सिंधूकडून पुन्हा निराशा; लक्ष्यवर भारताच्या आशा

२३ वर्षांपासून भारताच्या एकाही खेळाडूला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यातच पुरुष एकेरीत एच. एस. प्रणॉय, किदाम्बी श्रीकांत पराभूत झाल्याने महिलांमध्ये सिंधूकडून अपेक्षा होत्या. मात्र...
सिंधूकडून पुन्हा निराशा; लक्ष्यवर भारताच्या आशा

बर्मिंगहॅम : दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने पुन्हा एकदा निराशा केली. तिला ऑल इंग्लंड अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतच पराभव पत्करावा लागला. लक्ष्य सेनने मात्र उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

२३ वर्षांपासून भारताच्या एकाही खेळाडूला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यातच पुरुष एकेरीत एच. एस. प्रणॉय, किदाम्बी श्रीकांत पराभूत झाल्याने महिलांमध्ये सिंधूकडून अपेक्षा होत्या. मात्र महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात कोरियाच्या से यंगकडून सिंधूला १९-२१, ११-२१ असा सरळ दोन गेममध्ये पराभव पत्करावा लागला. सिंधूने यंगविरुद्ध सलग सातवी लढत गमावली. जागतिक क्रमवारीत सिंधू ११व्या स्थानी आहे. मात्र एप्रिलच्या अखेरपर्यंत तिने अव्वल १६ खेळाडूंत स्थान टिकवले नाही, तर तिला पॅरिस ऑलिम्पिकला मुकावे लागू शकते.

पुरुष एकेरीत क्रमवारीत १५व्या स्थानी असलेल्या लक्ष्यने डेन्मार्कच्या तिसऱ्या मानांकित आंद्रे आन्टोसेनला २४-२२, ११-२१, २१-१४ असे संघर्षपूर्ण लढतीत तीन गेममध्ये नमवले. एकेरीत फक्त लक्ष्यवर भारताच्या आशा टिकून आहेत. त्याशिवाय पुरुष दुहेरीत सात्विक-चिराग यांनी आगेकूच केली. महिला दुहेरीत तनिषा क्रॅस्टो व अश्विनी पोनप्पा या भारतीय जोडीला चीनच्या झँग-झेंग जोडीकडून २१-११, ११-२१, ११-२१ अशा पराभवाला सामोरे जावे लागले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in