

मुंबई: आयपीएलमधील पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स संघात मोठ्या बदलांना सुरुवात झाली आहे. मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी दोन हंगामांनंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. श्रीलंकेचा माजी दिग्गज क्रिकेटपटू असलेल्या जयवर्धनेच्या पदावरून दूर होण्याच्या निर्णयाची फ्रँचायझीने शनिवारी अधिकृत घोषणा केली. जयवर्धनेच्या निर्णयामुळे मुंबई इंडियन्सच्या नव्या पर्वाची सुरुवात मानली जात आहे.
जयवर्धनेने दोन टप्प्यांत मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळले. ४९ वर्षीय जयवर्धने यांचा मुंबई इंडियन्ससोबतचा हा दुसरा कार्यकाळ होता. २०२५ च्या हंगामापूर्वी त्यांनी पुन्हा मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली होती. यापूर्वी २०१७ ते २०२२ या काळात त्यांनी संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले होते. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात मुंबईने २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले.
मात्र, दुसऱ्या कार्यकाळात मुंबई इंडियन्सला अपेक्षित यश मिळाले नाही. २०२४ मध्ये मुंबई गुणतालिकेत तळाला राहिली होती. २०२५ मध्ये संघाने चौथे स्थान मिळवत क्वालिफायर-२ पर्यंत मजल मारली; मात्र २०२६ च्या हंगामात मुंबई इंडियन्सची नवव्या स्थानावर घसरण झाली.
दरम्यान, कर्णधार हार्दिक पंड्यालाही आयपीएल २०२७ पूर्वी अन्य संघाकडे पाठवण्याच्या शक्यतेबाबत मुंबई इंडियन्सच्या सूत्रांनी एनडीटीव्हीला माहिती दिल्याचे वृत्त आहे. फ्रँचायझी यासंदर्भात प्रस्ताव स्वीकारण्यास तयार असल्याचेही सांगण्यात आले आहे. मात्र, हार्दिकच्या संभाव्य ट्रेडबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
प्रशिक्षकपद सोडताना जयवर्धनेने मुंबई इंडियन्ससोबतच्या आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला, "मुंबई इंडियन्स हा गेल्या दशकाहून अधिक काळ माझ्या प्रवासाचा अत्यंत खास भाग राहिला आहे. खेळाडू, प्रशिक्षकवर्ग, 'वन फॅमिली'चे पाठबळ आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चाहत्यांनी हा अनुभव कायम स्मरणात राहील असा बनवला. आम्ही एकत्र अनेक अविस्मरणीय क्षण अनुभवले, आव्हानांवर मात केली आणि अभिमान वाटावा असे काहीतरी घडवले."
मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानी आणि आकाश अंबानी यांचेही त्याने आभार मानले. "वर्षानुवर्षे दाखवलेला विश्वास, पाठिंबा आणि मैत्री याबद्दल मी नीता अंबानी आणि आकाश अंबानी यांचे मनापासून आभार मानतो. आम्ही मिळून जे साध्य केले, त्याचा मला अभिमान आहे. मुंबई इंडियन्ससाठी माझ्या मनात नेहमीच खास स्थान राहील. आगामी वाटचालीसाठी संघाला माझ्या शुभेच्छा," असे जयवर्धनेने सांगितले.
जयवर्धनेने २०२२ ते २०२४ या काळात मुंबई इंडियन्सच्या जागतिक कामगिरी विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहिले. या काळात फ्रँचायझीने विविध आंतरराष्ट्रीय टी-२० लीगमध्ये विस्तार केला. त्याच्या मार्गदर्शनाखाली मुंबई इंडियन्स महिला संघ, एमआय न्यूयॉर्क आणि एमआय एमिरेट्स यांनी आपापल्या स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावले. जागतिक कामगिरी विभागाची जबाबदारी सांभाळल्यानंतर जयवर्धने २०२५ च्या हंगामापूर्वी पुन्हा मुख्य
प्रशिक्षकपदी परतला होता. त्याआधी दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू मार्क बाऊचर याने मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षकपद सांभाळले होते. आता मुंबई इंडियन्सला १५ नोव्हेंबरच्या खेळाडू कायम ठेवण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी नव्या प्रशिक्षकाचा शोध घ्यावा लागणार आहे. डिसेंबरच्या मध्यावर गोव्यात आयपीएलचा लिलाव होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशिक्षकपदावरील बदलांसोबतच खेळाडूंच्या संभाव्य फेरबदलांकडेही क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.
पाच दिग्गजांच्या नावांची चर्चा
मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू मायकेल हसी आणि आरोन फिंच, दक्षिण आफ्रिकेचे एड्रियन बिरेल आणि मार्क बाऊचर, तसेच इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गन यांच्या नावांची चर्चा आहे. आगामी काही दिवसांत या पाचही जणांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. फिचने ऑस्ट्रेलियाला कर्णधार म्हणून टी-२०
विश्वचषक जिंकून दिला आहे. त्याने आयपीएलमध्ये तब्बल नऊ वेगवेगळ्या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. इंग्लंडच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक असलेल्या मॉर्गनने कोलकाता नाइट रायडर्सचेही काही वर्षे नेतृत्व केले होते. त्याच्या नियुक्तीमुळे मुंबई इंडियन्सच्या खेळण्याच्या दृष्टिकोनात आधुनिकता येऊ शकते. एड्रियन बिरेल यांच्याकडे व्यापक प्रशिक्षकीय अनुभव आहे. त्यांनी जगभरातील पुरुष आणि महिला संघांसोबत काम केले आहे. बाऊचरने २०२३ आणि २०२४ या हंगामांत मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळले होते.
नीता अंबानींकडून जयवर्धनेचे कौतुक
मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानी यांनीही जयवर्धनेच्या योगदानाची प्रशंसा केली. त्या म्हणाल्या, "महेलाने गेल्या अनेक वर्षांत मुंबई इंडियन्ससाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्याचे शांत नेतृत्व, प्रामाणिकपणा आणि क्रिकेटवरील प्रेम आमच्यासाठी खूप मोलाचे आहे. संपूर्ण मुंबई इंडियन्स परिवाराच्या वतीने मी महेलाचे त्याच्या योगदानाबद्दल आणि सातत्यपूर्ण बांधिलकीबद्दल आभार मानते. आम्ही एकत्र अनुभवलेला प्रवास आणि निर्माण केलेल्या आठवणी कायम जपून ठेवू. महेला नेहमीच आमच्या 'वन फॅमिली'चा भाग राहील. त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो."
नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू
जयवर्धने यांच्या राजीनाम्यानंतर मुंबई इंडियन्सला नव्या मुख्य प्रशिक्षकाचा शोध घ्यावा लागणार आहे. १५ नोव्हेंबरच्या खेळाडू कायम ठेवण्याच्या अंतिम मुदतीला एक महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक असल्याने फ्रँचायझीसमोर प्रशिक्षक निवडीचे महत्त्वाचे आव्हान आहे. आयपीएलचा लिलाव डिसेंबरच्या मध्यावर गोव्यात होण्याची शक्यता आहे. जयवर्धनेच्या जागी नव्या प्रशिक्षकाचा शोध घेण्याची प्रक्रिया मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाने सुरू केली आहे. रविवारपासून संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती सुरू होणार असून, संघाला नवा दृष्टिकोन आणि विचार देऊ शकणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.