
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांचा विश्वास सार्थ ठरवताना गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या टेबल टेनिसपटूंनी विजयी झेंडा फडकावला. गुजरात येथे ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील टेबल टेनिसच्या सांघिक प्रकारात गतविजेत्या महाराष्ट्राच्या महिलांनी रौप्यपदक, तर पुरष संघाने कांस्यपदकावर नाव कोरले.
मूळ राष्ट्रीय स्पर्धेला २७ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार असला तरी टेबल टेनिसपटूंना अन्य स्पर्धेत सहभागी व्हायचे असल्याने त्यांचे सामने लवकर खेळवण्यात आले. यंदा सात वर्षांनी प्रथमच नॅशनल गेम्स म्हणजेच राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे ९००हून अधिक खेळाडू ३४ क्रीडा प्रकारांत सहभागी होणार आहेत.
दरम्यान, महिला गटातील अंतिम सामन्यात पश्चिम बंगालने महाराष्ट्रावर ३-१ अशी मात केली. एकेरीच्या पहिल्या लढतीत अहिका मुखर्जीने स्वस्तिका घोषवर ११-३, ११-५, ११-३ असे वर्चस्व गाजवले. त्यानंतर रीतीशा टेनीसनने सुतिर्था मुखर्जीवर ११-९, १३-११, ११-९ असे वर्चस्व गाजवून महाराष्ट्राला बरोबरी साधून दिली. मात्र अनुभवी मौमा दासने दिया चितळेवर ६-११, १६-१४, १०-१२, १४-१२, ११-६ अशी सरशी साधली, तर सुतिर्थाने स्वस्तिकाला ११-४, ११-१३, ११-८, १०-१२, ११-६ असे नमवून पश्चिम बंगालचा विजय साकारला. महिलांमध्ये तमिळनाडू आणि तेलंगण या संघांनी कांस्यपदक पटकावले.
पुरुष गटातील अंतिम लढतीत बलाढ्य गुजरातने दिल्लीवर ३-० असे प्रभुत्व मिळवले. त्यांच्यासाठी मानव ठक्कर, हरमीत देसाई आणि मनुष शाह यांनी एकेरीचे तिन्ही सामने जिंकले. महाराष्ट्राला उपांत्य फेरीत दिल्लीकडून २-३ असा पराभव पत्करावा लागला. तर गुजरातने पश्चिम बंगालला नमवून अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे पुरुष विभागात महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.