मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा: सात्त्विक-चिराग, अश्विनी-तनिषा या भारतीय जोड्या उपांत्यपूर्व फेरीत

मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा: सात्त्विक-चिराग, अश्विनी-तनिषा या भारतीय जोड्या उपांत्यपूर्व फेरीत

पुरुष एकेरीत लक्ष्य सेन व किदाम्बी श्रीकांत यांना पराभवाला सामोरे जावे लागल्याने भारताचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले.

क्वालालम्पूर : खेलरत्न पुरस्कार विजेत्या सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीत आणि अश्विनी पोनप्पा-तनिषा क्रॅस्टो यांनी महिला दुहेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा पराक्रम केला. त्यामुळे १,००० सुपर गुणांचा दर्जा असलेल्या मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत आता फक्त दुहेरीतूनच भारताला जेतेपदाच्या आशा आहेत.

ऑलिम्पिक पात्रतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या स्पर्धेत पुरुष दुहेरीतील राऊंड ऑफ १६ सामन्यात सात्त्विक-चिराग यांनी लुकास कोर्वे व रोनन लॅबर या फ्रान्सच्या जोडीला २१-११, २१-१८ असे सरळ दोन गेममध्ये पराभूत केले. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या सात्त्विक-चिरागसमोर आता ही जी टिंग व रेन झियांग यू या चीनच्या जोडीचे आव्हान असेल.

महिला दुहेरीत अनुभवी अश्विनी व युवा तनिषा यांच्या जोडीने धक्कादायक विजयाची नोंद करताना जपानच्या सातव्या मानांकित वाकाना नागाहारा आणि मायू मासुमोटो यांना २१-१९, १३-२१, २१-१५ असे संघर्षपूर्ण लढतीत नमवले. गेल्या महिन्यात गुवाहाटी मास्टर्स स्पर्धा जिंकणाऱ्या अश्विनी-तनिषाची पुढील फेरीत रिन इवांगा आणि नाकानिशी या जपानी जोडीशी गाठ पडेल.

लक्ष्य, श्रीकांतच्या परा‌भवामुळे एकेरीतील आव्हान समाप्त

पुरुष एकेरीत लक्ष्य सेन व किदाम्बी श्रीकांत यांना पराभवाला सामोरे जावे लागल्याने भारताचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. एच. एस. प्रणॉय बुधवारी पहिल्याच फेरीत पराभूत झाला, तर महिलांमध्ये पी. व्ही. सिंधूने माघार घेतल्यानंतर एकही भारतीय स्पर्धक नव्हती. दरम्यान, गुरुवारी पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत चीनच्या वेंग हाँगने लक्ष्यला २१-१५, २१-१६ अशी धूळ चारली. हाँगकाँगच्या अग्रमानांकित एनजी का लाँगने श्रीकांतला २१-१३, २१-१७ असे सहज दोन गेममध्ये नेस्तनाबूत केले.

logo
marathi.freepressjournal.in