हैदराबाद : इंग्लंडचा संघ सध्या कसोटी क्रिकेटचे रूप पालटण्याच्या मोहिमेवर आहे. त्यामुळे भारतीय संघाविरुद्धही ते ‘बॅझबॉल’ शैलीचेच क्रिकेट खेळतील, हे आम्हास ठाऊक आहे. मात्र आम्ही अतिआक्रमकपणा टाळून त्यांना प्रत्यक्षात मैदानातील कामगिरीद्वारेच उत्तर देऊ, असे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले.
“इंग्लंडच्या बॅझबॉल शैलीविषयी आता सगळ्यांनाच माहीत आहे. भारताचे गोलंदाज विरुद्ध इंग्लंडचे फलंदाज या दृष्टिकोनातून कसोटी मालिकेकडे पाहिले जात आहे. मात्र इंग्लंडच्या बॅझबॉलला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही अतिआक्रमक क्रिकेट खेळणार नाही. गरजेनुसार तसेच खेळपट्टी व परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही कामगिरीद्वारेच त्यांच्या बॅझबॉलला उत्तर देऊ,” असे ५१ वर्षीय द्रविड म्हणाले.
भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला गुरुवार, २५ जानेवारीपासून प्रारंभ होईल. उभय संघांतील पहिली कसोटी हैदराबाद येथे खेळवण्यात येणार असून मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान द्रविड यांनी असंख्य मुद्द्यांवर भाष्य करतानाच संघाचा दृष्टिकोनही स्पष्ट केला. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंडच्या संघाने गेल्या २ वर्षांत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या संघांना ‘बॅझबॉल’द्वारे हैराण केले. तसेच पाकिस्तानला त्यांच्याच भूमीत धूळ चारली. त्यामुळे विराट कोहलीच्या अनुपस्थितीत पहिल्या दोन कसोटी सामन्यांत खेळणाऱ्या भारतीय संघाला इंग्लंडला रोखणे आव्हानात्मक नक्कीच असेल.
“भारतीय कसोटी संघातील पहिले ५ ते ६ फलंदाज तुम्ही पाहिले. तर त्यांना सातत्याने धावा काढण्याची कला अवगत आहे. ते आपला नैसर्गिक खेळ करतील. संघाची स्थिती खराब असल्यास त्यांच्यापैकी एकाला खेळपट्टीवर ठाण मांडून चेंडू फक्त खेळावे लागू शकते. मात्र बॅझबॉलला घाबरून आमचा एकही फलंदाज त्याच्या खेळण्याची शैली बदलणार नाही,” असेही द्रविड यांनी स्पष्ट केले. कर्णधार रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर यांचा भारताच्या पहिल्या पाच फलंदाजांमध्ये समावेश असण्याची दाट शक्यता आहे.
त्याशिवाय पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत युवा खेळाडूंना पुरेशी संधी मिळेल, असेही द्रविड यांनी नमूद केले. बीसीसीआय व आयसीसीने कसोटी क्रिकेटचे जतन करण्यासाठी पाच कसोटी सामन्यांची मालिका दरवर्षी आयोजित करावी, असेही द्रविड यांनी सुचवले. भारताने यापूर्वी २०२१-२२मध्ये इंग्लंडविरुद्धच मायदेशात अखेरची पाच सामन्यांचा समावेश असलेली कसोटी मालिका खेळली होती.
राहुल पूर्ण मालिकेत फक्त फलंदाज म्हणून खेळणार
प्रतिभावान फलंदाज राहुल या मालिकेत फक्त विशेषज्ञ फलंदाज म्हणून खेळेल. त्याच्यावर यष्टिरक्षणाचा भार नसेल, असे द्रविड यांनी स्पष्ट केले. त्यामुळे के. एस. भरत आणि ध्रुव जुरेल यांच्यापैकी कुणाला यष्टिरक्षणासाठी प्राधान्य दिले जाते, हे पाहणे रंजक ठरेल. आफ्रिकेविरुद्ध डिसेंबरमध्ये झालेल्या दोन कसोटींमध्ये राहुलने यष्टिरक्षण करताना पाचव्या स्थानी फलंदाजी केली होती. भरतने यापूर्वी बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका तसेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतासाठी यष्टिरक्षण केले. त्यामुळे युवा ध्रुवच्या तुलनेत त्यालाच प्रथम पसंती मिळू शकते.
खेळपट्टी दुसऱ्या दिवसापासून फिरकीला पोषक ठरेल!
द्रविड यांना पत्रकार परिषदेत खेळपट्टीबाबत विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी खेळपट्टी उत्तम असून दुसऱ्या अथवा तिसऱ्या दिवसापासून फिरकीपटूंचे वर्चस्व येथे पहायला मिळू शकते, असे सांगितले. त्यामुळे भारतीय संघ रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा या फिरकी जोडीसह तिसरा फिरकीपटू म्हणून अक्षर पटेल किंवा कुलदीप यादव यांच्यापैकी एकाची निवड करू शकतो.