राज्य शासनाकडून विश्वविजेत्यांचा गौरव

महाराष्ट्र शासनातर्फे भारतीय संघातील स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज व राधा यादव या महाराष्ट्राच्या खेळाडूंना प्रत्येकी २.२५ कोटींचे धनादेश देऊन गौरवले. तसेच प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांना शासनाकडून २२.५ लाख रुपये देण्यात आले. वर्षा निवासस्थानी येथे हा गौरव सोहळा पार पडला.
राज्य शासनाकडून विश्वविजेत्यांचा गौरव
Photo : X (devendra fadnvis)
Published on

मुंबई : भारतीय विश्वचषक विजेत्या महिला संघातील राज्यातील तीन खेळाडूंचा शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. महाराष्ट्र शासनातर्फे भारतीय संघातील स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज व राधा यादव या महाराष्ट्राच्या खेळाडूंना प्रत्येकी २.२५ कोटींचे धनादेश देऊन गौरवले. तसेच प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांना शासनाकडून २२.५ लाख रुपये देण्यात आले. वर्षा निवासस्थानी येथे हा गौरव सोहळा पार पडला.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने ४७ वर्षांचा इतिहास संपुष्टात आणून आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद मिळवले. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव केला. भारत हा महिला विश्वचषक जिंकणारा चौथा देश ठरला. यापूर्वीच्या १२ विश्वचषकांपैकी ऑस्ट्रेलियाने ७, इंग्लंडने ४, न्यूझीलंडने एकदा जेतेपद मिळवले होते. भारताला २००५ व २०१७च्या विश्वचषकात अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. मात्र यावेळी हरमनप्रीतच्या रणरागिणींनी इतिहास रचून स्वप्नपूर्ती केली. या वाटचालीत स्मृती, जेमिमा व राधा या महाराष्ट्रातील खेळाडूंचे मोलाचे योगदान होते. त्यामुळे फडणवीस यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. तसेच प्रशिक्षकीय फळीतील अन्य सहकाऱ्यांनाही प्रत्येकी ११ लाख रुपये व सन्मानचिन्ह देण्यात आले. "भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे," असे फडणवीस म्हणाले. तसेच गोलंदाजी प्रशिक्षक आविष्कार साळवी, पद्मश्री डायना एडल्जी, ॲनालिस्ट अनिरुद्ध देशपांडे, लॉजिस्टिक सपोर्ट अपर्णा गंभीरराव, ऑपरेशन मॅनेजर मारुफ फजानदार, मिहिर उपाध्याय, पूर्वा काटे, ममता शिरसुल्ला यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, प्रधान सचिव संजय खंदारे, आयुक्त शितल तेली, उपसचिव सुनील पांढरे उपस्थित होते. एकंदरच खेळाडूंवर सध्या सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in