चिन्नास्वामीत डीकॉकचा घणाघात

चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बंगळुरूने लखनऊला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र डीकॉक आणि कर्णधार के. एल. राहुल यांनी ३३ चेंडूंतच ५३ धावांची सलामी नोंदवली. राहुल १४ चेंडूंत २० धावांवर बाद झाला.
चिन्नास्वामीत डीकॉकचा घणाघात

बंगळुरू : अन्य फलंदाज पुरेशी साथ देण्यात अपयशी ठरत असतानाही क्विंटन डीकॉकने ५६ चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांसह ८१ धावांची घणाघाती खेळी साकारली. त्यामुळे लखनऊ सुपर जायंट्सने मंगळवारी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध २० षटकांत ५ बाद १८१ धावांपर्यंत मजल मारली.

चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बंगळुरूने लखनऊला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र डीकॉक आणि कर्णधार के. एल. राहुल यांनी ३३ चेंडूंतच ५३ धावांची सलामी नोंदवली. राहुल १४ चेंडूंत २० धावांवर बाद झाला. त्यानंतर देवदत्त पडिक्कलही (६) अपयशी ठरला. डीकॉकने मात्र सलग दुसरे अर्धशतक झळकावताना मार्कस स्टोइनिससह (२४) तिसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी रचली. रीस टॉप्लीने डीकॉकचा, तर ग्लेन मॅक्सवेलने स्टोइनिसचा अडसर दूर केला. अखेरीस निकोलस पूरनने २१ चेंडूंत ५ षटकारांसह नाबाद ४० धावा केल्या. बंगळुरूकडून मॅक्सवेलने दोन बळी मिळवले.

दोन सामन्यांच्या तारखांची अदलाबदल

कोलकाता आणि राजस्थान यांच्यात कोलकात्यामधील ईडन गार्डन्सवर १७ एप्रिल रोजी होणारा सामना आता एक दिवस अगोदर म्हणजेच १६ एप्रिलला खेळवण्यात येईल. तसेच १६ तारखेचा गुजरात-दिल्ली यांच्यातील सामना १७ तारखेला होईल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले. कोलकातामध्ये रामनवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असून तेथील पोलिसांनी सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण केला होता. १७ एप्रिल रोजी देशभरात रामनवमी साजरी केली जाईल. तसेच १९ एप्रिलला बंगालमध्ये निवडणूक असल्याने काही सुरक्षा कर्मचारी आधीच त्या कामात व्यस्त असतील, त्यामुळे आता ही लढत एक दिवस अगोदर होईल.

चॅम्पियन्स लीग पुन्हा सुरू होणार?

तब्बल १० वर्षांपूर्वी चॅम्पियन्स लीगचा अखेरचा म्हणजेच सहावा हंगाम झाला होता. आता ही लीग पुन्हा सुरू करण्याबाबत बीसीसीआयसह ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे क्रिकेट मंडळ चर्चा करत आहेत. चॅम्पियन्स लीगमध्ये विविध देशांतील फ्रँचायझी लीगमधून २-३ संघ सहभागी होतात. चेन्नई आणि मुंबई या संघांनी प्रत्येकी दोन वेळा ही लीग जिंकली आहे. तर एकदा ऑस्ट्रेलियातील सिडनी सिक्सर्स आणि न्यू साऊथ वेल्स या संघांनी जेतेपद मिळवले. या स्पर्धेत आयपीएलसह बिग बॅश लीग, द हंड्रेड आणि आफ्रिकेतील लीगमधील काही संघ सहभागी होण्याची शक्यता आहे. २०१४मध्ये झालेल्या अखेरच्या चॅम्पियन्स लीगमध्ये चेन्नईने अंतिम फेरीत कोलकाताला नमवले होते.

logo
marathi.freepressjournal.in