Lionel Messi's India Tour 2025: पुतळ्याचे अनावरण, स्टेडियममध्ये राडा; कोलकात्यानंतर मेस्सी कुठे अन् कोणाला भेटणार? जाणून घ्या मेस्सीचा संपूर्ण भारत दौरा

भारतातील फुटबॉल चाहत्यांची दीर्घ प्रतीक्षा संपली आहे. फुटबॉल दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सी १४ वर्षांनी भारतात आला आहे. मेस्सी भारतात ३ दिवस राहणार आहे आणि 'GOAT इंडिया टूर २०२५' अंतर्गत तो ४ शहरांना भेट देणार आहे. मेस्सी शनिवारी (१३ डिसेंबर) पहाटे कोलकाता विमानतळावर पोहोचला. आवडत्या खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी विमानतळापासून हॉटेलपर्यंतच्या रस्त्यांवर हजारो चाहत्यांनी रांगा लावल्या होत्या.
Lionel Messi's India Tour 2025: पुतळ्याचे अनावरण, स्टेडियममध्ये राडा; कोलकात्यानंतर मेस्सी कुठे अन् कोणाला भेटणार? जाणून घ्या मेस्सीचा संपूर्ण भारत दौरा
Photo- X
Published on

भारतातील फुटबॉल चाहत्यांची दीर्घ प्रतीक्षा संपली आहे. फुटबॉल दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सी १४ वर्षांनी भारतात आला आहे. मेस्सी भारतात ३ दिवस राहणार आहे आणि 'GOAT इंडिया टूर २०२५' अंतर्गत तो ४ शहरांना भेट देणार आहे. मेस्सी शनिवारी (१३ डिसेंबर) पहाटे कोलकाता विमानतळावर पोहोचला. आवडत्या खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी विमानतळापासून हॉटेलपर्यंतच्या रस्त्यांवर हजारो चाहत्यांनी रांगा लावल्या होत्या. त्याच्यासोबत माजी बार्सिलोना संघ सहकारी लुईस सुआरेझ आणि अर्जेंटिनाचा संघ सहकारी रॉड्रिगो डी पॉल होते. मेस्सी भारतात येण्याची ही पहिली वेळ नाही .तर याआधाही २०११ मध्ये तो भारत दौऱ्यावर आला होता. कसा असेल मेस्सीचा ३ दिवसीय भारत दौरा, जाणून घेऊयात.

चार शहरे, तीन दिवस आणि अनेक मोठे कार्यक्रम

GOAT इंडिया टूरची सुरुवात कोलकाता येथे झाली. चाहत्यांनी मेस्सीचे जल्लोषात स्वागत केले. सकाळी ९:३० ते १०:३० या वेळेत एका खाजगी कायक्रमात त्याने भाग घेतला. निवडक पाहुण्यांना आणि आयोजकांना मेस्सीला भेटण्याची संधी देण्यात आली. मेस्सीने लेक टाउन परिसरातील श्रीभूमी स्पोर्टिंग क्लबमध्ये उभारण्यात आलेल्या आपल्या ७० फूट उंच पुतळ्याचे व्हर्च्युअल पद्धतीने अनावरण केले.

दरम्यान, यावेळी बॉलिवूडचा किंग शाहरुख खान देखील उपस्थित होता. या अनावरणासाठी लेक टाउनमध्ये हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती. अशातच, दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या कार्यक्रमात मेस्सी अवघ्या काही मिनिटांसाठीच उपस्थित राहिल्याने प्रेक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली. या घटनेनंतर संतप्त चाहत्यांनी आयोजकांविरोधात बाटल्या फेकल्या, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळही उडाला. यानंतर, मेस्सी हैदराबादला रवाना झाला आहे.

कोलकातानंतर, मेस्सी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये फ्रेंडली फुटबॉल सामना खेळणार आहे. यामध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी आणि लोकसभा विरोधी पक्षनेता राहुल गांधी देखील खेळण्याची शक्यता आहे. सामन्यानंतर म्युझिक कॉन्सर्ट देखील आयोजित करण्यात आले आहे.

मेस्सी १४ डिसेंबर रोजी मुंबईत येणार आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर पॅडेल GOAT कप खेळला जाईल. याव्यतिरिक्त,बॉलिवूड कलाकारांसोबत सेलिब्रिटी फुटबॉल सामना खेळला जाईल. तसेच, मुंबईतील आयोजित कार्यक्रमात, फॅशन शो, अर्जेंटिनाच्या २०२२ च्या विश्वचषकाशी संबंधित स्मृतिचिन्हांचा लिलाव आणि एक स्पॅनिश म्युझिकल इव्हिनिंग यांचा समावेश असेल. शाहरुख खान आणि सचिन तेंडुलकरसारखे प्रमुख पाहुणे देखील यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

दिल्लीत दौऱ्याचा समारोप

मेस्सीचा भारत दौरा १५ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे संपेल. अरुण जेटली स्टेडियममध्ये होणाऱ्या कार्यक्रमात मेस्सी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची शक्यता आहे . याशिवाय, तो मिनर्व्हा अकादमीतील खेळाडूंचा सत्कार आणि चाहत्यांशी संवाद साधणार असल्याची चर्चा आहे.

मेस्सीचे संपूर्ण वेळापत्रक

  • १३ डिसेंबर

    हैदराबाद - ७:०० वाजता मैत्रीपूर्ण सामना आणि म्युझिकल कॉन्सर्ट

  • १४ डिसेंबर

    मुंबई - पॅडल GOAT कप आणि सेलिब्रिटी फुटबॉल सामना

  • १५ डिसेंबर

    नवी दिल्ली - समारोप समारंभ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

logo
marathi.freepressjournal.in