

ऋषिकेश बामणे/मुंबई
कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या लिओनेल मेस्सीला अखेर ‘याची देही, याची डोळा’ पाहण्याचे भाग्य रविवारी तमाम मुंबईकरांना लाभले. ऐरव्ही ‘सचिन, सचिन’च्या निनादात नाहून निघालेल्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर रविवारी मेस्सीच्या नावाचा जयघोष झाला. अर्जेंटिनाचा तारांकित फुटबॉलपटू मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी स्टेडियमसह चर्चगेट परिसरात हजारोंचा जनसागर उसळला होता.
३८ वर्षीय मेस्सी ‘गोट टूर ऑफ इंडिया’ अंतर्गत सध्या भारत दौऱ्यावर आला आहे. कोलकाता व हैदराबाद येथे शनिवारी मेस्सीने दौरा केल्यावर रविवारी सकाळपासूनच त्याच्या मुंबई दौऱ्याची उत्सुकता लागून होती. तसेच कोलकाता येथे सुरक्षाव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले असताना तसेच चाहत्यांचा आक्रोश पाहून मुंबईत कसे चित्र असणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र मुंबई पोलीस तसेच मुंबईतील दर्दी फुटबॉलप्रेमींनी या सोहळ्याचे यशस्वी आयोजन करवून दाखवले. त्यामुळेच चाहत्यांना स्टेडियममध्ये मेस्सीला मनसोक्त पाहता आले.
मेस्सीसह त्याचा बार्सिलोना फुटबॉल क्लबमधील सहकारी लुईस सुआरेझ, तसेच अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू रॉड्रिगो डी पॉल हेदेखील भारत दौऱ्यावर आले आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बॉलीवूड सिनेतारकांनी देखील यावेळी बॉलीवूड गाठले होते. प्रथम सचिनचे आगमन झाल्यावरच वानखेडेवरील आवाजाचा पारा वाढला होता. मागोमाग मग मेस्सीही मैदानात आल्याने चाहत्यांनी एकच जल्लोष केला. मेस्सीने संपूर्ण स्टेडियमला फेरी मारून फुटबॉलही चाहत्यांमध्ये भिरकावले. त्याच्या एका किकनंतर चेंडू थेट तिसऱ्या लेव्हलपर्यंत उडाला.
मेस्सीला फडणवीस, तेंडुलकर यांच्याकडून विशेष जर्सी भेट देण्यात आली. तसेच मेस्सीने भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीला आलिंगन दिले, तो क्षण पाहण्याजोगा होता. ऐरव्ही क्रिकेटच्या रंगात रंगून गेलेल्या वानखेडेवर रविवारी फक्त मेस्सी आणि मेस्सीच होता. त्यामुळेच हा क्षण खास होता. आता सोमवारी मेस्सी नवी दिल्ली येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. त्यानंतर मेस्सीचा भारत दौरा समाप्त होईल.
२०११मध्ये मेस्सी कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियममध्ये सामना खेळण्यासाठी आला होता. त्यानंतर प्रथमच तो १४ वर्षांनी भारतात परतला. मेस्सीचे जगभरात असंख्य चाहते आहेत. २०२२मध्ये मेस्सीच्या नेतृत्वात अर्जेंटिनाने विश्वचषक उंचावला. त्यामुळे मेस्सीची गणना फुटबॉलमधील महान खेळाडूंमध्ये केली जाऊ लागली. रविवारी मेस्सीने वानखेडेवरील काही लहान मुलांसह फुटबॉल खेळण्याचाही आनंद लुटला. या अनोख्या क्षणामुळे भविष्यात भारतातील युवकांनाही फुटबॉलकडे वळण्याची नक्कीच प्रेरणा मिळेल, हे निश्चित.