कुलदीपला संघात स्थान द्यावे! बुमराच्या अनुपस्थितीत फिरकीपटूला प्राधान्य देण्याची दिग्गजांची सूचना

इंग्लंडविरुद्ध २ जुलैपासून रंगणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवला भारतीय संघात स्थान हवेच, असे काही माजी क्रिकेटपटूंनी सुचवले आहे. तसेच बर्मिंघमच्या एजबॅस्टन स्टेडियमची खेळपट्टी व तेथील इतिहास पाहता कुलदीपला नक्कीच स्थान दिले जाईल, असे वाटते.
कुलदीपला संघात स्थान द्यावे! बुमराच्या अनुपस्थितीत फिरकीपटूला प्राधान्य देण्याची दिग्गजांची सूचना
Published on

बर्मिंघम : इंग्लंडविरुद्ध २ जुलैपासून रंगणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवला भारतीय संघात स्थान हवेच, असे काही माजी क्रिकेटपटूंनी सुचवले आहे. तसेच बर्मिंघमच्या एजबॅस्टन स्टेडियमची खेळपट्टी व तेथील इतिहास पाहता कुलदीपला नक्कीच स्थान दिले जाईल, असे वाटते.

शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाला पहिल्या कसोटीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. सामन्यात एकूण पाच शतके झळकावूनही भारताच्या पदरी निराशा पडली. भारताने दिलेले ३७१ धावांचे लक्ष्य इंग्लंडने ५ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. भारतीय गोलंदाज दुसऱ्या डावात पूर्णपणे निष्प्रभ ठरले, तर क्षेत्ररक्षणातही त्यांनी चुका केल्या. त्यामुळे भारताने गेल्या ९ कसोटींपैकी तब्बल सात कसोटींमध्ये पराभव पत्करला आहे.

आता त्यातच तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध नसेल, म्हणजेच वर्कलोड मॅनेजमेंटच्या अंतर्गत त्याला विश्रांती देण्यात येणार आहे, असे समजते. अशा स्थितीत भारतीय संघापुढील समीकरण आणखी बिकट होणार आहे. त्यामुळे बुमराच्या जागी अन्य वेगवान गोलंदाज घेण्यापेक्षा भारताने कुलदीपच्या रुपात फिरकीपटूला संधी द्यावी, अशी मागणी चाहते आणि माजी क्रिकेटपटू करत आहेत.

“एजबॅस्टन येथे भारताने अंतिम ११ खेळाडूंत कुलदीपला स्थान देणे गरजेचे आहे. तेथील वातावरणात तो नक्कीच इंग्लंडवर प्रभावी ठरेल. एजबॅस्टनला दुसऱ्या डावात २०० धावा करणेही कठीण जाते. जर बुमराला विश्रांती देण्यात येणार असेल, तर कुलदीपला प्रथम प्राधान्य दिले जावे. बुमरावर अतिविसंबून राहणे भारताला पहिल्या कसोटीत महागात पडले.” असे मोहम्मद अझरुद्दीन म्हणाला.

त्याशिवाय मुंबईकर आणि समालोचक संजय मांजरेकरने कुलदीपला पाठिंबा दिला आहे. “कुलदीपला इंग्लंडमध्ये खेळण्याचा आता पुरेसा अनुभव आहे. तसेच तो खालच्या क्रमांकावर फलंदाजीतही योगदान देईल. भारताने ३ वेगवान गोलंदाज व २ फिरकीपटू असे सूत्र दुसऱ्या कसोटीसाठी वापरावे. कुलदीप नक्कीच संघातील गोलंदाजीत संतुलन आणेल,” असे मांजेरकर म्हणाला.

कुलदीपने १३ कसोटींमध्ये ५६ बळी मिळवले असून त्याची सरासरी २२ इतकी आहे. तसेच इंग्लंडचा संघ जेव्हा २०२४मध्ये भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी कुलदीपने ४ सामन्यांत १९ बळी मिळवले होते. इंग्लंडविरुद्ध २०२१मध्येही कुलदीप खेळला होता. रवींद्र जडेजाच्या साथीने कुलदीपची फिरकी जोडी घातक ठरू शकते. कारण एजबॅस्टन येथील वातावरण व आकडेवारी फिरकीला पोषक ठरण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, बुमराला पाठदुखीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध जानेवारीतील पाचव्या कसोटीत मध्यातूनच माघार घ्यावी लागली होती. तेव्हापासूनच त्याला पाठीच्या स्नायूंची काळजी घेण्याच्या हेतूने सामन्यांची योग्य निवड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बुमरा चॅम्पियन्स ट्रॉफीतही खेळू शकला नाही. आयपीएलमध्ये ४ सामन्यांनंतर त्याने पुनरागमन केले. इंग्लंडविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वीच बुमरा फक्त तीनच सामन्यांत खेळू शकेल, हे स्पष्ट झाले होते. पहिल्या कसोटीत बुमराने दोन्ही डावांत मिळून ४४ षटके गोलंदाजी केली. तसेच ५ बळी मिळवले. बुमरा आता १० जुलैपासून लॉर्ड्सवर रंगणाऱ्या तिसऱ्या कसोटीत संघात परतेल, असे समजते.

अर्शदीप पदार्पणाच्या शर्यतीत

डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग कसोटी पदार्पणाच्या शर्यतीत असल्याचे समजते. रविवारी अर्शदीपने कसून गोलंदाजीचा सराव केला. २६ वर्षीय अर्शदीपने टी-२० क्रिकेटमध्ये स्वत:चे स्थान पक्के केले आहे. मात्र कसोटीत त्याला अद्याप संधी मिळालेली नाही. आता बुमराला विश्रांती दिल्यास तसेच शार्दूल ठाकूर व प्रसिध कृष्णा यांचे अपयश पाहता अर्शदीपला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच इंग्लंडमधील वातावरणात या डावखुऱ्या गोलंदाजाचा स्विंग फलंदाजांसाठी घातक ठरू शकतो.

logo
marathi.freepressjournal.in