कुमामोटो मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा : लक्ष्य अंतिम फेरीत

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने कुमामोटो मास्टर्स जपान सुपर ५०० स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.
कुमामोटो मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा : लक्ष्य अंतिम फेरीत
कुमामोटो मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा : लक्ष्य अंतिम फेरीत(Photo-X)
Published on: 

कुमामोटो (जपान) : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने कुमामोटो मास्टर्स जपान सुपर ५०० स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात लक्ष्यने जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेल्या इंडोनेशियाच्या अल्वी फरहानचा तीन गेममध्ये पराभव केला. लक्ष्यने हा सामना २१-१२, १५-२१, २१-११ असा जिंकत सलग दुसऱ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले.

जागतिक क्रमवारीत १३व्या क्रमांकावर असलेल्या लक्ष्यने यापूर्वी हायलो ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. आता कुमामोटो मास्टर्समध्येही जेतेपद मिळवण्याची त्याला संधी आहे. या विजयामुळे हांगझोऊ येथे होणाऱ्या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्ससाठी पात्र ठरण्याच्या त्याच्या आशाही बळावल्या आहेत. लक्ष्य सध्या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर क्रमवारीत ६४,९८० गुणांसह १२व्या स्थानावर आहे.

वर्षअखेरीस होणाऱ्या वर्ल्ड टूर फायनल्समध्ये खेळण्यासाठी त्याला पहिल्या आठ खेळाडूंमध्ये स्थान मिळवावे लागणार आहे. लक्ष्यचा अंतिम सामना जपानच्या कोकी वातानाबे आणि थायलंडच्या दुसऱ्या मानांकित कुनलावुत वितिदसर्न यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. लक्ष्यला यापूर्वी फरहानविरुद्धच्या दोन्ही सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता.

कुमामोटो मास्टर्सचे विजेतेपद पटकावल्यास लक्ष्यला ९,२०० गुण मिळतील, तर उपविजेतेपद मिळाल्यास ७,८०० गुणांची कमाई होईल. यापैकी कोणताही निकाल त्याला पहिल्या आठ खेळाडूंमध्ये स्थान मिळवून देण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर हाँगकाँग ओपन सुपर ५०० ही स्पर्धा होणार असल्याने क्रमवारीत बदल होऊ शकतात.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)