
भारताचा अनुभवी नेमबाज मैराज अहमद खानने सोमवारी आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या स्कीट प्रकारात पहिले सुवर्णपदक मिळविले. ४० शॉटच्या अंतिम फेरीत उत्तर प्रदेशातील या ४६ वर्षीय मैराजने ३७ चा स्कोअर करून कोरियाच्या मिंसु किम (३६) आणि ब्रिटनच्या बेन लीवेलिन (२६) यांना मागे टाकले. दोन वेळचा ऑलिम्िपयन असलेल्या मैराजने २०१६ मध्ये रियो दि जिनेरियो विश्वचषकात रौप्यपदक मिळविले होते. याआधी, अंजुम मुदगिल, आशी चौकसी आणि सिफ्ट कौर सामरा यांनी महिलांच्या ५० मीटर मीटर रायफल थ्री पोजिशन टीम स्पर्धेत कांस्यपदक मिळविले. कांस्य-पदकाच्या लढतीत त्यांनी आस्ट्रियाची शैलीन वायबेल, एन उंगेरांक आणि रेबेका कोएक यांना १६-६ ने नमविले. भारत पाच सुवर्ण, पाच रौप्य आणि तीन कांस्य अशी १३ पदके जिंकून पदकतालिकेत अव्वल स्थानावर आहे.