मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा : प्रणॉय, मालविका बाद फेरीत दाखल

क्वालालम्पूर येथे सुरू असलेल्या मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी भारताच्या एच. एस. प्रणॉय आणि मालविका बनसोड यांनी बाद फेरीत (राऊंड ऑफ १६) प्रवेश केला.
 एच. एस. प्रणॉय, मालविका बनसोड (डावीकडून)
एच. एस. प्रणॉय, मालविका बनसोड (डावीकडून)
Published on

नवी दिल्ली : क्वालालम्पूर येथे सुरू असलेल्या मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी भारताच्या एच. एस. प्रणॉय आणि मालविका बनसोड यांनी बाद फेरीत (राऊंड ऑफ १६) प्रवेश केला.

१००० सुपर गुणांचा दर्जा असलेल्या या स्पर्धेत पुरुष एकेरीत प्रणॉयने मंगळवारी अर्धवट राहिलेली पहिली लढत बुधवारी जिंकली. पावसाचे पाणी छपरातून गळत कोर्टवर पडत असल्याने प्रणॉयचा सामना पुढे ढकलण्यात आला होता. मग बुधवारी प्रणॉयने कॅनडाच्या ब्रायन यांगला २१-१२ १७-२१, २१-१५ असे तीन गेममध्ये नमवले. १ तास आणि २९ मिनिटांच्या संघर्षानंतर ही लढत जिंकणाऱ्या प्रणॉयसमोर आता चीनच्या सातव्या मानांकित शि फेंगचे आव्हान असेल. फेगने भारताच्या प्रियांशू राजवतला २१-१६, २१-१६ अशी धूळ चारली. लक्ष्य सेन मंगळवारी सलामीलाच गारद झाला होता. त्यामुळे आता प्रामुख्याने प्रणॉयवरच पुरुष एकेरीत भारताची भिस्त आहे.

महिला एकेरीत २३ वर्षीय मालविकाने मलेशियाच्या जीन वेईला २१-१५, २१-१६ असे नेस्तनाबूत केले. ४५ मिनिटांत ही लढत जिंकणाऱ्या मालविकाची आता चीनची हॅन किंवा कोरियाची यू पोपो यांच्यातील विजेतीशी गाठ पडेल. अनुभवी पी. व्ही. सिंधू या स्पर्धेत सहभागी न झाल्याने महिला एकेरीत मालविकावरच भारताच्या आशा टिकून आहेत.

२०२४मधील अपयश बाजूला सारून भारताचे बॅडमिंटनपटू २०२५ची दणक्यात सुरुवात करण्यास आतुर आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला बॅडमिंटनमध्ये एकही पदक जिंकता आले नाही. आता २०२५मध्ये ऑल इंग्लंड व अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमक दाखवून २०२६च्या राष्ट्रकुलसाठी उत्तम तयारी करण्याचे भारतीय खेळाडूंचे लक्ष्य असेल.

दुहेरीत भारताची दमदार कामगिरी

महिला दुहेरीत ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी बाद फेरी गाठली. तसेच मिश्र दुहेरीत तनिषा क्रॅस्टो व ध्रुप कपिला, आद्या वरियाथ व सतिश कुमार या भारतीय जोड्यांनी आगेकूच केली. ट्रीसा-गायत्री यांनी थायलंडच्या जोडीवर २१-१०, २१-१० असे वर्चस्व गाजवले. ध्रुव व तनिषा यांनी कोरियन जोडीवर २१-१३, २१-१४ असा विजय मिळवला. सतिश व आद्या यांनी भारताच्याच असित सूर्या-अमृता प्रथमेश यांना २१-१३, २१-१५ असे नमवून बाद फेरीत प्रवेश केला.

logo
marathi.freepressjournal.in