कोलकाता तिसऱ्यांदा आयपीएल किंग! एकतर्फी अंतिम फेरीत सनरायजर्स हैदराबादवर ८ गडी आणि ५७ चेंडू राखून वर्चस्व

वेगवान गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याला फलंदाजांच्या आक्रमक फटकेबाजीची उत्तम साथ लाभली. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) अंतिम फेरीत सनरायजर्स हैदराबादचा ८ गडी आणि ५७ चेंडू राखून धुव्वा उडवला.
कोलकाता तिसऱ्यांदा आयपीएल किंग! एकतर्फी अंतिम फेरीत सनरायजर्स हैदराबादवर ८ गडी आणि ५७ चेंडू राखून वर्चस्व
Twitter

चेन्नई : वेगवान गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याला फलंदाजांच्या आक्रमक फटकेबाजीची उत्तम साथ लाभली. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) अंतिम फेरीत सनरायजर्स हैदराबादचा ८ गडी आणि ५७ चेंडू राखून धुव्वा उडवला. याबरोबरच कोलकाताने तिसऱ्यांदा आयपीएल किंग ठरण्याचा मान मिळवला. डावखुरा मिचेल स्टार्क (१४ धावांत २ बळी) कोलकाताच्या विजयाचा खऱ्या अर्थाने शिल्पकार ठरला.

चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या लढतीत हैदराबादचा अवघ्या १८.३ षटकांत ११३ धावांत खुर्दा केल्यानंतर कोलकाताने १०.३ षटकांत दोन फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. रहमनुल्ला गुरबाझने ३२ चेंडूंत ३९, तर वेंकटेश अय्यरने २६ चेंडूंतच नाबाद ५२ धावांची खेळी साकारून कोलकाताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. २०१२ आणि २०१४नंतर कोलकाताने तिसऱ्यांदा आयपीएलच्या चषकावर नाव कोरले. दुसरीकडे हैदराबादला २०१८ नंतर पुन्हा एकदा अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.

गेल्या २ महिन्यांच्या थरारानंतर अंतिम फेरीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या या स्पर्धेत चाहत्यांना शेवटच्या लढतीत कडवा संघर्ष अपेक्षित होता. मात्र कोलकाताच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांना पूर्णपणे निष्प्रभ केले. हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. स्टार्कने पहिल्याच षटकात अफलातून चेंडू टाकून अभिषेक शर्माचा (२) त्रिफळा उडवला. पुढच्याच षटकात वैभव अरोराने धोकादायक ट्रेव्हिस हेडला भोपळाही फोडू न देता माघारी पाठवले. या दोन धक्क्यानंतर हैदराबाद सावरूच शकला नाही.

स्टार्कने राहुल त्रिपाठीला (९) पाचव्या षटकात माघारी पाठवले. हर्षित राणाने मग नितीश रेड्डीला (१३) बाद केले. हेनरिच क्लासेन व एडीन मार्करम यांच्याकडून हैदराबादला अपेक्षा होती. मात्र राणाने क्लासेनला १६ धावांवर, तर आंद्रे रसेलने मार्करमला (९) जाळ्यात अडकवून हैदराबादची ८ बाद ९० अशी अवस्था केली. कमिन्सने १९ चेंडूंत २४ धावा फटकावून संघाला किमान तीन आकडी धावसंख्या गाठून दिली. मात्र रसेलने कमिन्सला बाद करून हैदराबादचा डाव ११३ धावांवर संपुष्टात आणला. कमिन्सच या सामन्यात हैदराबादसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. कोलकातासाठी आंद्रे रसेलने तीन, तर स्टार्क, राणा यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताने सुनील नरिनला (६) दुसऱ्याच षटकात गमावले. मात्र त्यानंतर गुरबाझने ५ चौकार व २ षटकारांसह ३९, तर वेंकटेशने ४ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ५२ धावा केल्या. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी रचली. गुरबाझ बाद झाल्यावर वेंकटेशने श्रेयसच्या (नाबाद ६) साथीने कोलकाताचा विजय साकारला. शाहबाज अहमदच्या ११व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर वेंकटेशने एकेरी धाव घेत कोलकाताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आणि मार्गदर्शक गौतम गंभीर, प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्यासह संघमालक शाहरूख खाननेही जल्लोष केला.

logo
marathi.freepressjournal.in