मी पुन्हा येईन! फुटबॉलपटू मेस्सीच्या भारत दौऱ्याचा नवी दिल्लीत संस्मरणीय समारोप

अर्जेंटिनाचा तारांकित फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या भारत दौऱ्याचा सोमवारी नवी दिल्ली येथे शानदार समारोप झाला. यावेळी मेस्सीने तमाम चाहत्यांना भारतात पुन्हा नक्की परतण्याचे आश्वासन दिले.
मी पुन्हा येईन! फुटबॉलपटू मेस्सीच्या भारत दौऱ्याचा नवी दिल्लीत संस्मरणीय समारोप
Published on

नवी दिल्ली : अर्जेंटिनाचा तारांकित फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या भारत दौऱ्याचा सोमवारी नवी दिल्ली येथे शानदार समारोप झाला. यावेळी मेस्सीने तमाम चाहत्यांना भारतात पुन्हा नक्की परतण्याचे आश्वासन दिले. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या या सोहळ्यात आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांच्या हस्ते मेस्सीला आगामी टी-२० विश्वचषकाचे खास तिकीट देण्यात आले.

३८ वर्षीय मेस्सी ‘गोट टूर ऑफ इंडिया’ अंतर्गत सध्या भारत दौऱ्यावर आला होता. मेस्सीसह त्याचा बार्सिलोना फुटबॉल क्लबमधील सहकारी लुईस सुआरेझ, तसेच अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू रॉड्रिगो डी पॉल हेदेखील भारत दौऱ्यावर होते. १३ तारखेला कोलकाता व हैदराबाद येथे या तिघांनी दौरा केला. कोलकाता येथे काहीशा दुर्दैवी कारणामुळे तो दौरा गाजला. मात्र हैदराबादला चाहत्यांना मेस्सीला मनसोक्त पाहता आले. मग रविवार, १४ डिसेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने चाहत्यांनी गर्दी केली. यावेळी भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा उपस्थित होते.

२०११मध्ये मेस्सी कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियममध्ये सामना खेळण्यासाठी आला होता. त्यानंतर प्रथमच तो १४ वर्षांनी भारतात परतला. मेस्सीचे जगभरात असंख्य चाहते आहेत. २०२२मध्ये मेस्सीच्या नेतृत्वात अर्जेंटिनाने विश्वचषक उंचावला. त्यामुळे मेस्सीची गणना फुटबॉलमधील महान खेळाडूंमध्ये केली जाऊ लागली. मेस्सी यंदा भारत दौऱ्यात कोणताही सामना खेळला नाही, मात्र त्याच्या फक्त मैदानावरील उपस्थितीने अनेकांची मने जिंकली. सोमवारी दिल्लीतही काहीसे असेच वातावरण होते.

“गेल्या तीन दिवसांत मला लाभलेले प्रेम, जिव्हाळा अतुलनीय व संस्मरणीय आहे. हा दौरा कधी संपला, हे समजलेच नाही. तुम्हा सर्वांचे प्रेम कायम असेच राहू द्या. पुढील वेळेस मला सामना खेळण्यास नक्की आवडेल. ते जमले नाही, तरी भारतात मी पुन्हा नक्की येईन,” असे मेस्सी त्याच्या भाषेत म्हणाला. यावेळी दिल्लीच्या स्टेडियममधील चाहत्यांनी एकच जल्लोष केला व मेस्सी मेस्सीचा जयघोष केला.

यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार भाईचुंग भुतिया हेसुद्धा मेस्सीसह मंचांवर उपस्थित होते. आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनी मेस्सीसह तिन्ही खेळाडूंना भारतीय क्रिकेट संघाची जर्सी प्रदान केली. त्या जर्सीमागे तिन्ही खेळाडूंचे नाव व क्रमांकदेखील होते. तसेच भारतीय खेळाडूंची स्वाक्षरी असलेली बॅट मेस्सीला देण्यात आली.

एकूणच दिल्लीतील या तासभराच्या कार्यक्रमातही मेस्सीने स्टेडियमला फेरी मारून चाहत्यांचे अभिवादन केले. लहान मुलांसह फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. २०२६मध्ये फिफा विश्वचषक रंगणार असल्याने त्यामध्ये मेस्सी खेळावा, अशी अद्यापही अनेकांची इच्छा आहे. मात्र तूर्तास, गेल्या ३ दिवसांत मेस्सीचे भारत भ्रमण देशातील असंख्य क्रीडाप्रेमींना कायमस्वरूपी स्मरणात राहील.

फ्लाइटला विलंब, मोदी भेट रद्द?

रविवारी रात्रीपर्यंत मुंबईतील ताज हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेला मेस्सी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणे अपेक्षित होते. मात्र दिल्लीतील वातावरणामुळे मेस्सीची फ्लाइट सकाळी १०.३० ऐवजी दुपारी २ वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर दाखल झाली. तोपर्यंत मोदी जॉर्डन देशाच्या दौऱ्यासाठी रवाना झाले होते. परिणामी मेस्सी-मोदी यांची भेट होऊ शकली नाही, असे समजते.

logo
marathi.freepressjournal.in