साताऱ्याच्या कालिदासची कांस्यक्रांती

३० किमीच्या टप्प्यावर पायात क्रॅम्प आल्यामुळे एकवेळ मांढरदेवीच्या या ३१ वर्षीय वाघाला चालणेही कठीण जात होते. परंतु
साताऱ्याच्या कालिदासची कांस्यक्रांती

कुटुंबातील हलाखीची परिस्थिती, आजवर केलेला संघर्ष आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, हे साताऱ्याच्या कालिदास हिरवेने रविवारी सिद्ध केले. टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राच्या या पठ्ठ्याने भारतीय धावपटूंच्या विभागात तिसरे स्थान मिळवून कांस्यपदकावर नाव कोरले. मुख्य म्हणजे ३० किमीच्या टप्प्यावर पायात क्रॅम्प आल्यामुळे एकवेळ मांढरदेवीच्या या ३१ वर्षीय वाघाला चालणेही कठीण जात होते. परंतु त्याने हार मानली नाही आणि जोखीम पत्करून २.१९.५४ तासांत ४२ किमी अंतर गाठून पदक मिळवलेच.

गेली १५ वर्षे पुण्यातील बालेवाडी येथे सराव करणारा मराठमोळा कालिदास यंदा प्रथमच पूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभागी झाला. २०१९मध्ये त्याने हाफ मॅरेथॉन म्हणजेच २१ किमी गटात समावेश नोंदवला होता. परंतु यावेळी त्याने पुढचा टप्पा गाठत पदकावर नाव कोरले. मॅरेथॉनला प्रारंभ झाल्यानंतर ३० किमीच्या टप्प्यावर असताना त्याच्या मांडीचे स्नायू ताणले गेले. त्यामुळे एकवेळ कालिदासला शर्यत सोडावी लागणार की काय, असे वाटू लागले. परंतु येथेच त्याची चिवट वृत्ती कामी आली.

“ग्रामीण भागातील असल्याने बालपणापासूनच संघर्षाची सवय होती. त्यामुळे क्रॅम्प आला तेव्हा एकदाही मी थांबण्याचा विचार केला नाही. कारण पहिल्या तिघांत येण्याचे लक्ष्य माझ्या डोळ्यांसमोर होते. जोखीम पत्करल्यामुळे कदाचित माझ्या कारकीर्दीवर संकट ओढवले असते. परंतु मी त्याचा विचार न करता धावत राहिलो. अखेरीस विजयरेषा गाठल्यानंतर मला मेडिकल रूममध्ये नेण्यात आले. जवळपास एक तास मी पडून होतो. त्यामुळे मला पदक वितरण सोहळ्यासाठी मंचावरही जाता आले नाही,” असे कालिदास म्हणाला.

कालिदासच्या वडिलांचे तसेच भावाचे काही काळापूर्वी निधन झाले होते. त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावरच आली. आई, पत्नी, एक वर्षाचा मुलगा तसेच भाऊ-बहिणी असा त्याचा परिवार असून, एलआयसी कंपनीत कामाला असलेल्या या लढवय्याने आता दिल्ली मॅरेथॉन तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत छाप पाडण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. ‘जिवंत असेपर्यंत धावत राहीन’ या धोरणाचे पालन करणारा कालिदास भविष्यात भारतासाठीही धवल यश मिळवेल, इतकीच अपेक्षा.

प्रशिक्षकांची मेहनत फळली!

प्रशिक्षक राजगुरू कोचळे यांच्या मार्गदर्शनामुळे इथवर मजल मारू शकल्याचे कालिदास अभिमानाने सांगतो. मांढरदेवी येथे कोचळे गरीब तसेच होतकरू विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देतात. कालिदाससुद्धा त्यापैकीच एक. काही दिवसांपूर्वीच त्याने महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेत १० किमी शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. एकीकडे सैन्यातील धावपटू मॅरेथॉनमध्ये वर्चस्व गाजवत असताना त्यांच्यात स्वत:चे स्थान निर्माण केल्यामुळे कालिदास समाधानी अाहे. पुढील वेळेस स्पर्धेत सहभागी होताना शरीरातील पाणी, वातावरण या स‌र्व बाबींचा अधिक अभ्यास करेन, अशी कबुलीही त्याने दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in