आत्मपरीक्षणाची गरज!

गेल्या दशकभरात भारताने क्रीडा क्षेत्रात झपाट्याने भरारी घेतली आहे. क्रिकेट, बॅडमिंटन, बुद्धिबळ, भालाफेक, तिरंदाजी, नेमबाजी यांसारख्या विविध क्षेत्रांत भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर धवल यश मिळवलं. मात्र महाराष्ट्रातील क्रीडापटू भारताच्या विकासात कितपत योगदान देत आहेत? किंबहुना महाराष्ट्राच्या मातीतील क्रीडाप्रकारांची सद्यस्थिती काय आहे? याचा आढावा घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
आत्मपरीक्षणाची गरज!
नवशक्ति अक्षररंग
Published on

- स्ट्रेट ड्राईव्ह

गेल्या दशकभरात भारताने क्रीडा क्षेत्रात झपाट्याने भरारी घेतली आहे. क्रिकेट, बॅडमिंटन, बुद्धिबळ, भालाफेक, तिरंदाजी, नेमबाजी यांसारख्या विविध क्षेत्रांत भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर धवल यश मिळवलं. मात्र महाराष्ट्रातील क्रीडापटू भारताच्या विकासात कितपत योगदान देत आहेत? किंबहुना महाराष्ट्राच्या मातीतील क्रीडाप्रकारांची सद्यस्थिती काय आहे? याचा आढावा घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सोहळा यंदा उरकाउरकीतच पार पडला. गतवर्षी काही खेळांना यामधून वगळण्यात आल्याने राज्यातील क्रीडाप्रेमी पेटून उठले होते. मात्र यंदा त्या खेळांना पुन्हा पुरस्कारांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले. एकंदरीतच महाराष्ट्रातील क्रीडाप्रकारांकडे शासनाचे किती लक्ष आहे, हा चर्चेचा मुद्दा आहे.

देशातील एक प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. क्रीडा क्षेत्राच्या बाबतीतही महाराष्ट्र राज्यच इतरांचा आदर्श असायला हवे होते. दुर्दैवाने अन्य क्षेत्रातील प्रगतीच्या तुलनेत राज्यस्तरावर क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्र खूपच मागे आहे. कोट्यावधी खर्चाचे बजेट असलेल्या राज्याच्या क्रीडा खात्याचा कारभार ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असा चालला आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील सुमारे २०० स्पर्धांच्या आयोजनाचा वापर वाढवलेल्या आपल्या राज्यात पुण्याच्या शिवछत्रपती क्रीडानगरीचा अपवाद वगळता अन्यत्र परिपूर्ण क्रीडा संकुल नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा, होस्टेल, प्रशिक्षक एकत्रितरीत्या कुठेही नाही. इन्फ्रास्ट्रक्चरची जशी वानवा तशीच क्रीडा विकासाच्या योजनांचीही. प्रशिक्षकांची अपुरी संख्या, योजनांचा अभाव, कागदांवरच्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठीची मानसिकता नाही. अन्य कुणाला मदत करण्याची वृत्ती नाही. त्यामुळे उदयोन्मुख खेळाडू घडवण्याबाबत बोंब आहेच.

स्वकर्तृत्वाने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर कौतुकाची थापही कधी वेळेवर पडत नाही. हरयाणा, पंजाब, झारखंड, आसाम, मणिपूर यांसारखी छोटी राज्येदेखील आपल्या खेळाडूंचे कौतुक वेळेवर करतात. जाहीर झालेल्या रोख बक्षिसाच्या रकमा वेळेवर देतात. दिलेला शब्द पाळतात. महाराष्ट्राच्या बाबतीत असे खात्रीने म्हणता येणार नाही.

राज्यात क्रीडाप्रकारांची दुरवस्था अनेक ठिकाणी पाहायला मिळते. क्रीडांगणे आणि सुविधांची कमतरता तसेच खेळाडूंच्या विकासासाठी आवश्यक असलेले योग्य प्रशिक्षण आणि सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक खेळाडू आपली प्रतिभा योग्यरीत्या प्रदर्शित करू शकत नाहीत. अनेक ठिकाणी क्रीडांगणे अपुरी आहेत किंवा त्यांची योग्य देखभाल होत नाही. त्यामुळे खेळाडूंना नियमितपणे आणि चांगल्या प्रकारे सराव करण्यासाठी योग्य जागा मिळत नाही. अनेक क्रीडांगणांमध्ये आवश्यक सुविधा, जसे की योग्य व्यायामशाळा, प्रशिक्षण कक्ष किंवा आधुनिक उपकरणे उपलब्ध नाहीत. त्यामुळे खेळाडूंना आपल्या क्षमतेनुसार प्रशिक्षण घेणं कठीण होतं. योग्य प्रशिक्षक आणि मार्गदर्शक नसल्यामुळे खेळाडूंच्या विकासाला गती मिळत नाही. खेळाडूंच्या क्षमता व गरजा लक्षात घेऊन योग्य प्रशिक्षण देणं आवश्यक आहे, परंतु अनेक ठिकाणी याची कमतरता जाणवते.

