IPL: विजेतेपदासाठी आज महामुकाबला! कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद एकमेकांशी झुंजणार

KKR vs SRH: तब्बल ७० लीग सामने आणि ३ प्ले-ऑफ लढतींनंतर अखेर तब्बल दोन महिन्यांनी आयपीएल अखेरच्या टप्प्यात आली आहे. दोन वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावणारा कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद रविवारी रंगणाऱ्या महामुकाबल्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर विजेतेपदासाठी एकमेकांशी झुंजतील.
IPL: विजेतेपदासाठी आज महामुकाबला! कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद एकमेकांशी  झुंजणार

चेन्नई : तब्बल ७० लीग सामने आणि ३ प्ले-ऑफ लढतींनंतर अखेर तब्बल दोन महिन्यांनी आयपीएल अखेरच्या टप्प्यात आली आहे. दोन वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावणारा कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद रविवारी रंगणाऱ्या महामुकाबल्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर विजेतेपदासाठी एकमेकांशी झुंजतील.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या आयपीएलमधील क्वालिफायर-१ सामन्यात कोलकाताने सनरायजर्सवर आठ विकेट्सनी विजय मिळवला होता. तर सनरायजर्सने क्लालिफायर-२ सामन्यांत राजस्थान रॉयल्सचे आव्हान परतवून लावत अंतिम फेरीत धडक मारली आहे. कोलकाताने गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली २०१२ आणि २०१४ साली आयपीएल करंडक उंचावला होता. आता पुन्हा एकदा गौतम गंभीरच्याच मार्गदर्शनाखाली कोलकाता संघ तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे. पूर्वीचा डेक्कन चार्जर्स संघ असताना २००९ साली तर सनरायजर्स हैदराबाद नामकरण झाल्यानंतर २०१६ साली आयपीएलच्या जेतेपदावर मोहोर उमटवली होती. तसेच सनरायजर्सला २०१८ साली जेतेपदाने हुलकावणी दिली होती.

श्रेयस अय्यर कर्णधार म्हणून दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत उतरणार आहे. त्याचा सामना पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायजर्सशी होणारआहे. दशकभरापूर्वी कमिन्स कर्णधार होईल, असे कुणाला स्वप्नातही वाटले नव्हते. पण त्याने वनडे वर्ल्डकप, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आणि ॲॅशेस मालिका या सहा महिन्यांच्या कालावधीत जिंकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. आता तो सनरायजर्सला आयपीएलचे जेतेपद मिळवून देण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचबरोबर भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी उत्सुक असलेल्या गंभीरने कोलकाता आयपीएल करंडक जिंकून दिल्यास, त्याची दावेदारी अधिक मजबूत होईल.

कोलकाताकडे सुनील नरिन, आंद्रे रस्सेल हे वेस्ट इंडिजचे अष्टपैलू, रिंकू सिंग, श्रेयस आणि व्यंकटेश हे दोन अय्यर तसेच नितीश आणि हर्षित हे दोन राणा त्याचबरोबर फिरकीपटू वरुण चक्रवर्ती हे प्रमुख खेळाडू आहेत. त्यापैकी नरिन हा जबरदस्त फॉर्मात असून त्याने यंदाच्या मोसमात १३ सामन्यांत ४८२ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर आयपीएलमधील पहिले शतक झळकावण्याचा मानही त्याने काही आठवड्यांपूर्वी मिळवला आहे. वरुण चक्रवर्तीने यंदा कोलकातासाठी सर्वाधिक २० विकेट्स मिळवल्या आहेत. सनरायजर्सविरुद्धच्या गेल्या सामन्यात व्यंकटेश (५१) आणि श्रेयस (५८) यांच्या अर्धशतकामुळे १५९ धावांचे आव्हान अवघ्या १३.४ षटकांत पार करून कोलकाताने अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे फायनलमध्ये कोलकाताचे पारडे जड मानले जात आहे.

सनरायजर्ससाठी ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या दोन्ही सलामीवीरांनी आपल्या कामगिरीत सातत्य राखले आहे. ट्रेव्हिस हेडने ५६७ तर अभिषेकने ४८२ धावा फटकावल्या आहेत. गोलंदाजीत टी. नटराजन सर्वात यशस्वी ठरला असून त्याच्या नावावर १९ विकेट्स जमा आहेत. क्वालिफायर-२ सामन्यात राजस्थान रॉयल्सवर ३६ धावांनी विजय मिळवल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. सनरायजर्सचे फिरकीपटू चांगल्या फॉर्मात असल्यामुळे ते कोलकाताला चांगली लढत देऊ शकतात. ट्रेव्हिस आणि हेन्रिच क्लासेन हे कोणत्याही खेळपट्टीवर चांगली कामगिरी करण्यात वाकबगार आहेत.

