अग्रस्थानासाठी अटीतटीची झुंज; ईडन गार्डन्सवर आज कोलकाता नाइट रायडर्ससमोर राजस्थान रॉयल्सचे आव्हान

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाताने रविवारी झालेल्या लढतीत लखनऊचा धुव्वा उडवून हंगामातील चौथा विजय नोंदवला. पाचपैकी चार सामने जिंकणाऱ्या कोलकाताने फक्त चेन्नईकडून एकमेव पराभव स्वीकारला आहे. मात्र ईडन गार्डन्स म्हणजे घरच्या मैदानात त्यांनी दोन्ही सामन्यांत यश संपादन केले आहे.
अग्रस्थानासाठी अटीतटीची झुंज; ईडन गार्डन्सवर आज कोलकाता नाइट रायडर्ससमोर राजस्थान रॉयल्सचे आव्हान
Published on

कोलकाता : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १७वा हंगाम आता रोमांचक वळणावर येऊन ठेपला आहे. अखेरच्या षटकांपर्यंत रंगणाऱ्या लढतींमुळे चाहत्यांचे मनोरंजन होत असून मंगळवारीसुद्धा क्रीडारसिकांना दोन आघाडीच्या संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. आयपीएलमध्ये मंगळवारी ईडन गार्डन्सवर गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असलेल्या कोलकाता नाइट रायडर्ससमोर अग्रस्थानावरील राजस्थान रॉयल्सचे कडवे आव्हान असेल.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाताने रविवारी झालेल्या लढतीत लखनऊचा धुव्वा उडवून हंगामातील चौथा विजय नोंदवला. पाचपैकी चार सामने जिंकणाऱ्या कोलकाताने फक्त चेन्नईकडून एकमेव पराभव स्वीकारला आहे. मात्र ईडन गार्डन्स म्हणजे घरच्या मैदानात त्यांनी दोन्ही सामन्यांत यश संपादन केले आहे. त्यामुळे ते राजस्थानविरुद्ध आत्मविश्वासाने मैदानात उतरतील. मार्गदर्शक गौतम गंभीर आणि मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांची जोडी कोलकाताच्या खेळाडूंकडून चमकदार कामगिरी करवून घेण्यात यशस्वी ठरली आहे.

दुसरीकडे संजू सॅमसनच्या राजस्थानने सहापैकी पाच लढती जिंकून अग्रस्थान टिकवले आहे. गेल्या सामन्यात राजस्थानने पंजाबवर सरशी साधली तसेच आघाडीची फळी ढेपाळल्यास पाचव्या, सहाव्या क्रमांकावरील फलंदाजही योगदान देऊ शकतात, हे राजस्थानने दाखवले. राजस्थानची परिपूर्ण गोलंदाजी विरुद्ध कोलकाताची धडाकेबाज फलंदाजी असे स्वरूप या लढतीला लाभले आहे. त्याशिवाय ईडन गार्डन्सवर फिरकीपटूंचे नेहमीच वर्चस्व दिसून आले आहे. त्यामुळे सुनील नरिन, वरुण चक्रवर्ती यांच्याविरुद्ध युझवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन यांची जुगलबंदी पाहण्यास चाहते आतुर आहेत.

बटलर, अश्विनबाबत संभ्रम; सॅमसन, परागकडे लक्ष

स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत रियान पराग २८४ धावांसह दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे त्याच्याकडे पुन्हा एकदा लक्ष असेल. यशस्वी जैस्वालचा धावांसाठी संघर्ष सुरू आहे. त्याशिवाय जोस बटलर आणि अश्विन गेल्या सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकले नाहीत. त्यामुळे ते अनुपलब्ध असल्यास राजस्थानला मोठा फटका बसेल. शिम्रॉन हेटमायरला योग्य वेळी सूर गवसला असून कर्णधार सॅमसन लयीत आहे. गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट व पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर असलेला लेगस्पिनर युझवेंद्र चहल यांच्यावर राजस्थानची भिस्त आहे. आवेश खान व कुलदीप सेन यांना मात्र कामगिरी उंचवावी लागणार आहे. बटलर व अश्विन दोघेही नसल्यास मुंबईकर तनुष कोटियन व आफ्रिकेचा केशव महाराज या फिरकीपटूंना आणखी एक संधी मिळू शकते.

विदेशी चौकडी कोलकाताची ताकद

सलामीवीर फिल सॉल्टने लखनऊविरुद्ध ४७ चेंडूंत नाबाद ८९ धावा तडकावल्या. त्याशिवाय नरिन आणि आंद्र रसेल ही वेस्ट इंडियन जोडी भन्नाट फॉर्मात असल्याने कोलकाताचा संघ घातक ठरत आहे. नरिनने लखनऊविरुद्ध ४ षटकांत एकही चौकार न देता अवघ्या १७ धावांत १ बळी मिळवला. रिंकू सिंग व श्रेयस यांना अद्याप फारशी छाप पाडता आलेली नाही. मात्र मुंबईकर अंक्रिश रघुवंशीने अल्पावधितच लक्ष वेधले आहे. गोलंदाजीत मिचेल स्टार्कला सूर गवसल्याने कोलकाताची चिंता कमी झाली आहे. वैभव अरोरा व हर्षित राणा या भारतीय वेगवान गोलंदाजांनी आतापर्यंत उल्लेखनीय योगदान दिले आहे. फिरकीपटू सुयश शर्मा या लढतीसाठी कोलकाताच्या संघात परतू शकतो.

प्रतिस्पर्धी संघ

राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), अबिद मुश्ताक, आवेश खान, ध्रुव जुरेल, डोनोवन फरेरा, जोस बटलर, कुलदीप सेन, कुणाल सिंग राठोड, नांद्रे बर्गर, नवदीप सैनी, रविचंद्रन अश्विन, रियान पराग, संदीप शर्मा, शिम्रॉन हेटमायर, शुभम दुबे, रोवमन पॉवेल, टॉम कोल्हर, ट्रेंट बोल्ट, यशस्वी जैस्वाल, युझवेंद्र चहल, तनुष कोटियन, केशव महाराज.

कोलकाता नाइट रायडर्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव अरोरा, मिचेल स्टार्क, श्रीकर भरत, दुश्मंता चमीरा, हर्षित राणा, वेंकटेश अय्यर, मुजीब उर रहमान, सुनील नरिन, मनीष पांडे, अंक्रिश रघुवंशी, रहमनुल्ला गुरबाझ, रमणदीप सिंग, नितीश राणा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, शर्फेन रुदरफोर्ड, चेतन साकरिया, सकिब हुसैन, फिल सॉल्ट, रिंकू सिंग, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती.

logo
marathi.freepressjournal.in