कोलकाता-दिल्ली लढतीत मुंबईतील खेळाडूंकडे लक्ष; श्रेयसचा संघ सलग तिसऱ्या विजयासाठी उत्सुक

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाताने अनुक्रने हैदराबाद आणि बंगळुरू यांना पराभूत केले आहे. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली हा संघ वेगळ्याच लयीत दिसत असून आगामी टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने मुंबईकर श्रेयसची कामगिरी या संघासाठी निर्णायक ठरणार आहे.
कोलकाता-दिल्ली लढतीत मुंबईतील खेळाडूंकडे लक्ष; श्रेयसचा संघ सलग तिसऱ्या विजयासाठी उत्सुक

विशाखापट्टणम : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) बुधवारी रंगणाऱ्या लढतीत सलग दोन सामने जिंकणारा कोलकाता नाइट रायडर्स आणि नुकताच लय गवसलेला दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील. विशाखापट्टणमला होणाऱ्या या सामन्यात प्रामुख्याने मुंबईतील खेळाडूंमधील जुगलबंदी चाहत्यांना पाहायला मिळेल. कोलकाताला सलग तिसरा विजय खुणावत आहे, तर दिल्ली कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाताने अनुक्रने हैदराबाद आणि बंगळुरू यांना पराभूत केले आहे. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली हा संघ वेगळ्याच लयीत दिसत असून आगामी टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने मुंबईकर श्रेयसची कामगिरी या संघासाठी निर्णायक ठरणार आहे. कोलकाताकडे अष्टपैलूंचा भरणा असून त्यांची फिरकीची बाजूही सक्षम आहे. त्यामुळे यंदा त्यांना जेतेपदाच्या प्रबळ‌ दावेदारांपैकी एक मानले जात आहे.

दुसरीकडे ऋषभ पंतच्या दिल्लीने पंजाब व राजस्थानकडून पराभव पत्करल्यानंतर तिसऱ्या सामन्यात बलाढ्य चेन्नईला धूळ चारली. मुंबईकर पृथ्वी शॉने या लढतीद्वारे दमदार पुनरागमन केले. बुधवारी दिल्लीचा संघ पुन्हा घरच्या मैदानावर खेळणार आहे. त्यामुळे ते कोलकाताला विजयाच्या हॅट्‌ट्रिकपासून रोखणार का, हे पाहणे रंजक ठरेल. दिल्ली-चेन्नईतील लढतीप्रमाणेच यावेळीही चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळू शकते.

रसेल, नरिन कोलकाताची ताकद

आंद्रे रसेल आणि सुनील नरिन हे विंडीजचे खेळाडू कोलकाताची ताकद आहेत. मात्र सर्वाधिक महागडा गोलंदाज मिचेल स्टार्कचे अपयश कोलकाताला सलत आहे. स्टार्कने दोन सामन्यांत अनुक्रमे ५३ आणि ४७ धावा दिल्या असून अद्याप एकही बळी मिळवलेला नाही. कोलकाताचा सलामीवीर फिल सॉल्ट भन्नाट फॉर्मात आहे. श्रेयसनेसुद्धा बंगळुरूविरुद्ध चमक दाखवली. मात्र त्याच्याकडून मोठी खेळी अपेक्षित आहे. फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि वेगवान गोलंदाज हर्षित राणा यांनी आतापर्यंत संघासाठी उत्तम योगदान दिले आहे. त्यामुळे कागदावर तरी कोलकाताचा संघ दिल्लीच्या तुलनेत वरचढ वाटत आहे.

आघाडीच्या फळीवर दिल्लीची भिस्त

दिल्लीची भिस्त प्रामुख्याने आघाडीच्या तीन फलंदाजांवर आहे. डेव्हिड वॉर्नर व मिचेल मार्श यांनी सातत्याने धावा केल्या आहेत. त्याशिवाय पृथ्वीला लय गवसली आहे. पंतनेसुद्धा चेन्नईविरुद्ध अर्धशतक झळकावले. त्यामुळे आता दिल्लीला फक्त गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. खलिल अहमद, इशांत शर्मा असे वेगवान गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. कुलदीप यादव आणि अक्षर पटेल फिरकीची बाजू सक्षमपणे हाताळत आहेत. रिकी भुई आणि अभिषेक पोरेलविषयी मात्र दिल्लीला लवकरच निर्णय घ्यावा लागेल. गत‌वर्षी दिल्लीला गुणतालिकेत नवव्या स्थानी समाधान मानावे लागले होते. मात्र यंदा ते कामगिरी उंचावतील, अशी अपेक्षा आहे.

प्रतिस्पर्धी संघ

  • कोलकाता नाइट रायडर्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव अरोरा, मिचेल स्टार्क, श्रीकर भरत, दुश्मंता चमीरा, हर्षित राणा, वेंकटेश अय्यर, मुजीब उर रहमान, सुनील नरिन, मनीष पांडे, अंक्रिश रघुवंशी, रहमनुल्ला गुरबाझ, रमणदीप सिंग, नितीश राणा, अनुकूल रॉय, आंद्रे रसेल, शर्फेन रुदरफोर्ड, चेतन सकारिया, सकिब हुसैन, फिल सॉल्ट, रिंकू सिंग, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती.

  • दिल्ली कॅपिटल्स : ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, स्वस्तिक चिकारा, यश धूल, आनरिख नॉर्किए, इशांत शर्मा, झाए रिचर्डसन, खलील अहमद, कुलदीप यादव, मुकेश कुमार, प्रवीण दुबे, रसिक दर, विकी ओस्तवाल, अक्षर पटेल, जेक फ्रेसर-गर्क, ललित यादव, सुमित कुमार, अभिषेक पोरेल, कुमार कुशाग्र, रिकी भुई, शाय होप, ट्रिस्टन स्टब्स.

logo
marathi.freepressjournal.in