कोलकाताच्या खेळाडूंसाठी ‘ते’ २० तास धोक्याचे!

लखनऊ ते कोलकाता असा प्रवास करणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सच्या खेळाडूंना सोमवार, मंगळवारी धक्कादायक प्रवासाला सामोरे जावे लागले...
कोलकाताच्या खेळाडूंसाठी ‘ते’ २० तास धोक्याचे!

नवी दिल्ली : लखनऊ ते कोलकाता असा प्रवास करणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सच्या खेळाडूंना सोमवार, मंगळवारी धक्कादायक प्रवासाला सामोरे जावे लागले. खराब हवामानामुळे त्यांचे विमान अनेक वेळा इतरत्र हलवण्यात आल्यामुळे त्यांना वाराणसीमध्ये रात्रीचा मुक्काम ठोकावा लागला.

लखनौ सुपर जायंट्सवर ९८ धावांनी विजय मिळवल्यानंतर कोलकाताचे खेळाडू सोमवारी दुपारी ५.४५ वाजताच्या सुमारास चार्टर्ड विमानाने निघाले होते. पण कोलकातामध्ये विमान उतरवणे शक्य नसल्याने त्यांचे विमान आधी गुवाहाटी आणि नंतर वाराणसी येथे उतरवण्यात आले. अखेर त्यांचे विमान मंगळवारी दुपारी कोलकाता येथे पोहोचले. त्यामुळे कोलकाताच्या खेळाडूंना वाराणसी येथे रात्र घालवावी लागली. याचा फायदा उठवत कोलकाताच्या खेळाडूंनी वाराणसीमधील श्री काशी विश्वनाथ मंदिराला भेट देऊन गंगाघाट येथे आरतीही केली.

“कोलकातामध्ये विमान उतरवण्याचे अनेक वेळा प्रयत्न करूनही खराब हवामानामुळे आम्हाला विमान गुवाहाटीला घेऊन जावे लागले. त्यानंतर वाराणसी येथे आम्ही रात्रीचा मुक्काम ठोकला. जवळपास २० तासांच्या कालावधीनंतर आम्ही कोलकातामध्ये पोहोचलो,” असे कोलकाता नाइट रायडर्सच्या मीडिया टीमने सांगितले. सुदैवाने कोलकाताचा पुढील सामना मुंबई इंडियन्सशी ११ मे रोजी ईडन गार्डन्स स्टेडियमवर रंगणार आहे. त्यानंतर कोलकाताला १३ मे रोजी गुजरात टायटन्सशी अहमदाबाद येथे तर राजस्थान रॉयल्सशी १९ मे रोजी गुवाहाटी येथे लढावे लागणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in