
न्यूयॉर्क : २०२४ हे वर्ष भारतीय बुद्धिबळासाठी संस्मरणीय ठरले आहे. काही दिवसांपूर्वीच दोम्माराजू गुकेश हा जगज्जेता ठरल्यानंतर आता त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत भारताची महिला ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी हिने दुसऱ्यांदा रॅपिड प्रकारात जगज्जेती होण्याचा मान पटकावला आहे.
३७ वर्षीय हम्पीने रविवारी इंडोनेशियाच्या इरिन सुकंदर हिच्यावर मात करत विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. तिने ११ पैकी ८.५ गुणांची कमाई करत जेतेपद पटकावले. हम्पीने याआधी २०१९मध्ये जॉर्जिया येथे जगज्जेतेपद जिंकले होते. चीनच्या जू वेनजून हिच्यानंतर एकापेक्षा जास्त विश्वविजेतेपद जिंकणारी हम्पी ही जगातील दुसरी महिला बुद्धिबळपटू ठरली आहे.
पहिल्या फेरीत पराभव पत्करल्यानंतरही हम्पीने दमदार कामगिरी करत जगज्जेतेपदापर्यंत झेप घेतली. रॅपिड प्रकारात हम्पीने याआधीही चांगली कामगिरी केली असून मॉस्को येथे २०१२मध्ये झालेल्या जगज्जेतेपदाच्या लढतीत तिने कांस्यपदक जिंकले होते. तसेच गेल्या वर्षी तिने उझबेकिस्तानमध्ये रौप्यपदकापर्यंत मजल मारली होती.
हम्पीचे दुसरे जगज्जेतेपद
इंडोनेशियाच्या इरीने सुकंदरला पराभूत करत भारताची ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने फिडे महिला जागतिक रॅपिड बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये रविवारी दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.
हम्पीने जॉर्जीया येथे २०१९ मध्ये याच स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. चायनाच्या ज्यू वेन्जून नंतर एकापेक्षा अधिक वेळा विजेतेपद पटकावणारी हम्पी ही जगातील दुसरी बुद्धिबळपटू ठरली आहे.
सिंगापूर येथे झालेल्या क्लासिकल फॉरमॅट वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चीनच्या डींग लिरेनला धूळ चारत भारताच्या डी गुकेशने अंतिम विजेतेपदाला गवसणी घातली होती. त्यानंतर आता हम्पीने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष भारतीय बुद्धिबळसाठी विशेष ठरले आहे.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या चेस ऑलिम्पियाडमध्ये भारताने महिला आणि खुल्या गटात पहिले सुवर्ण पदक जिंकले होते.
हम्पीने पहिल्या फेरीतील पराभवाने स्पर्धेची सुरुवात केली. त्यानंतर मात्र तिने मागे वळून पाहिले नाही. ८.५ गुणांसह तिने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.
मी खूपच उत्साही आणि आनंदी आहे. काही टाय ब्रेक झाले. त्यामुळे यश मिळवणे थोडे कठीण जाईल असे मला वाटत होते. पण जेव्हा सामना संपला तेव्हा मला विजेते म्हणून घोषीत करण्यात आले. तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता, असे काळ्या सोंगट्याने सामन्याची सुरुवात करणाऱ्या हम्पीने सांगितले.
गेले वर्षभर मी प्रचंड मेहनत घेतली त्यामुळे हे अनपेक्षित यश मिळवले. गेल्या काही स्पर्धा माझ्यासाठी निराशाजनक ठरल्या. त्यामुळे हे यश माझ्यासाठी अनपेक्षित असल्याचे हम्पी म्हणाली.
चीनच्या ज्यू वेन्जूनने दुसरा, तर रशीयाच्या काटरयाना लॅग्नोने तिसरा क्रमांक पटकवला. ८ पॉइंट मिळवणाऱ्या हारीकाने पाचवा क्रमांक पटकवला.
हम्पीने या विजयाचे श्रेय तिच्या कुटुंबाला दिले. माझ्या कुटुंबाचा सपोर्ट असल्यामुळेच मी हे यश मिळवू शकले. माझे पती आणि पालक यांनी मला पुष्कळ सपोर्ट दिला. जेव्हा मी स्पर्धेसाठी जात होते तेव्हा माझ्या आई-वडिलांनी माझ्या मुलीचा सांभाळ केला.
आवश्यकतेनुसार खेळात बदल करणे ही फार कठीण गोष्ट आहे. मला ते करता आले यासाठी मी आनंदी आहे. पराभवाने स्पर्धेची सुरुवात केल्याने अशी मी पिछाडीवर पडले होते. दुसऱ्या दिवशी मी चार सामने जिंकले.आपले हे यश बुद्धिबळ खेळू पाहणाऱ्या भारतीयांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे हम्पी म्हणाली.
फिडे महिला जागतिक रॅपिड चॅम्पियनशिप पटकावल्याबद्दल कोनेरू हम्पी तुझे अभिनंदन. तुझे हे यश लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरेल. हे यश ऐतिहासिक आहे. कारण हम्पीने दुसऱ्यांदा महिला जागतिक रॅपिड चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावले आहे. या यशाला गवसणी घालणारी ती एकमेव भारतीय खेळाडू ठरली आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान