घरच्या मैदानावर विजयासाठी कोलकाता उत्सुक; लखनऊ सुपर जायंट्सशी आज भिडणार

कोलकाताने बाहेरच्या मैदानावर झालेल्या चार सामन्यांत तीन विजय आणि एक पराभव असे ६ गुण प्राप्त केले. आता कोलकाताचे सलग पाच सामने घरच्या मैदानावर रंगणार आहेत. त्यापैकी पहिला सामना रविवारी लखनौविरुद्ध होत आहे.
घरच्या मैदानावर विजयासाठी कोलकाता उत्सुक; लखनऊ सुपर जायंट्सशी आज भिडणार

कोलकाता : दोन वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावणारा कोलकाता नाइट रायडर्स आता घरच्या मैदानावर विजयपथावर परतण्यासाठी उत्सुक आहे. रविवारी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात कोलकाताचा संघ चौथा विजय मिळवून अग्रस्थानाची दावेदारी पेश करण्यासाठी सज्ज झाला आहे.

कोलकाताने बाहेरच्या मैदानावर झालेल्या चार सामन्यांत तीन विजय आणि एक पराभव असे ६ गुण प्राप्त केले. आता कोलकाताचे सलग पाच सामने घरच्या मैदानावर रंगणार आहेत. त्यापैकी पहिला सामना रविवारी लखनौविरुद्ध होत आहे. त्यामुळे २०२१नंतर पहिल्यांदा प्ले-ऑफ फेरीचे स्थान पटकावण्यासाठी कोलकाता संघ उत्सुक आहे.

कोलकाता संघ सुनील नरिन आणि आंद्रे रस्सेल या वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर पूर्णपणे अवलंबून आहे. मात्र चेन्नईविरुद्धच्या गेल्या सामन्यात कोलकाताचे हे दोन्ही सुपरस्टार अपयशी ठरले. त्यामुळे त्यांना चेन्नईविरुद्ध सात विकेट्सनी पहिला पराभव पत्करावा लागला. कोलकाताने याआधीच्या तीन सामन्यांत २००पेक्षा जास्त धावा फटकावल्या होत्या. मात्र नरिन (२७) आणि रस्सेल (१०) हे अपयशी ठरल्यामुळे कोलकाताला चेन्नईविरुद्ध ९ बाद १३७ धावाच उभारता आल्या. नितीश राणा बोटाच्या दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकला नव्हता. तसेच कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर मोठी फटकेबाजी करण्यात अपयशी ठरत आहे. त्याने आतापर्यंत ०, नाबाद ३९, १८ आणि ३४ अशा धावा केल्या आहेत. त्याचबरोबर भरवशाचा फलंदाज व्यंकटेश अय्यर यालाही अद्याप सूर गवसलेला नाही. १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघातील अंगरिक्ष रघुवंशी याने दिल्लीविरुद्ध ५४ धावा केल्या होत्या. मात्र चेन्नईविरुद्ध त्यालाही मोठी खेळी करता आली नव्हती. मिचेल स्टार्कचा खराब फॉर्म कोलकाताची चिंता वाढवत आहे. सनरायजर्स हैदराबादला या सामन्यात मयांक यादवची अनुपस्थिती जाणवणार आहे. पाठीच्या दुखापतीमुळे त्याने गुजरातविरुद्धच्या सामन्यातूनही माघार घेतली होती. मयांकच्या जागी संधी मिळालेल्या अर्शद खानला चमक दाखवता आली नाही. मोहसिन खान याने पंजाबविरुद्ध दोन विकेट्स मिळवले होते, मात्र तोसुद्धा मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे खेळू शकत नाही. क्विंटन डीकॉक आणि लोकेश राहुल यांच्यावर लखनऊची सर्व मदार अवलंबून आहे. मार्कस स्टॉइनिस आणि निकोलस पूरन यांसारखे चांगले फलंदाज त्यांच्याकडे आहेत. तसेच गोलंदाजीत रवी बिश्णोई आणि कृणाल पंड्या यांसारखे फिरकीपटूही उपलब्ध आहेत.

प्रतिस्पर्धी संघ

कोलकाता नाइट रायडर्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), केएस भारत, रहमतुल्ला गुरबाझ, रिंकू सिंग, अंगरिक्ष रघुवंशी, शेरफाने रुदरफोर्ड, मनीष पांडे, आंद्रे रस्सेल, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, अनुकूल रॉय, रमनदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, सुनील नरिन, वैभव अरोरा, चेतन सकारिया, हर्षित राणा, सुयश शर्मा, मिचेल स्टार्क, दुश्मंता चामिरा, साकिब हुसेन आणि मुजीब उर रहमान

लखनऊ सुपर जायंट्स : लोकेश राहुल (कर्णधार), क्विंटन डीकॉक, निकोलस पूरन, आयुष बदोनी, कायले मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, दीपक हूडा, देवदत्त पडिक्कल, रवी बिश्णोई, नवीन उल-हक, कृणाल पंड्या, युधवीर सिंग, प्रेरक मंकड, यश ठाकूर, अमित मिश्रा, शमर जोसेफ, मयांक यादव, मोहसिन खान, के. गौतम, अर्शिन कुलकर्णी, एम. सिद्धार्थ, ॲॅश्टन टर्नर, मॅट हेन्री आणि मोहम्मद अर्शद खान.

logo
marathi.freepressjournal.in