खेळपट्टी आणि वातावरणाचा अंदाज

> चेन्नईत सध्या तापमानाचा पारा वाढला असून सध्या ३२ तापमान असले तरी ३७ अंश सेल्सियस इतके चटके जाणवत आहेत. पाऊस पडण्याची फक्त तीन टक्के शक्यता आहे.

> चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी ही धीम्या गतीची म्हणून ओळखली जाते. खेळपट्टीकडून फिरकीपटू आणि धीम्या गतीच्या गोलंदाजांना मदत मिळते. धावांची पाऊस पडणारी ही खेळपट्टी नसल्यामुळे एमए चिदंबरम स्टेडियमवर गोलंदाजांचे वर्चस्व राहणार, हे जवळपास निश्चित आहे.

आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आतापर्यंत २७ वेळा एकमेकांशी झुंजले असून त्यात कोलकाताने १८ तर सनरायजर्सने ९ सामन्यांत बाजी मारली आहे. उभय संघांमधील गेल्या ६ सामन्यांत कोलकाता संघ ४ वेळा विजयी ठरला आहे.

आयपीएलच्या प्ले-ऑफ किंवा बाद फेरीत कोलकाता आणि सनरायजर्स हे दोन्ही संघ आतापर्यंत ४ वेळा एकमेकांशी भिडले आहेत. त्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी २ वेळा विजय मिळवला आहे. कोलकाताने यंदाचा क्वालिफायर-१ तर २०१७ साली एलिमिनेटर सामना जिंकला होता. सनरायजर्सने २०१६ एलिमिनेटर आणि २०१८ क्लालिफायर-२ लढत जिंकली होती.

एमए चिदंबरम स्टेडियमवर उभय संघात आतापर्यंत एकदाच लढत झाली असून त्यात कोलकाताने १० धावांनी विजय मिळवला होता. कोलकाताचे १८७ धावांचे आव्हान पार करताना मनीष पांडे आणि जॉनी बेअरस्टो यांच्या अर्धशतकांनंतरही सनरायजर्सला १७७ धावाच करता आल्या.

यंदाच्या मोसमात कोलकाताने गेल्या पाच लढतींत विजय मिळवला आहे. सनरायजर्सला गेल्या तीनपैकी दोन सामने जिंकता आले आहेत. कोलकाताने १५पैकी १० सामने तर सनरायजर्सने ९ सामने जिंकले असून एक लढत अनिर्णीत राहिली आहे.

हैदराबाद सर्वाधिक धावा

ट्रेव्हिस हेड

(५६७, १ शतक, ४ अर्धशतके)

सर्वाधिक बळी टी. नटराजन

(१३ सामन्यांत १९ बळी)

कोलकाता सर्वाधिक धावा

सुनील नरिन

(४८२, १ शतक, ३ अर्धशतके)

सर्वाधिक बळी वरुण चक्रवर्ती

(१४ सामन्यांत २० बळी)

प्रतिस्पर्धी संघ

> कोलकाता नाइट रायडर्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव अरोरा, मिचेल स्टार्क, श्रीकर भरत, दुश्मंता चमीरा, हर्षित राणा, वेंकटेश अय्यर, मुजीब उर रहमान, सुनील नरिन, मनीष पांडे, अंक्रिश रघुवंशी, रहमनुल्ला गुरबाझ, रमणदीप सिंग, नितीश राणा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, शर्फेन रुदरफोर्ड, चेतन साकरिया, सकिब हुसैन, फिल सॉल्ट, रिंकू सिंग, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती.

> सनरायजर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), अब्दुल समद, अभिषेक शर्मा, मयांक अगरवाल, आकाश सिंग, अनमोलप्रीत सिंग, फझलहक फारुकी, ट्रेव्हिस हेड, मार्को यान्सेन, हेनरिच क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयांक मार्कंडे, एडिन मार्करम, टी. नटराजन, नितीश रेड्डी, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, शाहबाज अहमद, जठवेध सुब्रमण्यम, राहुल त्रिपाठी, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर, उपेंद्र यादव, विजयकांत वियासकांत.

> वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून

> थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनी आणि जिओ सिनेमा ॲप

logo
marathi.freepressjournal.in