तिने आशियाई स्पर्धेत रौप्यपदक जिंकून दाखवून दिले.

जागतिक स्पर्धेत पदक हुकल्यामुळे निकिता निराश झाली होती. त्या वेळी तिने आशियाई स्पर्धेत पदक जिंकण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला होता. तिने आपला शब्द खरा केला, असे तिचे प्रशिक्षक चंदू माळी यांनी सांगितले.

आपल्या मुलीने आशियाई पदक जिंकल्यामुळे निकिताचे वडील पांडुरंग खूश झाले. दोन्ही पायांनी अपंग असलेले पांडुरंग सायकलवरून चहा विकतात, तर निकिताची आई अनिता नर्स आहे. आमच्या कोल्हापूरचे नाव तिने उंचावले, अशी भावना पांडुरंग यांनी व्यक्त केली.

logo
marathi.freepressjournal.in