महेंद्रसिंह धोनीने चक्क झाडाखालील डॉक्टरकडून घेतले उपचार
क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीने नुकतेच चक्क झाडाखालील डॉक्टरकडून गुडघ्यावर उपाचार करून घेतले. धोनीला काही दिवसांपासून गुडघेदुखीचा त्रास आहे. यावर उपचार घेण्यासाठी तो रांचीतील एका डॉक्टरकडे गेला होता. एका ग्रामीण भागात असलेले हे डॉक्टर आपले रूग्ण झाडाखाली बसून तपासतात. वंदन सिंह खेरवार असे या डॉक्टरांचे नाव असून ते गेल्या २८ वर्षापासून रूग्णांवर उपचार करत आहेत. उपचार करत असलेल्या झाडाखालीच त्यांचा एक तंबू आहे. या तंबूतच धोनी या डॉक्टरांना भेटला. धोनीवर उपचार करण्यासाठी या डॉक्टरने एका डोसचे अवघे ४० रूपये घेतले.
रांचीपासून सुमारे ७० कि.मी. अंतरावर असणाऱ्या कटिंगकेला या लापूंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावात डॉ. खेरवार हे गेल्या २८ वर्षापासून रूग्णांवर उपचार करीत आहेत. या डॉक्टरांकडे धोनी आपल्या गुडघ्यावर उपचार घेण्यासाठी आला होता. तो एक महिनाभर या झाडाखालील डॉक्टरांना भेटत होता. हे डॉक्टर हाडांवर उपचार करतात; मात्र त्यांची औषधे घरी घेऊन जाता येत नाहीत. त्यामुळे तंबूतच रूग्णांवर औषधोपचार केले जातात. धोनी या उपचारांसाठी दोन चार दिवसांच्या अंतराने महिनाभर जात होता.
धोनीच्या आधी या डॉक्टरांकडून त्याच्या पालकांनी देखील उपचार घेतले आहेत. खारवार यांनी सांगितले की, पहिल्यांदा त्यांनी धोनीच्या पालकांना ओळखलेच नव्हते. धोनीला देखील ओळखले नाही. ज्यावेळी शेजारील तरूण मुले त्याच्याभोवती गोळा होऊन फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे लागली त्यावेळी धोनीच्या प्रसिद्धीबद्दल माहिती झाली.
ते पुढे म्हणाले, धोनी हा एखाद्या सामान्य रूग्णाप्रमाणे कोणताही गाजावाजा न करता आला. त्याला सेलिब्रेटी असल्याचा कोणताच गर्व नव्हता. प्रत्येक चार दिवसांनी धोनी आल्याची बातमी पसरत होती आणि धोनीचे चाहते दवाखान्याजवळ येत होते. त्यामुळे आता मी त्याच्या गाडीत बसूनच त्याच्यावर औषधोपचार करत असतो.