

मुंबई : खो-खो खेळाच्या आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच आता नवी माहिती समोर येत आहे. खो-खोच्या पहिल्या राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेच्या यजमानपदाचा मान महाराष्ट्राला मिळणार होता. मात्र खो-खो खेळाचे आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर गेल्या काही महिन्यांत सर्व काही बिघडल्याने आता ही संधी हरयाणाला दिली जाणार आहे. डिसेंबरमध्ये राष्ट्रकुल खो-खोचे आयोजन केले जाण्याची दाट शक्यता असून तूर्तास या स्पर्धेत १४ देशांच्या पुरुष-महिलांचा समावेश निश्चित मानला जात आहे.
एकीकडे २०२५च्या विश्वचषक विजेत्या भारतीय खो-खो संघातील महाराष्ट्राच्या खेळाडूंना अद्याप राज्य शासनाकडून २.२५ कोटी रुपयांचे रोख पारितोषिक न मिळाल्याचा मुद्दा ऐरणीवर आहेच. दुसरीकडे जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवर सातत्याने आयोजित केल्या जाणाऱ्या खो-खो स्पर्धांचे प्रमाण आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र फारच कमी आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याविषयी ‘नवशक्ति’ने मंगळवार, ११ ऑगस्टच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत भारतीय खो-खो महासंघाचे महासचिव उपकार सिंह यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
“भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल यांनी गतवर्षी जाहीर केल्याप्रमाणे २०२६मध्येच राष्ट्रकुल खो-खो स्पर्धा खेळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. महाराष्ट्राला या स्पर्धेच्या यजमानपदासाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील खो-खो खेळाची घडी बिघडल्याने हरयाणा येथे ही स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला,” असे उपकार सिंह म्हणाले. महासंघाचे खजिनदार गोविंद शर्मा यांनीही या वृत्तास दुजोरा देत अजित पवार यांच्या निधनाचा राज्यातील खो-खो खेळाला मोठा फटका बसल्याचे मान्य केले.
“जम्मू आणि काश्मीरनेदेखील काही कारणास्तव यजमानपद नाकारले. त्यामुळे डिसेंबरमध्ये हरयाणा येथे किमान १४ पुरुष-महिला संघांसह खो-खोची पहिली राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यासाठी महासंघ पूर्ण जोर लावत आहे. लवकरच याविषयी अधिकृत घोषणा केली जाईल. खो-खोचा दुसरा विश्वचषक किंवा अल्टिमेट लीगचे तिसरे पर्व कधी होईल, याविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही,” असेही उपकार सिंह यांनी आवर्जून सांगितले.
नवी दिल्ली येथे जानेवारी २०२५मध्ये झालेल्या पहिल्या खो-खो विश्वचषकात भारताने पुरुष-महिला अशा दोन्ही गटांत विजेतेपद पटकावले. त्या स्पर्धेत सहा खंडांतील २३ देश सहभागी झाले होते. मात्र विश्वचषकाला आता दीड वर्षे उलटली, तरी खो-खो खेळाच्या पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे भवितव्य अधांतरी आहे. भारतीय खो-खो महासंघातील भोंगळ कारभारही यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळेच खो-खो क्रीडाप्रकाराची आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाढ खुंटली आहे, असे ठामपणे म्हणता येईल.
‘तारीख पे तारीख’चा खेळ सुरू राहणार?
साधारणपणे दरवर्षी डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या सुरुवातीला वरिष्ठ गटाची राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा रंगते. जर डिसेंबरमध्ये राष्ट्रकुल खो-खो स्पर्धेचे आयोजन पक्के झाले, तर यामुळे राष्ट्रीय स्पर्धा पुढे ढकलली जाऊ शकते. कारण एकाच कालावधीत या दोन्ही स्पर्धा आयोजित करणे अयोग्य ठरेल. महाराष्ट्रातीलच बहुतांश खेळाडू हे भारतीय संघाचाही भाग असतील, यात शंका नाही. तसेच राष्ट्रकुलच्या महिन्याभरापूर्वी निवड चाचणी होऊन भारतीय संघाचे सराव शिबीर सुरू होणे अपेक्षित आहे. अशा स्थितीत महासंघापुढे वेळ कमी असून ते कशाप्रकारे सर्व स्थिती हाताळणार, हे पाहणे रंजक ठरेल. अन्यथा अल्टिमेट खो-खो लीग किंवा खो-खो विश्वचषकाप्रमाणे राष्ट्रकुलबाबतही ‘तारीख पे तारीख’चाच खेळ सुरू राहील.
खो-खोपटूंनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
विश्वचषक विजेत्या संघातील महाराष्ट्राच्या चार खो-खोपटूंनी मंगळवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या निर्णयानुसार विश्वचषक स्पर्धेतील विजेत्या वरिष्ठ सांघिक क्रीडाप्रकारातील खेळाडूंना २.२५ कोटींचे रोख पारितोषिक देण्याची तरतूद आहे. मात्र या खेळाडूंना अद्याप राज्य शासनाकडून ही रक्कम मिळालेली नाही. त्यासंबंधीच प्रतीक वाईकर, सुयश गरगटे, आदित्य गणपुले व रामजी कश्यप यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा यांच्याशी चर्चा केली. याबाबतची प्रक्रिया प्रगतिपथावर असून लवकरच रक्कम खेळाडूंच्या खात्यात जमा केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिल्याचे प्रतीकने सांगितले.