लखनऊ : लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांनी यंदाच्या मोसमात चांगली कामगिरी केली असून त्यांचा प्ले-ऑफ फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या या उभय संघांमधील लढतीत दुसऱ्या स्थानावर मजल मारण्याचे उद्दिष्ट असणारआहे.
वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सवर २४ धावांनी विजय मिळवून कोलकाताने १४ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यामुळे प्ले-ऑफ फेरीतील प्रवेशापासून ते फक्त एक विजय दूर आहेत. तसेच लखनऊ सुपर जायंट्स १२ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल सनरायजर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघही प्ले-ऑफच्या शर्यतीत असल्याने लखनऊवरील दडपण वाढले आहे. त्यामुळे कोलकातावर विजय मिळवून सरस धावगतीच्या आधारे दुसरे स्थान पटकावण्याचे त्यांचे ध्येय असेल.
गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचे १४५ धावांचे आव्हान गाठताना लखनऊची दमछाक झाली. त्यातच शेवटच्या षटकांत चार विकेट्स शिल्लक राखून लखनऊने हे उद्दिष्ट पार केले. कर्णधार लोकेश राहुल आणि मार्कस स्टॉइनिस हे खेळाडू लखनौसाठी महत्त्वाचे असून दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डीकॉकला सलामीला पुन्हा संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. लखनऊने डीकॉकला वगळून अर्शिन कुलकर्णीला सलामीला पाठवले. पण मुंबईविरुद्ध त्याला खातेही खोलता आले नाही.
आयुष बदोनीने सुरुवातीला चमक दाखवली, पण नंतर त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही. लखनऊच्या गोलंदाजांची कोलकाताविरुद्ध मात्र चांगलीच कसोटी लागणार आहे. लखनऊने सहा सामने जिंकले असले तरी त्यांच्या एकाही गोलंदाजाला वैयक्तिकरीत्या छाप पाडता आलेली नाही. त्यांचा वेगवान गोलंदाज मयांक यादव दुखापतीमुळे संघाबाहेर आहे.
कोलकाता नाइट रायडर्सची गोलंदाजी खराब होत असताना पंजाब किंग्जने आयपीएलमधील सर्वाधिक २६२ धावांचा यशस्वी पाठलाग केला. मात्र नंतरच्या दोन्ही सामन्यांत कोलकाताच्या गोलंदाजांनी छाप पाडली. यंदाच्या मोसमात कोलकाताची फलंदाजी दुसऱ्यांदा ढेपाळली. मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यांची अवस्था ५ बाद ५७ अशी झाली असताना व्यंकटेश अय्यर आणि मनीष पांडे यांनी संघाची बाजू सावरली. अय्यर (७०) आणि पांडे (४२) यांनी केलेल्या ८३ धावांच्या भागीदारीमुळे कोलकाताला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. त्यानंतर गोलंदाजीत मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, सुनील नरिन आणि आंद्रे रस्सेल यांनी छाप पाडली. स्टार्कने इशान किशनला बाद करत कोलकाताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर मुंबईची फलंदाजी कोलकाताविरुद्ध कोलमडत गेली. स्टार्कने चार विकेट्स मिळवत कोलकाताच्या विजयात मोलाची भूमिका निभावली.
लखनऊ सुपर जायंट्स
के. एल. राहुल (कर्णधार), क्विंटन डीकॉक, निकोलस पूरन, आयुष बदोनी, कायले मेयर्स, मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, देवदत्त पडिक्कल, रवी बिश्नोई, नवीन उल हक, कृणाल पंड्या, युधवीर सिंग, प्रेरक मंकड, यश ठाकूर, अमित मिश्रा, शामर जोसेफ, मयांक यादव, मोहसिन खान, के. गौतम, अर्शीन कुलकर्णी, एम. सिद्धार्थ, ॲश्टन टर्नर, डेव्हिड विली, अर्शद खान, मॅट हेन्री.
कोलकाता नाइट रायडर्स
श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव अरोरा, मिचेल स्टार्क, श्रीकर भरत, दुश्मंता चमीरा, हर्षित राणा, वेंकटेश अय्यर, मुजीब उर रहमान, सुनील नरिन, मनीष पांडे, अंक्रिश रघुवंशी, रहमनुल्ला गुरबाझ, रमणदीप सिंग, नितीश राणा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, शर्फेन रुदरफोर्ड, चेतन साकरिया, सकिब हुसैन, फिल सॉल्ट, रिंकू सिंग, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनी आणि जिओ सिनेमा ॲप