मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूचा उपांत्य फेरीत प्रवेश! बऱ्याच कालावधीनंतर यामागुचीवर सरशी; सात्विक-चिराग मात्र पराभूत

भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने शुक्रवारी मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. मात्र पुरुष दुहेरीत सात्विकसाइराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांच्या जोडीला पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले.
मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूचा उपांत्य फेरीत प्रवेश! बऱ्याच कालावधीनंतर यामागुचीवर सरशी; सात्विक-चिराग मात्र पराभूत
मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूचा उपांत्य फेरीत प्रवेश! बऱ्याच कालावधीनंतर यामागुचीवर सरशी; सात्विक-चिराग मात्र पराभूत
Published on

क्वालालंपूर : भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने शुक्रवारी मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. मात्र पुरुष दुहेरीत सात्विकसाइराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांच्या जोडीला पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले.

२०२६च्या बॅडमिंटन हंगामाला या १,००० सुपर गुणांचा दर्जा असलेल्या स्पर्धेपासून प्रारंभ झाला. २०२५ या वर्षात भारताच्या फक्त दोन खेळाडूंनाच एखादी स्पर्धा जिंकता आली. त्यामुळे २०२६मध्ये कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे. दुखापतीतून सावरत पुनरागमन करणाऱ्या ३० वर्षीय सिंधूने या स्पर्धेत आतापर्यंच लौकिकाला साजेसा खेळ केला होता. शुक्रवारी तिने उपांत्यपूर्व लढतीत जपानच्या अकाने यामागुचीवर मात केली. पहिला गेम २१-११ असा जिंकल्यानंतर दुखापतीमुळे यामागुचीने माघार घेतली. परिणामी सिंधूने आगेकूच केली. सिंधूला गेल्या वर्षात एकही स्पर्धा जिंकता आली नव्हती.

सिंधूने गुरुवारी जपानच्या नवव्या मानांकित टोमोका मियाझाकीला २१-८, २१-१३ अशी धूळ चारली होती. तर त्यापूर्वी तिने शू यंगला नेस्तनाबूत केले होते. आता सिंधूवरच भारताच्या स्पर्धेतील आशा टिकून आहेत. यानंतर जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात योनेक्स सनराइज इंडिया ओपन स्पर्धा सुरू होणार आहे. त्यामध्ये सिंधूच महिला एकेरी विभागात भारताचे नेतृत्व करेल.

पुरुष दुहेरीत जागतिक कांस्यपदक विजेत्या सात्विक-चिराग जोडीने गुरुवारी जुनेद रौफ व रॉय किंग या मलेशियाच्या जोडीवर २१-१८, २१-१२ असा सरळ दोन गेममध्ये विजय मिळवला होता. त्यामुळे शुक्रवारी त्यांच्यावरही लक्ष होते. मात्र मोहम्मद फिकरी व फझर अल्फियान यांनी सात्विक-चिरागवर २१-१०, २३-२१ अशी मात केली. तिसऱ्या मानांकित भारतीय जोडीने ४७ मिनिटांत ही लढत गमावली.

पुरुष एकेरीत अनुभवी लक्ष्य सेनला मात्र दुसऱ्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. गतवर्षी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकणाऱ्या लक्ष्यला हाँगकाँगच्या ल्यू च्यूककडून २०-२२, १५-२१ असा पराभव पत्करावा लागला. तसेच चीनच्या अग्रमानांकित शी यूने भारताच्या आयुष शेट्टीला १८-२१ २१-१२, २१-१२ असे तीन गेममध्ये पराभूत केले.

logo
marathi.freepressjournal.in