लक्ष्य सेनचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश, असा रंगला गेम..

इंडोनेशिया मास्टर्समध्ये लक्ष्य सेन आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दित पहिल्यांदाच गेमकेविरूद्ध खेळला
 लक्ष्य सेनचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश, असा रंगला गेम..

जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या लक्ष्य सेनने इंडोनेशिया मास्टर्स सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. लक्ष्य सेनने डेन्मार्कच्या रासमुस गेमके याच्यावर सरळ गेममध्ये २१-१८, २१-१५ असा अवघ्या ५४ मिनिटात विजय मिळविला.

इंडोनेशिया मास्टर्समध्ये लक्ष्य सेन आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दित पहिल्यांदाच गेमकेविरूद्ध खेळला. लक्ष्यने पहिल्या गेममध्ये ०-३ अशा निराशाजनक सुरूवातीनंतर ९-६ अशी आघाडी घेतली. त्यानंतर गेमकेने झुंजार खेळी करत ११-१० अशी एका गुणाची आघाडी मिळविली. त्यानंतर लक्ष्यने सलग सहा गुण मिळवत १६-१२ अशी आघाडी घेतली. अखेर लक्ष्यने पहिला गेम २१-१८ ने जिंकला.

दुसऱ्या गेममध्ये देखील गेमके आणि सेन यांच्यात जबरदस्त चुरस निर्माण झाली. मात्र लक्ष्यने अखेरच्या क्षणी खेळ उंचावत सलग गुण मिळवत दुसरा गेम २१-१५ ने जिंकत विजय मिळविला.

क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असणारा लक्ष्य आता उपांत्यपूर्व फेरीत तैवानच्या तिसऱ्या मानांकित चोऊ टीन चेन याच्याशी झुंजणार आहे. गेल्या महिन्यात झालेल्या थॉमस कपच्या लढतीत लक्ष्य सेनला चेनने तीन सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात पराभूत केले होते.

मूळचा अल्मोराचा असलेला २० वर्षांचा लक्ष्य सेन हा एतिहासिक थॉमस कप विजेतेपद जिंकणाऱ्या भारतीय संघाचा देखील सदस्य होता.

आता इंडोनेशिया मास्टर्समध्ये भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू इंडोनेशियाच्या जॉर्जिया मरिस्का टुनजूंग हिच्यासोबत भिडणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in