कुमार-कुमारी राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा: धाराशिव, सोलापूरला अजिंक्यपद

नंदूरबार येथे झालेल्या मुलींच्या अंतिम सामन्यात धाराशिवने नाशिकचा ७-४ असा एक डाव ३ गुणांनी धुव्वा उडवला.
कुमार-कुमारी राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा:
धाराशिव, सोलापूरला अजिंक्यपद
Published on

नंदूरबार : राज्य अजिंक्यपद कुमार-मुली खो-खो स्पर्धेत मुली गटात धाराशिवने नाशिकचा तर कुमार गटात सोलापूरने पुण्याचा पराभव करत विजेतेपद पटकावले. सोलापूरने प्रथमच अजिंक्यपदावर मोहोर उमटवली.

नंदूरबार येथे झालेल्या मुलींच्या अंतिम सामन्यात धाराशिवने नाशिकचा  ७-४ असा एक डाव ३ गुणांनी धुव्वा उडवला. नाणेफेक जिंकून धाराशिवने संरक्षण स्वीकारले. त्याला साजेसा खेळ करत धाराशिवची राष्ट्रीय खेळाडू अश्विनी शिंदेने ६.१० मि. संरक्षणाची खेळी करत नाशिकच्या आक्रमणाची हवाच काढून टाकली. तिला मैथिली पवारने (१.३० मि. संरक्षण) व संध्या सुरवसे (नाबाद १ मि. संरक्षण) दमदार खेळी करत चांगली साथ दिली. यामुळे नाशिकला अवघे २ गुणच मिळवता आले. आक्रमणात धाराशिवने ७ गुण मिळवत नाशिकला मोठे आव्हान दिले. मात्र दुसऱ्या डावातील आक्रमणातही नाशिक चांगला खेळ करु शकला नाही. या वेळी संरक्षण करणाऱ्या धाराशिवच्या अश्विनी शिंदेने पुन्हा चमकदार खेळ करत ४.५० मिं. संरक्षण करत नाशिकला मोठी टक्कर दिली. 

कुमार गटातील अंतिम सामना चुरशीचा झाला. जादा डावापर्यंत रंगलेल्या सामन्यात सोलापूरने पुण्याचा २४-२३ असा १ गुणाने निसटता विजय मिळवत जेतेपद संपादन केले. सोलापूरतर्फे गणेश बोरकर (२.१०, २.१० मि. संरक्षण व २ गुण), कृष्णा बनसोडे (१.३०, १.१०, १ मि. संरक्षण व ३ गुण), प्रतिक शिंदे (१.२०, १.४० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी दमदार खेळ केला. पराभूत पुण्याच्या चेतन बिका (२, २.३०, १.२० मि. संरक्षण व ४ गुण), भावेश मेश्रे (१.२०, १.२० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी दिलेली कडवी लढत अपुरी ठरली.

स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू :  गणेश बोरकर (सोलापूर) , अश्विनी शिंदे (धाराशिव)

सर्वोत्कृष्ट संरक्षक :  चेतन बिका (पुणे), सानिका चाफे (सांगली),

सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू : फराज शेख (सोलापूर),  सुहानी धोत्रे (धाराशिव)

logo
marathi.freepressjournal.in