महाराष्ट्र पुन्हा पराभूत; हरयाणा २२ वर्षांनी अजिंक्य!

हरयाणाने मात्र तब्बल २२ वर्षांनी विजेतेपद मिळवताना भारतीय रेल्वेची मक्तेदारी संपुष्टात आणली. चार दिवस रंगलेल्या या स्पर्धेसाठी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
महाराष्ट्र पुन्हा पराभूत; हरयाणा २२ वर्षांनी अजिंक्य!

अहिल्यानगर : महाराष्ट्राच्या पुरुष संघाला ७०व्या राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत पुन्हा एकदा जेतेपद मिळवण्यात अपयश आले. महाराष्ट्राला उपांत्य फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. हरयाणाने मात्र तब्बल २२ वर्षांनी विजेतेपद मिळवताना भारतीय रेल्वेची मक्तेदारी संपुष्टात आणली. चार दिवस रंगलेल्या या स्पर्धेसाठी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

वाडीया पार्क क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेतील उपांत्य सामन्यांमध्ये हरयाणाने प्रथम महाराष्ट्राला ३८-३७ असे अवघ्या एका गुणाच्या फरकाने नमवले. त्यामुळे गतउपविजेत्या महाराष्ट्राला यंदा अंतिम फेरीसुद्धा गाठता आली नाही. २०२२मध्ये महाराष्ट्राने हरयाणालाच उपांत्य फेरीत धूळ चारली होती. यंदा मात्र हरयाणाने त्या पराभवाचा वचपा काढला.

त्यानंतर मग हरयाणाने अंतिम सामन्यात भारतीय रेल्वे संघाचा प्रतिकार ३५-३० असा मोडीत काढला. सलग चार वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या रेल्वेच्या संघाने उपांत्य फेरीत चंदीगडला नमवले होते. यंदा मात्र त्यांना जेतेपदाने हुलकावणी दिली. अंतिम लढतीत प्रो कबड्डी फेम अंशू मलिकने चढायांचे १३ गुण कमावून हरयाणाचा विजय साकारला. त्याला मोहित गोयतने ६, तर क्रिशनने ४ गुण मिळवून बचावात उत्तम साथ दिली. रेल्वेकडून पंकज मोहितेने ७ गुण मिळवून कडवी झुंज दिली. मात्र पवन सेहरावतची उणीव संघाला भासली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा माजी हॉकीपटू धनराज पिल्ले यांच्या उपस्थितीत पार पडला.

हरयाणाचे हे दुसरे राष्ट्रीय जेतेपद ठरले. यापूर्वी, बिहारला २००२मध्ये झालेल्या स्पर्धेत त्यांनी प्रथमच यश संपादन केले होते. २०१२, २०१४, २०१६ या वर्षांमध्ये त्यांना अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in