ऑलिम्पिक आयोजनाचे स्वप्न साकारू! पंतप्रधान मोदी यांचे खेळाडूंना आश्वासन; पॅरिस ऑलिम्पिकमधील पदकविजेत्यांची घेतली भेट

२०३६मध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. हे स्वप्न सत्यात साकारण्यासाठी आपण सर्वस्व अर्पण करू, अशी प्रतिक्रिया भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.
पॅरिस ऑलिम्पिकमधील पदकविजेत्यांची पंतप्रधान मोदींसह भेट
पॅरिस ऑलिम्पिकमधील पदकविजेत्यांची पंतप्रधान मोदींसह भेटANI
Published on

नवी दिल्ली : २०३६मध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. हे स्वप्न सत्यात साकारण्यासाठी आपण सर्वस्व अर्पण करू, अशी प्रतिक्रिया भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. ७८व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मोदी यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथील निवासस्थानी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील पदकविजेत्यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मंडविया, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्ष पी. टी. उषा यासुद्धा उपस्थित होत्या.

लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणामध्ये मोदी यांनी भारताचे क्रीडा क्षेत्रात महासत्ता बनण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले. २०२८ची ऑलिम्पिक स्पर्धा लॉस एंजेल्स, तर २०३२चे ऑलिम्पिक ब्रिस्बेन येथे पार पडणार आहे. मात्र २०३६च्या ऑलिम्पिक आयोजनाचा मान भारताला मिळावा, यासाठी केंद्र शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नीता अंबानीसुद्धा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) सदस्य झाल्याने भारत ऑलिम्पिक आयोजनासाठी जोरदार दावेदारी पेश करणार आहे.

दरम्यान, नुकताच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने सहा पदकांसह ७१वे स्थान मिळवले. नीरज चोप्राने भालाफेकीत रौप्य, तर भारतीय हॉकी संघ, नेमबाज मनू भाकर, स्वप्निल कुसळे, मनू-सरबजोत, कुस्तीपटू अमन सेहरावत यांनी कांस्यपदके जिंकली. मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर सर्व खेळाडूंशी संवाद साधून पदकविजेत्यांची खास भेट घेतली. यावेळी ते मनूची पिस्तूल तसेच हॉकीची स्टीक पाहताना आढळले. भारतीय हॉकी संघाने त्यांना सर्व खेळाडूंचे हस्ताक्षर असलेली जर्सीही भेट म्हणून दिली.

“पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारा प्रत्येक खेळाडू हा एक विजेता आहे. केंद्र शासन यापुढेही क्रीडा क्षेत्राला असाच पाठिंबा करत राहील. २०३६चे ऑलिम्पिक भारतात आयोजित करणे, हे प्रत्येक देशवासीयाचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही झटत राहू,” असे मोदी म्हणाले.

“ग्लोबल टी-२० परिषदेचे आयोजन केल्यामुळे भारताचे जगभरात नाव झाले असून यापुढेही क्रीडा क्षेत्राशी निगडित सर्व सुविधा आपल्या देशात आणण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. त्याशिवाय पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंनाही आमच्या शुभेच्छा,” असेही मोदी यांनी सांगितले.

२०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने ७ पदके जिंकली होती. ती भारताची आजवरची ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा ११७ खेळाडूंचे पथक पॅरिसला गेले होते. त्यांपैकी अनेकांना पदकाने थोडक्यात हुलकावणी दिली. तर कुस्तीपटू विनेश फोगटला दुर्दैवीरीत्या पदकाला मुकावे लागले. मोदी यांनी पुढील ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना जोरदार तयारी करण्याचेही सुचवले.

अहमदाबाद आयोजनासाठी अग्रेसर

भारताला २०३६च्या ऑलिम्पिक आयोजनाचा मान मिळाला तर अहमदाबाद येथे ही स्पर्धा होईल, याची शक्यता आहे. अहमदाबादमधील क्रीडा संकुल येथे ऑलिम्पिकमध्ये समावेश असलेल्या बहुतांश खेळांशी निगडित कोर्ट व मैदाने उपलब्ध आहेत. २०१०मध्ये भारताने नवी दिल्ली येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामुळे अहमदाबादव्यतिरिक्त दिल्लीचा पर्यायही उपलब्ध आहे. मात्र यासाठी भारताने यजमानपदाचा मान मिळवणे गरजेचे आहे.

logo
marathi.freepressjournal.in