राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचा तामिळनाडूवर विजय

महाराष्ट्राने साखळीतील शेवटच्या सामन्यात आक्रमक सुरुवात केली.
 राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचा तामिळनाडूवर विजय

हरियाणा येथील चरखी-दादरी येथील बंदिस्त क्रीडा संकुलात सुरू असलेल्या ६९व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राने ड गटातील आपल्या शेवटच्या साखळी लढतीत तामिळनाडूला ३९-३० असे पराभूत करीत बाद फेरी गाठली.

महाराष्ट्रासह गतविजेता भारतीय रेल्वे, बिहार, सेनादल, दिल्ली, गोवा, राजस्थान, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, केरळ, हरियाणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, पंजाब यांनी बाद फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्राने साखळीतील शेवटच्या सामन्यात आक्रमक सुरुवात केली. अस्लम इनामदार, आकाश शिंदे यांनी आपल्या चढाईतील आक्रमकतेला संयमाची जोड देत संघाला गुण मिळवून दिले.

कप्तान शंकर गदई, किरण मगर यांनी बचाव भक्कमपणे सांभाळत व योग्य वेळी पकडी करीत उत्तम कामगिरी केली. पूर्वार्धातच या खेळाच्या जोरावर महाराष्ट्राने दोन लोण देत २६-१९ अशी आघाडी आपल्याकडे राखली होती. उत्तरार्धात संयमाने खेळ करीत सामना संथ केला आणि नऊ गुणांनी आपल्या सलग तिसऱ्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

अस्लमने चढाईत नऊ गुण टिपले, तर पकडीत तीन गुण असे १२ गुण वसूल केले. आकाशने एक बोनससह सात गुण असे आठ गुण मिळविले. शंकराने तीन, तर किरणने दोन पकडी यशस्वी केल्या. उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राची लढत आता केरळ संघाशी होईल.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in