महाराष्ट्राला हॅट्‌ट्रिकसह एकंदर आठव्यांदा दुहेरी यश;अंतिम फेरीत दोन्ही संघांचे कर्नाटकवर वर्चस्व

महाराष्ट्राच्या किशोर-किशोरी संघाने अपेक्षेप्रमाणे ३३व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत दुहेरी यश संपादन केले.
महाराष्ट्राला हॅट्‌ट्रिकसह एकंदर आठव्यांदा दुहेरी यश;अंतिम फेरीत दोन्ही संघांचे कर्नाटकवर वर्चस्व
PM

टीपटूर (कर्नाटक) : महाराष्ट्राच्या किशोर-किशोरी संघाने अपेक्षेप्रमाणे ३३व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत दुहेरी यश संपादन केले. महाराष्ट्राने यंदा सलग तिसऱ्यांदा, तर एकंदर आठव्यांदा दुहेरी मुकूट पटकावला, हे विशेष. कर्नाटक खो-खो असोसिएशनतर्फे आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्राने दोन्ही गटांतील अंतिम फेरीत कर्नाटकवर मात केली. हारद्या वसावे आणि मैथिली पवार हे महाराष्ट्राच्या दोन्ही संघांचे कर्णधार स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. हारद्याला ‘भरत’, तर मैथिलीला ‘ईला’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

कल्पतरू क्रीडांगण, टीपटूर, कर्नाटक येथे खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेतील किशोर गटाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने कर्नाटकचा ३४-२२ असा १२ गुणांनी पराभव केला. धाराशीवचा हारद्या (३ मिनिटे संरक्षण व आक्रमणात २ गडी), आदेश पाटील (१.४० मि., ८ गडी), भिमसिंग वसावे (२.५० मि.), ओमकार सावंत (४ गडी) या चौकडीने महाराष्ट्राच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. गेल्या वर्षीसुद्धा महाराष्ट्राने कर्नाटकलाच अंतिम सामन्यात नमवले होते.

किशोरी गटातील अंतिम लढतीत महाराष्ट्राने कर्नाटकला १६-१४ असा एक डाव व २ गुणांनी सहज धूळ चारली. धाराशीवची मैथिली (२ मि., ६ गडी), स्नेहा लोमकाणे (१.४० मि., ६ गडी), वैष्णवी चाफे (१.२० मि.,) या त्रिकुटाला महाराष्ट्राच्या विजयाचे श्रेय जाते. राज्य अजिंक्यपद स्पर्धेतही हारद्या व मैथिली स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले होते. दोन्ही खेळाडू धाराशिव येथील छत्रपती व्यायामप्रसारक मंडळाचे खेळाडू आहेत. एकाच मंडळाच्या दोन खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेत सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाल्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे. त्या दोन्ही खेळाडूंना डॉ. चंद्रजित जाधव यांचे मार्गदर्शन लाभते.

३ महाराष्ट्राच्या दोन्ही सघांनी २०२१मध्ये हिमाचल प्रदेश, २०२२मध्ये सातारा व यंदा म्हणजेच २०२३मध्ये कर्नाटक येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावून दुहेरी मुकुटाची हॅट्‌ट्रिक साकारली.

१२-१७ महाराष्ट्राच्या किशोर संघाने एकंदर १२व्यांदा, तर किशोरी संघाने १७व्यांदा राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

logo
marathi.freepressjournal.in