अनेक ठिकाणी राजकीय आणि प्रशासकीय स्तरावरून क्रीडा क्षेत्राला आवश्यक तेवढं महत्त्व दिलं जात नाही. त्यामुळे क्रीडाप्रकारांच्या विकासासाठी आवश्यक असलेला निधी आणि पाठिंबा मिळत नाही. काही ठिकाणी सामाजिक आणि आर्थिक समस्यांमुळे, विशेषत: मागासलेल्या आणि ग्रामीण भागांतील मुला-मुलींना क्रीडा क्षेत्रात येणं आणि खेळणं कठीण होते. अनेक ठिकाणी क्रीडा संस्कृतीचा अभाव आहे. त्यामुळे मुला-मुलींमध्ये खेळांबद्दल आवड निर्माण होत नाही, तसेच खेळाडूंच्या कौशल्यांना योग्य संधी मिळत नाही.

राज्यात काही मोजकीच क्रीडा संकुलं असून त्यामध्ये अनुभवी प्रशिक्षक आहेत. मात्र खेड्यापाड्यात वसलेल्या लहानशा गावात ज्या मुलांना क्रीडा क्षेत्रात कारकीर्द घडवण्याची इच्छा असते, ते इथवर पोहोचत नाहीत. खो-खो आणि कबड्डी या आपल्या मातीतील खेळांनी गेल्या काही वर्षांत आपली मुळं अधिक घट्ट केली. मात्र राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद मिळवताना संघर्ष करावा लागत आहे. तसेच खो-खोच्या राष्ट्रीय स्पर्धेतही पुरुष संघाला रेल्वेकडून सातत्याने कडवी टक्कर मिळते. कुस्तीमध्ये महाराष्ट्र केसरी नेमकी खरी कोणती, हे सांगणं आजकल कठीण झालं आहे. हे चित्र हळूहळू बदलेल आणि महाराष्ट्र खेळाक्षेत्रात सर्वार्थाने उभारी घेईल, अशी आशा आहे.

दुर्लक्षित क्रीडाप्रकारांकडे लक्ष देण्याची गरज!

महाराष्ट्राने नुकत्याच झालेल्या नॅशनल गेम्समध्ये चमकदार कामगिरी केली. आपल्या येथे राजेशाही सुविधा नसूनही राज्यातील खेळाडूंनी छाप पाडली. खेळाडूंनी पदके जिंकून आणली किंवा राज्यासाठी जेतेपदं मिळवली, की त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव होतो. रोख पारितोषिकं दिली जातात. मात्र त्यापूर्वी त्यांना तितक्या सुविधा दिल्या, तर अधिक सोयीचं होईल. बॅडमिंटनमध्ये आता स्थिती फार सुधारली आहे. कबड्डी, खो-खो या खेळांच्या राष्ट्रीय स्पर्धाही सुरळीतपणे आयोजित करण्यात येत आहेत, असं मला वाटतं. हो, मात्र जे खेळ लुप्त होत आहेत किंवा जे फक्‍त पुरस्कारापर्यंत मर्यादित राहिले आहेत त्यांचा विचार करण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांत तिरंदाजीमध्ये आपण देशाला प्रतिभावान खेळाडू दिले. मात्र कुस्ती, बॉक्सिंग यांसारख्या खेळात महाराष्ट्राने आणखी हिऱ्यांचा शोध घेणं गरजेचं आहे. संघटनांमध्ये पारदर्शक कारभार राहिला आणि खेळाडूला किशोरवयातच योग्य प्रशिक्षण मिळाले, तर नक्कीच महाराष्ट्रातून ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू घडतील.

- प्रदीप गंधे, जीवनगौरव पुरस्कार विजेते

मैदानं वाचवणं महत्त्वाचें!

महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्रात उद्धार होण्यासाठी मैदानं वाचवणं गरजेचं आहे. अनेकदा विविध क्रीडाप्रकारांच्या मैदानात शासकीय कार्यक्रमांची रेलचेल दिसते. तसेच काही राजकीय पक्षही क्रीडा मैदानांचा मोठ्या सभेसाठी वापर करतात. काही खेळाडू लांब पल्ला पार करत दररोज सरावासाठी विविध मैदानं गाठतात. मैदानाचा गैरवापर कमी झाल्यास खेळाडूंना पुरेशी संधी मिळेल. त्याशिवाय जे खेळ आता फारसे आपल्याला दिसत नाहीत किंवा त्यांच्या राष्ट्रीय स्पर्धा कधी होतात, हे कळत नाही, अशा खेळांसाठी संघटनांनी पुढे येणं गरजेचं आहे. खेळाद्वारे खेळाडूंना नोकरी मिळाली की आपसूकच युवा पिढीचा त्या खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. कबड्डी, कॅरम, खो-खो या खेळांद्वारे खेळाडूंना शासकीय नोकरी आता उपलब्ध आहेत. तसेच त्यांना भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधीही लाभते.

- अरुण सावंत, मैदान वाचवा समिती

bamnersurya17@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in