तो आला, त्याने पाहिले आणि त्याने जिंकले! मेस्सीची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड

अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार आणि फुटबॉल शौकिनांच्या गळ्यातील ताईत असलेला लिओनेल मेस्सी तीन दिवसांच्या आणि चार शहरांच्या दौऱ्यासाठी भारतात आला आहे. 'गोट इंडिया टूर २०२५' निमित्त कोलकाता आणि हैदराबाद भेटीदरम्यान शनिवारी मेस्सीला पाहण्यासाठी चाहत्यांची अक्षरशः झुंबड उडाली होती.
लिओनेल मेस्सी
लिओनेल मेस्सी
Published on

कोलकाता/हैदराबाद : अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार आणि फुटबॉल शौकिनांच्या गळ्यातील ताईत असलेला लिओनेल मेस्सी तीन दिवसांच्या आणि चार शहरांच्या दौऱ्यासाठी भारतात आला आहे. 'गोट इंडिया टूर २०२५' निमित्त कोलकाता आणि हैदराबाद भेटीदरम्यान शनिवारी मेस्सीला पाहण्यासाठी चाहत्यांची अक्षरशः झुंबड उडाली होती. मेस्सीची एक झलक पाहताच, 'तो आला, त्याने पाहिले आणि त्याने जिंकले !' अशी प्रतिक्रियाच चाहत्यांचा मुखातून उमटत होती.

शनिवारी पहाटे २.२६ वाजता बार्सिलोनाचा महान फुटबॉलपटू मेस्सीचे कोलकाता विमानतळावर आगमन झाले. मेस्सीला पाहताच चाहत्यांना एकच घोषणाबाजी करत त्याचे स्वागत केले. व्हीआयपी गेटवर अतिकडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीही चाहत्यांनी तोबा गर्दी केली होती. एकेकाळचा सहकारी लुइस सुआरेझ आणि रॉड्रिगो डे पॉल यांच्यासोबत आलेल्या मेस्सीला पाहताच चाहत्यांनी एकच कल्लोळ केला. आता पुढील ७२ तासांत मेस्सी कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि दिल्लीचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात तो वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री, कॉर्पोरेट उद्योजक, बॉलीवूड अभिनेते तसेच आजी-माजी क्रिकेटपटूंच्या भेटी घेणार आहे.

मुंबईत चोख सुरक्षाव्यवस्था

अर्जेंटिनाचा सुपरस्टार फुटबॉलपटू लिओनेल मेसी कोलकाता, हैदराबाद दौऱ्यानंतर रविवारी मुंबई दौऱ्यावर येणार आहे. कोलकातामधील चाहत्यांच्या राज्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मेस्सीचे दोन कार्यक्रम होणार असून त्यासाठी चोख सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दुपारी २ वाजता क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (ब्रेबॉर्न स्टेडियम) येथे 'पॅडेल गोट कप' कार्यक्रमात मेस्सी सहभागी होणार आहे. त्यानंतर गोट इंडिया टूरअंतर्गत दुपारी ५ वाजता वानखेडे स्टेडियमवर मुख्य कार्यक्रम होणार आहे. यावेळी सेलिब्रेटींचा सहभाग असलेला फुटबॉल सामना खेळवण्यात येणार आहे. त्यात मेस्सी खेळताना दिसेल. मेस्सीच्या या कार्यक्रमाला चाहत्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळण्याची शक्यता असल्याने २ हजारपेक्षा जास्त सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in