महाराष्ट्राचे सुवर्णपदकांचे अर्धशतक साकार! दिवसभरात २० पदकांची कमाई; अग्रस्थान अधिक भक्कम

महाराष्ट्राने १२व्या दिवशी २० पदकांची कमाई करताना पदकतालिकेतील अग्रस्थान कायम राखले आहे.
महाराष्ट्राचे सुवर्णपदकांचे अर्धशतक साकार! दिवसभरात २० पदकांची कमाई; अग्रस्थान अधिक भक्कम

चेन्नई : खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत मंगळवारी महाराष्ट्राने सुवर्णपदकांचे अर्धशतक साकारले. महाराष्ट्राने १२व्या दिवशी २० पदकांची कमाई करताना पदकतालिकेतील अग्रस्थान कायम राखले आहे. जलतरण, तिरंदाजी, कुस्ती, बॅडमिंटन या प्रकारांत महाराष्ट्राने वर्चस्वपूर्ण कामगिरी केली. महाराष्ट्राच्या खात्यात ५२ सुवर्ण, ४६ रौप्य व ५१ कांस्य अशी एकूण १५० पदके जमा आहेत. हरयाणा १०९ पदकांसह दुसऱ्या, तर तामिळनाडू ९१ पदकांसह तिसऱ्या स्थानी आहे.

जलतरणात महाराष्ट्राच्या पलक जोशीने २०० मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत १८.५९ सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक काबिज केले. तसेच २०० मीटर वैयक्तिक मिडले प्रकारात सानवी देशवालने २७.६४ सेकंदांसह रौप्यपदक जिंकले. मुलांच्या २०० मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत ऋषभ दासने रौप्यपदक जिंकले. त्याशिवाय मुलींच्या रिले शर्यतीत महाराष्ट्राने रुपेरी यश मिळवले.

तिरंदाजीत विश्वविजेत्या आदिती गोपीचंद स्वामीने डबल धमाका केला. महाराष्ट्राने या प्रकारात एकूण ३ सुवर्णांसह ६ पदके पटकावली. आदितीने कम्पाऊंड प्रकारातील वैयक्तिक व मिश्र दुहेरीत सुवर्ण यश संपादन केले. मग रिकर्व्ह प्रकारात पृथ्वीराज घाडगे व शर्वरी शेंडे या जोडीने सुवर्णपदकाचा वेध घेतला. वेटलिफ्टिंगमध्ये ग्रिष्मा थोरातने मुलींच्या ७६ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले. तिने एकूण १६७ किलो वजन उचलले. मुलांच्या १०२ किलो वजनी गटात सार्थ जाधवने कांस्यपदकाची कमाई केली. त्याने २६४ किलो एकूण वजन उचलले.

कुस्तीमध्ये महाराष्ट्राने प्रत्येकी तीन पदकांना गवसणी घातली. अर्जुन गादेकरने ८० किलो गटात सुवर्णपदकाच्या लढतीत दिल्लीच्या नीरज कुमारला धूळ चारली. मुलींच्या ५३ किलो गटात सानिका पाटीलला पराभव पत्करावा लागल्याने तिने रौप्यपदक जिंकले. अपेक्षा पाटीलने ६५ किलो गटात कांस्यपदकावर कब्जा केला. टेनिसमध्ये तनिष्क जाधव व काहीर वारीक यांच्या जोडीने रौप्यपदकावर नाव कोरले. त्यांना अंतिम लढतीत तामिळनाडूच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. मुलींच्या गटात सोनल पाटील व ऐश्वर्य जाधव यांच्या जोडीने कांस्यपदक प्राप्त केले.

बॅडमिंटनमध्ये मुलींना सांघिक उपविजेतेपद

बॅडमिंटमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी दमदार कामागिरी बजावताना सर्वसाधारण उपविजेतेपद पटकवले. आंध्र प्रदेश संघाला सर्वसाधारण विजेतेपद देण्यात आले तर ओडिसा संघाने गटात तिसरे स्थान राखले. गतवर्षी महाराष्ट्राने या प्रकारात सुवर्ण पटकावले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in