महाराष्ट्रकन्या किरण प्रभू नवगिरेची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड

महेंद्रसिंह धोनीची चाहती असलेल्या किरणचा क्रिकेटपटू होण्यापर्यंतचा प्रवास फार रंजक आहे.
महाराष्ट्रकन्या किरण प्रभू नवगिरेची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड

येत्या सप्टेंबर महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महाराष्ट्रकन्या किरण प्रभू नवगिरेची निवड केली आहे. टी-२० आणि वन-डे संघांमध्ये किरण नवगिरे या नवोदित खेळाडूला संधी देण्यात आली आहे. शेतकरी कुटुंबातील किरण ही मूळची सोलापूरची आहे.

किरण नवगिरे हिने टी-२० क्रिकेटमध्ये १५० धावा फटकावण्याची किमया केली होती. महेंद्रसिंह धोनीची चाहती असलेल्या किरणचा क्रिकेटपटू होण्यापर्यंतचा प्रवास फार रंजक आहे. शालेय आणि महाविद्यालयीन काळात किरण एक मैदानी खेळाडू होती. तिने २०११-१२ आंतर-विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत भालाफेकीत सुवर्णपदक पटकाविले. याशिवाय विविध अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये तिने सुमारे १०० पदकांची कमाई केली. क्रिकेटला तिने कधीच प्राधान्य दिले नव्हते. किरणचे प्रशिक्षक गुलजार शेख यांनी सांगितले की, २०१६ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी किरणने क्रिकेटमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता. शेख म्हणाले की, “ती पुण्यातील आझम स्पोर्ट्स अकादमीमध्ये विद्यापीठ स्पर्धेसाठी आली होती. त्यावेळी ती गंमत म्हणून क्रिकेट खेळत होती. मी तिला षट्कार मारताना पाहिले. तिच्यातील क्षमता बघून मी थक्क झालो. मी आणि आमचे अध्यक्ष डॉ. पी ए इनामदार यांनी तिच्या क्रिकेट क्लबची चौकशी केली. तिचे उत्तर ऐकून आम्हाला आणखी एक धक्का बसला.” किरणने गुलजार शेख यांना दिलेल्या माहितीनुसार, ती फक्त गंमत म्हणून क्रिकेट खेळत होती. तिला क्रिकेट खेळण्यामध्ये स्वारस्य नव्हते. तिच्यामते, क्रिकेट हा फार महागडा खेळ आहे. त्याऐवजी तिला अॅथलेटिक्समध्ये चमकदार कामगिरी करून दाखवायची होती. त्यामुळे प्रशिक्षकांनी तिचा सर्व खर्च उचलण्याचे ठरविल्यानंतर तिने क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले.

२०१६-१७मध्ये, पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या वार्षिक स्पर्धेत किरण खेळली. तिथे तिने पाच सामन्यांत तिने ४२९ धावा केल्या. २०१७मध्ये तिची महाराष्ट्र संघात निवड झाली; पण तिने नागालँडला जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. २०२२ मध्ये वरिष्ठ महिला टी -२० चषक स्पर्धेमध्ये तिने नागालँडच्या संघाकडून खेळताना अरुणाचल प्रदेशविरुद्ध ७६ चेंडूत १६२ धावा फटकाविल्या होत्या. टी-२० सामन्यात १५०पेक्षा जास्त धावा करणारी ती एकमेव भारतीय पुरुष किंवा महिला क्रिकेटपटू ठरली.

किरणने गेल्या क्रिकेट हंगामात वरिष्ठ महिला टी-२० स्पर्धेत ५४ चौकार आणि ३५ षट्कारांसह ५२५ धावा फटकाविल्या होत्या. तिच्या या चमकदार कामगिरीमुळे तिला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. किरणमध्ये उत्तुंग षट्कार खेचण्याची अचाट क्षमता आहे. तिच्या याच क्षमतेमुळे तिची महिला टी २० चॅलेंजमध्ये निवड झाली. वूमन्स टी २० चॅलेंज स्पर्धेतील एका सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना किरणने ४३ चेंडूत पाच षट्कार आणि पाच चौकारांसह ६९ धावा केल्या होत्या. महिला टी-२० चॅलेंजनंतर किरणच्या आयुष्यात अनेक बदल झाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in