

मियामी : फ्रान्सचा कर्णधार आणि स्टार फुटबॉलपटू किलियन एम्बाप्पे याने लिओनेल मेस्सीचा विश्वचषकातील २१ गोल्सचा सार्वकालिक विक्रम मोडीत काढला आहे. फिफा विश्वचषक २०२६च्या तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध फ्रान्सला ४-६ असा पराभव स्वीकारावा लागला असला, तरी एमबाप्पेने सामन्यात दोन गोल झळकावत इतिहास रचला.
या दोन गोल्ससह एम्बाप्पेच्या नावावर आता २२ सामन्यांत २२ विश्वचषक गोल झाले असून, त्याने मेस्सीला मागे टाकून या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. यासोबतच त्याने यंदाच्या स्पर्धेत एकूण १० गोल नोंदवत गोल्डन बूटच्या शर्यतीत मेस्सीवर दोन गोल्सची आघाडी घेतली आहे. एम्बाप्पेने चार वर्षांपूर्वी कतार विश्वचषकात आठ गोल करत गोल्डन बूट पटकावला होता.
या विश्वचषकापूर्वी जर्मनीचा माजी खेळाडू मिरोस्लाव क्लोज १६ गोल्ससह अव्वल स्थानी होता. परंतु कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिकेत संयुक्तपणे आयोजित या स्पर्धेत एम्बाप्पे आणि मेस्सी या दोघांनीही क्लोजचा हा विक्रम मोडीत काढला. अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू मेस्सीने अल्जेरियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात हॅटट्रिक नोंदवून क्लोजच्या १६ गोल्सची बरोबरी केली होती. त्यानंतर त्याने ऑस्ट्रियाविरुद्ध दोन गोल करून हा विक्रम स्वतःच्या नावावर केला. मेस्सीने पुढे जॉर्डन, कापे व्हर्डे आणि इजिप्तविरुद्धच्या सामन्यांत गोल करत आपली संख्या २१ वर पोहोचवली होती.
एम्बाप्पेने २०१८ मधील रशिया विश्वचषक आणि २०२२ मधील कतार विश्वचषकात एकूण १२ गोल केले होते. त्यानंतर या स्पर्धेत आश्चर्यकारक कामगिरी सुरू ठेवत त्याने आणखी १० गोल्सची भर घातली आहे. त्याने सेनेगल, इराक आणि स्वीडनविरुद्ध प्रत्येकी दोन गोल केले. त्यानंतर पॅराग्वेविरुद्ध पेनल्टीवर, मोरोक्कोविरुद्ध पहिला गोल आणि आता इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दोन गोल करत २२ सामन्यांत २२ गोल्सचा टप्पा गाठला. एकाच विश्वचषकात एम्बाप्पेपेक्षा जास्त गोल करण्याचा विक्रम हंगेरीच्या सँडोर कोक्सिस (१९५४ मध्ये ११ गोल) आणि फ्रान्सच्या जस्ट फॉन्टेन (१९५८ मध्ये १३ गोल) यांच्या नावावर आहे.
डेसचॅम्प्स यांना निरोप
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी फ्रान्स राष्ट्रीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक दिदिएर डेसचॅम्प्स यांच्या १४ वर्षांच्या कार्यकाळाच्या समाप्तीनंतर त्यांचे आभार मानले. फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत स्पेनविरुद्ध २-० असा पराभव स्वीकारवा लागल्याने फ्रान्सचे सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंगले होते. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध झालेला तिसऱ्या स्थानाचा सामना हा डेसचॅम्प्स यांच्या १४ वर्षांच्या कार्यकाळातील शेवटचा सामना ठरला. अध्यक्ष मॅक्रॉन यांनी डेसचॅम्प्स यांच्या योगदानाचे कौतुक केले असून त्यांनी देशाला अनेक ऐतिहासिक विजय, अविस्मरणीय क्षण दिले आणि संपूर्ण राष्ट्राला अभिमान वाटेल अशी पिढी तयार केली, असे नमूद केले आहे.
अंतिम लढतीत खेळणे मला अधिक आवडले असते -एम्बाप्पे
या ऐतिहासिक कामगिरीनंतर एम्बाप्पे म्हणाला की, “फिफा विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू बनण्याऐवजी अंतिम सामन्यात खेळणे मला अधिक आवडले असते. पहिल्या सत्रातील खेळ पाहता आम्ही फ्रान्सच्या जर्सीला योग्य न्याय दिला नाही, असे लोकांना वाटणे साहजिक आहे. पण आम्ही माणूस आहोत आणि अशा चुका आम्हाला परवडणाऱ्या नाहीत. इंग्लंडच्या संघाने आम्हाला पूर्णपणे हादरवले. राष्ट्रीय संघासोबत आपला शेवटचा सामना खेळणारे प्रशिक्षक दिदिएर डेसचॅम्प्स यांच्यासाठी खेळाडूंना हा सामना जिंकायचा होता.”
एकाच विश्वचषकात १०पेक्षा अधिक गोल
खेळाडू देश गोल साल
जस्ट फोंटेन फ्रान्स १३ १९५८
सँडोर कोकसिस हंगेरी ११ १९५४
किलियन एम्बाप्पे फ्रान्स ० २०२६
गेर्ड म्युलर जर्मनी १० १९७०
युसेबायो पोर्तुगाल ९ १९६६
अडेमिर ब्राझील ९ १९५०