११व्या वर्षी अनाथ ते ऑलिम्पिक पदकविजेता; अमनचा संघर्षपूर्व प्रवास

ऑलिम्पिकचे वैयक्तिक पदक जिंकणारा सर्वात युवा खेळाडू असा मान अमन सेहरावत याने पटकावला आहे.
Aman Shehrawat
अमनचा संघर्षपूर्व प्रवासCanva
Published on

नवी दिल्ली : ऑलिम्पिकचे वैयक्तिक पदक जिंकणारा सर्वात युवा खेळाडू असा मान अमन सेहरावत याने पटकावला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्या २१ वर्षीय अमनने पुरुषांच्या ५७ किलो फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात त्याने १३-५ अशी बाजी मारली. मात्र ऑलिम्पिक पदकापर्यंतचा अमनचा प्रवास थक्क करणारा आहे.

एखाद्या खेळाडूने कुस्ती जगली आहे, असे लोकं सहसा म्हणतात. पण अमनच्या बाबतीत हे प्रत्यक्षात साकारले आहे. ११व्या वर्षीच त्याने आईला गमावले. पण अमनने कुस्तीपटू होऊन देशाचा नावलौकिक कमवावा, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. त्यामुळे आई गमावल्याचे दु:ख पचवता यावे, यासाठी वडिलांनी त्याला छत्रसाल स्टेडियममध्ये पाठवले. अगदी कोवळ्या वयात अमन दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये पोहोचल्यानंतर त्याचे आतापर्यंतचे सर्व आयुष्य कुस्तीचे मॅट आणि डावपेच पाहण्यातच गेले. सहा महिन्यांनंतर त्याच्या वडिलांचेही निधन झाले.

आईवडिलांचे छत्र हरवल्यानंतर अमन आणि त्याच्या बहिणी काका-काकूंकडे राहायला आल्या. काकांनीच त्यांचा स्वत:च्या मुलांप्रमाणे सांभाळ केला. अमन मात्र छत्रसाल स्टेडियममध्ये राहायला आला. त्याचे प्रशिक्षक ललित यांच्या बाजूलाच त्याची रूम होती. आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर त्याला वेगळी रूम आणि किचन देण्यात आले. “ऑलिम्पिक पदक जिंकणे सहज सोपे असते, तर प्रत्येकाने ते जिंकले असते,” असे त्याच्या रूमच्या भिंतीवर कोरण्यात आले आहे.

अमनचा ऑलिम्पिक पदकापर्यंतचा प्रवास एका रात्रीत घडलेला नाही. यासाठी त्याने अनेक वर्षे, कित्येक रात्री न झोपता मेहनत घेतली आहे. दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारा सुशील कुमार त्याच्यासाठी प्रेरणादायी आहे. त्याच्याकडूनच अनेक बाबतीत प्रेरणा घेत अमनने स्वत:ला घडवले आहे. विजय कुमार दहिया यालाही तो आपले प्रेरणास्थान मानतो. पण पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळवताना त्याने विजयलाच पराभूत केले होते.

पंतप्रधानांकडून कौतुक :

कांस्यपदक जिंकल्यानंतर अमनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. “नमस्ते अमन. पुढील भवितव्यासाठी तुला खूप खूप सदिच्छा. तू जे काही यश संपादन केले आहे, ते प्रेरणादायी आहे,” असे पंतप्रधानांनी त्याच्याशी फोनवरून संवाद साधत सांगितले.

आई-वडिलांना पदक समर्पित :

कोवळ्या वयातच आई-वडील गमावल्यानंतर त्याने ऑलिम्पिक पदक जिंकण्याचा निर्धार केला होता. शनिवारी त्याचे हे स्वप्न सत्यात उतरले. त्यानंतर त्याने हे पदक आपल्या पालकांना समर्पित केले आहे. “मी कुस्तीपटू व्हावे, ही माझ्या आई-वडिलांची इच्छा होती. ऑलिम्पिक स्पर्धेइतपत त्यांना माहिती नव्हती, मात्र मी कुस्तीपटू म्हणून घडावे, हेच त्यांना माहीत होते. त्यामुळे हे पदक मी माझे पालक आणि देशाला समर्पित करतो,” असे अमनने ऑलिम्पिक पदकाला गवसणी घातल्यानंतर सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in