राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत हरियाणाला नमवून महाराष्ट्राची अंतिम फेरीत धडक
हरियाणातील चरखी, दादरी येथील ६९व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राने हरियाणाला नमवून अंतिम फेरीत धडक दिली.
बंदिस्त क्रीडा संकुलातील मॅटवर झालेल्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्राने बाजी मारली. काही वेळ बरोबरीत चाललेल्या या सामन्यात हरियाणाने आघाडी घेतली होती; पण महाराष्ट्राच्या किरण मगरने दोन अव्वल पकडी करीत महाराष्ट्राला बरोबरीत आणले. त्यानंतर महाराष्ट्राने मागे वळून पाहिले नाही. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांना एकही लोण देता आला नाही, तरी १६-११ अशी ५ गुणांची आघाडी महाराष्ट्राकडे होती.
उत्तरार्धात आपला खेळ थोडा गतिमान करीत महाराष्ट्राने हरियाणावर लोण देत आपली आघाडी वाढविली. त्यानंतर ती आपल्या हातून निसटणार नाही याची पुरेपूर काळजी घेत हा विजय साकारला.
अंतिम फेरीत दाखल होण्याची महाराष्ट्राची २४ वी वेळ आहे. १० वेळा विजेतेपद, तर १३ वेळा उपविजेतेपद त्यांनी मिळविले आहे. रेल्वे आणि गोवा यातील विजेत्या संघासोबत महाराष्ट्राची अंतिम लढत होईल.