Paris Olympics 2024: लक्ष्यचा ख्रिस्तीला दे धक्का; बाद फेरीतील प्रवेश पक्का! सलग दुसऱ्या विजयासह सिंधूचीही आगेकूच

lakshya Christian, PV Sindhu: भारताच्या २२ वर्षीय लक्ष्य सेनने बुधवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या जोनाथन ख्रिस्तीला पराभवाचा धक्का दिला. या विजयासह लक्ष्यने ल-गटातून अग्रस्थानासह थाटात उपउपांत्यपूर्व फेरीत (राऊंड ऑफ १६) प्रवेश केला. त्याशिवाय पी. व्ही. सिंधूने सलग दुसऱ्या विजयासह बाद फेरीत कूच केली.
lakshya Christian, PV Sindhu
India at Paris Olympics 2024PTI and ANI
Published on

पॅरिस : भारताच्या २२ वर्षीय लक्ष्य सेनने बुधवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या जोनाथन ख्रिस्तीला पराभवाचा धक्का दिला. या विजयासह लक्ष्यने ल-गटातून अग्रस्थानासह थाटात उपउपांत्यपूर्व फेरीत (राऊंड ऑफ १६) प्रवेश केला. त्याशिवाय पी. व्ही. सिंधूने सलग दुसऱ्या विजयासह बाद फेरीत कूच केली.

पुरुषांच्या ल-गटातील अखेरच्या लढतीत जागतिक क्रमवारीत २२व्या स्थानी असलेल्या लक्ष्यने इंडोनेशियाच्या जोनाथनला २१-१८, २१-१२ अशी सरळ दोन गेममध्ये धूळ चारली. एकवेळ लक्ष्य पहिल्या गेममध्ये २-८ असा पिछाडीवर होता. मात्र तरीही त्याने झोकात पुनरागमन करत १ तासाच्या आतच ही लढत जिंकली. कारकीर्दीतील पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये लक्ष्यने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारण्याचा पराक्रम केला, हे विशेष. जोनाथन हा ऑल इंग्लंड तसेच आशियाई विजेता होता. मात्र त्याच्यासारख्या खेळाडूला दोन गेममध्ये पराभूत करून लक्ष्यने अन्य प्रतिस्पर्ध्यांना इशारा दिला आहे. लक्ष्यसमोर आता उपउपांत्यपूर्व फेरीत क-गटातील विजेत्याचे आव्हान असेल.

दुसरीकडे महिलांच्या म-गटातील अखेरच्या साखळी लढतीत दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेत्या सिंधूने इस्टोनियाच्या क्रिस्टिन कुबाला २१-५, २१-१० असे सहज नेस्तनाबूत केले. सिंधूने अवघ्या ४० मिनिटांत ही लढत जिंकून बाद फेरीत प्रवेश केला. आता सिंधूसमोर चीनच्या ही बिंग जियोचे आव्हान असेल.

जोनाथनसारख्या कडव्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध मला सर्वोत्तम खेळ करावा लागेल, याची कल्पना होती. दडपण झुगारून खेळल्याचा मला लाभ झाला. ऑलिम्पिक पदक अद्याप दूर असल्याने मी एवढ्यावर थांबणार नाही.

- लक्ष्य सेन

सिंधूने सलग तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. यापूर्वी २०१६मध्ये तिने रौप्य, तर २०२० मध्ये कांस्यपदक पटकावले होते.

logo
marathi.freepressjournal.in