
पुणे : प्रत्येक शहरातून, गावातून अधिकाधिक ऑलिम्पिकवीर तयार झाले पाहिजे. आगामी २०२८, २०३२ मधील ऑलिम्पिकमध्ये भारताला जास्तीत जास्त पदके मिळतील व या यशात महाराष्ट्राचा मोठा वाटा असेल, असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुण्यातील ऑलिम्पिक दिनाच्या समारंभात केले. राज्यात ऑलिम्पिक दौड, खेळाडूंचा गौरव व क्रीडा प्रात्यक्षिकांनी क्रीडामय वातावरणात ऑलिम्पिक दिन साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना, क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि सर परशुराम महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑलिम्पिक दिन समारंभात ऑलिम्पिकपटू व अर्जून पुरस्कार खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यावेळी भरणे यांच्या हस्ते रेखा भिडे, मनोज पिंगळे, शंकुतला खटावकर, श्रीरंग ईनामदार, शांताराम जाधव, प्रदिप गंधे, स्मिता यादव, संजय दुधाणे, गायत्री शिंदे, गाथा खडके यांना गौरवण्यात आले.
ऑलिम्पिक दिनानिमित्त सकाळी ८ वाजता ऑलिम्पिक दौड काढण्यात आली. ऐतिहासिक लाल महाल येथे क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून दौड सुरू करण्यात आली. दौडीस शालेय विदयार्थ्यांना मोठा प्रतिसाद लाभला. सायकलिंग व स्केटिंगपटूही दौडीत सहभागी झाले होते. एनसीसीच्या शालेय बँड पथकाच्या निनादात क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दौडीचे स्वागत केले. शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर लेडी रमाबाई सभागृहामध्ये ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मुख्य समारंभ रंगला. मल्लखांब, योगा, जिम्नॅस्टिक, तायक्वांदो, किकबॉक्सिंग, स्केटिंग ड्रान्स व मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिकांनी उपस्थितींची मने जिंकली.
खेळाडूंच्या गौरव समारंभानंतर राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले यांची मनोगते झाली. खेळाडूंना पाठबळ देण्यासाठी राज्य सरकारने चांगले निर्णय घेतले आहे. क्रीडा खात्याने १४९ जणांना शासकीय नोकरी दिली आहे असे सांगून भरणे पुढे म्हणाले की, “राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदके जिंकण्यासाठी राज्याचा क्रीडामंत्री म्हणून मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.”
“महाराष्ट्रात अनेक गुणवान खेळाडू आहे. त्याचे प्रतिबिंब आपल्या पदकतालिकेत दिसले पाहिजे,” असे सांगून क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले म्हणाल्या की, “तळागळातून खेळाडू शोधण्यासाठी आपल्या योजना सुरू आहेत. विकसित महाराष्ट्र २०४७ यासाठी क्रीडा क्षेत्राचे धोरण निर्माण होत आहे, यासाठी खेळाडूंसह क्रीडा क्षेत्रातील सर्वांनीच गुगल फार्मवर आपल्या सूचना मांडा. या सूचनांचे आम्ही स्वागत करू.” कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव शिंरगांवकर यांनी केले, तर आभार प्रदिप गंधे यांनी मानले.