FIFA World Cup 2026 : महिमा मेस्सीचा, वर्षाव विक्रमांचा! ऑस्ट्रियाला नमवून गतविजेत्या अर्जेंटिनाची थाटात बाद फेरीत धडक

अपेक्षेप्रमाणे फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सोमवारी रात्री झालेल्या सामन्यात लिओनेल मेस्सीचाच डंका पाहायला मिळाला.
FIFA World Cup 2026 : महिमा मेस्सीचा, वर्षाव विक्रमांचा! ऑस्ट्रियाला नमवून गतविजेत्या अर्जेंटिनाची थाटात बाद फेरीत धडक
FIFA World Cup 2026 : महिमा मेस्सीचा, वर्षाव विक्रमांचा! ऑस्ट्रियाला नमवून गतविजेत्या अर्जेंटिनाची थाटात बाद फेरीत धडक
Published on

अर्लिंग्टन : अपेक्षेप्रमाणे फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सोमवारी रात्री झालेल्या सामन्यात लिओनेल मेस्सीचाच डंका पाहायला मिळाला. सुरुवातीला पेनल्टीवर गोल करण्याची संधी गमावूनही त्यानंतर मेस्सीनेच केलेल्या दोन विक्रमी गोलच्या बळावर गतविजेत्या अर्जेंटिनाने जे-गटातून अग्रस्थानासह बाद फेरी (राऊंड ऑफ ३२) गाठताना ऑस्ट्रियाचा २-० असा पराभव केला. ३८ वर्षीय मेस्सीने या लढतीत विश्वचषकात सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत १८ गोलसह अग्रस्थान काबिज केले, हे विशेष.

दरम्यान, डल्लास स्टेडियमवर झालेल्या या दुसऱ्या साखळी सामन्यात साहजिकच अर्जेंटिनाचे पारडे जड होते. मेस्सीच्या हॅटट्रिकच्या बळावर अर्जेंटिनाने पहिल्या लढतीत अल्जेरियाला ३-० अशी धूळ चारली होती. मग सोमवारी रात्री अनुक्रमे ३८ आणि भरपाई वेळेत म्हणजेच ९०+५ मिनिटाला दोन गोल नोंदवून मेस्सीने यंदाच्या विश्वचषकातील गोलची संख्या पाचवर नेली. त्यामुळे अर्जेंटिनाने २ सामन्यांतच ६ गुण वसूल करत आगेकूच केली आहे. त्यांची शेवटची साखळी लढत रविवारी जॉर्डनविरुद्ध होईल. ऑस्ट्रियाचा शेवटचा सामना अल्जेरियाविरुद्ध होणार असून या दोघांमधील विजेता दुसऱ्या स्थानासह आगेकूच करू शकतो.

जर्मनीचा माजी फुटबॉलपटू मिरोस्लाव क्लोझने विश्वचषकात २४ सामन्यांत सर्वाधिक १६ गोल नोंदवले होते. मेस्सीच्या नावावर आता २८ सामन्यांत १८ गोल जमा आहेत. फ्रान्सचा किलियान एम्बाप्पे १६ सामन्यांतील १६ गोलसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे यंदाचा विश्वचषक संपेपर्यंत मेस्सी आघाडी टिकवणार की एम्बाप्पे त्याच्यापुढे जाणार, हे पाहणे देखील रंजक ठरणार आहे.

ऑस्ट्रियाविरुद्ध नवव्या मिनिटाला मेस्सीने पेनल्टी मिस केली. तसेच १३व्या मिनिटालाही एक गोल करण्याची संधी हुकली. त्यावेळी मेस्सीचा दिवस नसल्याचे जाणवले. मात्र यातून त्वरितच सावरत ३८व्या मिनिटाला मेस्सीने गोलपोस्टच्या उजव्या बाजूला किक मारून अपयश पुसून काढले. मेडिनाने दिलेल्या पासवर अल्माडाने डोके चालवत स्वत: चेंडूला स्पर्श न करता पायांच्या मधून चेंडूला मेस्सीकडे जाण्यासाठी वाट मोकळी करून दिली. हीच संधी मेस्सीने साधून अर्जेंटिनाला मध्यंतरापर्यंत १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलसह मेस्सीने विश्वचषकात सर्वाधिक गोल करणाऱ्यांमध्ये आघाडी घेतली.

त्यानंतर दुसरे सत्र जवळपास गोलरहित जाणार असे वाटत असतानाच भरपाई वेळेत (९५वे मिनिट) अल्वारेझने संधी घालवल्यावर जवळच असलेल्या मेस्सीकडे चेंडू गेला व त्याला गोलरक्षकाने अडवल्यानंतरही दुसऱ्या प्रयत्नात मेस्सीने पुन्हा चेंडू गोलजाळ्यात धाडला आणि अर्जेंटिनाच्या २-० अशा विजयावर शिक्कामोर्तब केले.

हे चुकवू नका!

  • मेस्सीने या विश्वचषकात अर्जेंटिनासाठी सर्व पाच गोल केले आहेत. तसेच विश्वचषकात सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत आता मेस्सी १८ गोलसह अग्रस्थानी आहे.

  • मेस्सीचा हा सहावा विश्वचषक असून सलग सहा सामन्यांत गोल करण्याचा मान त्याने मिळवला आहे. जस्ट फॉन्टेन आणि जाइरझिनो या दिग्गज खेळाडूंच्या यादीत आता मेस्सीचे नाव सामील झाले आहे.

  • सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल नोंदवणाऱ्यांच्या यादीत मेस्सी १२२ गोलसह दुसऱ्या स्थानी कायम आहे. रोनाल्डो १४३ गोलसह या यादीत पहिल्या स्थानी आहे. मात्र मेस्सीने २०१, तर रोनाल्डोने २२९ सामने खेळले आहेत.

वाढदिवसापूर्वीच रिटर्न गिफ्ट

बुधवार, २४ जून रोजी मेस्सी वयाची ३९ वर्षे पूर्ण करून चाळीशीत पदार्पण करणार आहे. ऑस्ट्रिया संघाविरुद्धच्या कामगिरीद्वारे त्याने अर्जेंटिना संघासह संपूर्ण विश्वातील त्याच्या चाहत्यांना वाढदिवसापूर्वीच जणू रिटर्न गिफ्ट दिले, असे म्हणता येईल.

गोलफलक

अर्जेंटिना (२) - ऑस्ट्रिया (०)

लिओनेल मेस्सी (३८, ९०+५ मि.)

खरे सांगायचे तर, माझे वय किती आहे, याचा विचार करून मी कधीच खेळत नाही. माझे शरीर मला साथ देत असून संघासाठी जितके होईल, तितके योगदान देण्यास मी प्रयत्नशील आहे. हा विजय अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच कठीण होता. त्यामुळे सध्या मी संघ सहकाऱ्यांसोबत या क्षणाचा आनंद लुटत आहे.

लिओनेल मेस्सी

logo
marathi.freepressjournal.in